Akola News: एका रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅंम्पसाठी रखडले कोट्‍यवधीचे व्यवहार

नागरिक त्रस्तः मागणी करूनही शासनाकडून पुरवठा झालाच नाही
Akola News: एका रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅंम्पसाठी रखडले कोट्‍यवधीचे व्यवहार
Updated on

Akola News: शहर व जिल्हयात एका रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅंम्पसाठी कोट्‍यवधीचे व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येते. मागील पंधरा दिवसापासून जिल्हयातील १ रुपयाचे रेव्हेन्यू स्टॅंम्प व ५ रुपयाचे कोर्ट फी स्टॅंम्प (तिकिट) उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाकडून मुंबईच्या प्रधान मुद्रांक कार्यालयाकडे मागणी केल्यावरही अद्याप पुरवठा होवू शकला नसल्याची वास्तविकता आहे.

रेव्हेन्यू स्टॅम्पचा मागील पंधरवाड्यापासून तुटवडा निर्माण झाला असून पोस्ट कार्यालयात सुद्धा तिकिटे उपलब्ध होत नसल्याने आर्थिक व्यवहारांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. पोस्ट कार्यालयात तर तिकिटे उपलब्ध नसल्याची सुचना लावण्यात आली आहे. मुद्रांक विक्रेत्यांकडे सुद्धा तिकिटे उपलब्ध नाहीत. राज्य सरकारच्या दप्तर दिरंगाईमुळे रेव्हेन्यू तिकीटची टंंचाई झाली आहे.

रेव्हेन्यू स्टॅम्प उपलब्ध नसल्याने शेती कर्जाची अनेक प्रकरणे प्रलंबीत आहेत. पाच हजार रुपयांच्या पुढील आर्थिक व्यवहारात रेव्हेन्यू स्टॅम्प लावणे बंधनकारक असल्याने मोठ्‍या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष घालून जिल्हयात रेव्हेन्यू स्टॅंम्प उपलब्ध करून घेण्याबाबत प्रधान मुद्रांक कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

रेव्हेन्यू स्टॅंम्पसाठी डिसेंबरमध्ये केली होती मागणी

दर सहा महिन्याने आपण प्रधान मुद्रांक कार्यालयाकडे मागणी करतो. शासनाकडे डिसेंबर २०२३ मध्ये आॅक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ साठी सुमारे ११ लाख ५२ हजाराची मागणी केली होती. मात्र अद्याप पुरवठा होवू शकला नाही. एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ साठी सुद्धा १२ लाख ८० हजार रेव्हेन्यू स्टॅंम्पची मागणी करण्यात आली आहे. आपण पाच रुपयाचे ३ लाख ८४ हजार तिकीटांची मागणी केली होती. मात्र प्रधान मुद्रांक कार्यालयाने केवळ १ लाख २८ हजारच पाठवली. नागरिकांची अडचण लक्षात घेवून रेव्हेन्यू स्टॅंम्प तातडीने पाठवण्याबाबत प्रधान मुद्रांक कार्यालयाशी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे अशी माहिती ट्रेझरी अधिकारी मंजित गोरेगावकर यांनी ‘सकाळ’ला दिली.

पीक कर्जासाठी बँकेत अर्ज केला आहे. कर्जही मंजूर झाले पण एका रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅंम्पसाठी मला पैसे मिळण्यात अडचण जात आहे. पेरणी आठवड्यावर आली आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची अडचण समजून तातडीने रेव्हेन्यू स्टॅंम्प उपलब्ध करून द्यावेत.

- रामराव पाटील, शेतकरी कौलखेड

रेव्हेन्यू स्टॅंम्पच्या मागणीबाबत मी स्वतः पालकमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांसह मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे. नागरिकांना खुप मोठी अडचण जात आहे. मात्र आम्ही हतबल झालो आहेत. जिल्हाधिकारी साहेबांनी दखल घेवून तातडीने ही समस्या सोडवण्याची गरज आहे.

- जयेंद्र खेडकर, मुद्रांक विक्रेता अकोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.