Akola Political Update : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘भूकंप’ झाला. यावेळी या भूकंपाचे हादरे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसले.
अजित पवार यांनी वेगळी चूल मांडून भाजपसोबत घरोबा करीत रविवारी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही धक्का बसला.
अजित पवारांच्या भूमिकेनंतर अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पटले असून, महानगराध्यक्षांचा गट अजितदादासोबत आहे तर राकाँच्या ज्येष्ठ नेत्यांसह जिल्हाध्यक्षांच्या गटाने मोठे साहेब अर्थात शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देवून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी दावा करणारे अजित पवार यांनी रविवारी टाकलेली ‘गुगली’ सर्वांचीच विकेट घेवून गेली. पहाटेच्या शपथ विधीने भाजपसोबत जाण्याचा केलेला संकल्प अखेर अजितदादांनी रविवारी पूर्णत्वास नेला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांनी शपथ घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला आहे. अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. शरद पवार यांच्याशी निष्ठा राखून असलेल्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शरद पवार जेथे असेल तेथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना ठाकरे गटात चिंता
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाविकास आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाले. महाविकास आघाडी फुटली हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
राज्याच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घटनांमुळे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व नेत्यांची तातडीची बैठक बोलावली.
रविवारी सायंकाळी बोलावलेल्या या बैठकीत उशिरापर्यंत राज्यातील राजकीय घडामोडी व पक्षांतर्गत घडामोडीबाबत विचारमंथन झाले. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांच्या सल्ल्याप्रमाणे शरद पवार साहेबांसोबतच राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासह ज्येष्ठ नेते संतोषदादा कोरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे व इतरही ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
‘वंचित’ला आले सुगीचे दिवस
राज्याच्या राजकारणात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली अवस्था बघता वंचित बहुजन आघाडीला सुगीचे दिवस आले आहेत. राज्यात काँग्रेसला आता शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीशिवाय कुणाचाही आधार राहिलेला नाही.
आधाराशिवाय हा पक्ष राज्यात टिकणार नाही हे काँग्रेस नेत्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. त्यामुळे आता काँग्रेसला वंचित शिवाय पर्याय उरणार नाही. अशा परिस्थितीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
आमदार व महानगराध्यक्षांच्या गटाकडून जल्लोष
अकोला जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार विधानसभेत निवडून आला नाही. पक्षाची पाटी कोरीच राहिली. अशा परिस्थितीत अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात आले.
त्यामुळे जिल्ह्यातून विधिमंडळात राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव आमदार आहेत. रविवारी मुंबईत अजित पवार यांनी बैठक बोलावली त्या बैठकीला अमोल मिटकरी स्वतः उपस्थित होते.
सोबतच या घटना घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला महानगराध्यक्ष विजय देशमुख हे सुद्धा मुंबईतच उपस्थित होते. जिल्ह्यातील काही सोशल माध्यमांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करणारे विजय देशमुख यांचे शुभेच्छा संदेश व्हायलर झाले आहेत.
यावरून आमदार अमोल मिटकरी यांच्यासोबतच विजय देशमुख हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यासोबत महानगर कार्यकारीणीतील काही पदाधिकाऱ्यांनी रात्री अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल जल्लोषही केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.