Deputy CM Ajit Pawar:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये रविवारी (दि.२७ ऑगस्ट) सभा पार पडली. अजित पवार बीडमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मात्र, सभा सुरु झाल्यानंतर सभेत अनेक गोष्टी घडल्या.
एका बाजूला अजित पवारांच्या स्वागतासाठी हैदराबादहून हार मागवण्यात आला होता, तर दुसरीकडे त्यांच्या ताफ्याला बीडमध्ये काळे झेंडेही दाखवण्यात आले. बीडमधील ही सभा अजित पवारांसाठी ऊन-पावसासारखी ठरली.
लोकांनी सभेला उपस्थित राहून प्रतिसाद तर दिला, पण नेत्यांचा निम्म्यापेक्षा जास्त वेळ लोकांना शांततेचं आवाहन करण्यात गेला. बीडच्या सभेत नेमकं काय घडलं, सविस्तर जाणून घेऊयात.
अजित पवारांच्या या सभेचा बीडचा दुष्काळ संपवणारी सभा म्हणून मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, सभेत बीडसाठी कोणत्याही घोषणा करण्यात आल्या नाहीत. सभेतही बीडचा दुष्काळ कसा संपवला जाऊ शकतो, यावर फार कमी चर्चा झाली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जेव्हा बीडमध्ये दाखल झाले, तेव्हा कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांचं स्वागत केलं. मात्र, त्यानंतर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या ताफ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. सभेत जेव्हा अजित पवारांनी भाषण करायला सुरुवात केली, तेव्हा अनेक लोकांनी त्यांच्या भाषणाकडे पाठ फिरवत खुर्च्या रिकाम्या केल्या.
अमरसिंह पंडित यांच्या भाषणाच्या वेळी तर लोकांनी गोंधळ करायला सुरुवात केली होती. त्यांनी बोलताना जवळपास ३ वेळा लोकांना शांततेचं आवाहन केलं. बीडच्या लोकांनी धनंजय मुंडेंच्या भाषणाला प्रतिसाद तर दिला, पण त्यांचे भाषण संपताच लोक खुर्च्या रिकाम्या करु लागले, त्यामुळे धनंजय मुंडेंनी लोकांना हात जोडून शेवटपर्यंत सभा न सोडण्यासाठी विनंती केल्याची माहिती मिळत आहे.
लोकांचा गोंधळ सुरू असताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं भाषण कधी सुरू झालं आणि कधी संपल हेच कळालं नाही. प्रफुल्ल पटेल यांच संपूर्ण भाषण देखील गोंधळातच झालं. छगन भुजबळ यांच्या भाषणावेळी देखील गोंधळ सुरुचं होता. त्यामुळे त्यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं. त्यामुळे अजित पवारांची सभा बिडकरांनी गाजवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.