Akshay Shinde Encounter: ''स्वसंरक्षण की हत्या?'' अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उपस्थित होताएत 'हे' प्रश्न; न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

Varsha Gaikwad: बदलापूर प्रकरणात याआधीच पोलिसांवर प्रकरण दडपण्याचे, गुन्हा नोंदवण्यास उशीर करण्याचे गंभीर आरोप झालेले आहेत. या प्रकरणातील शाळेचे संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपाशी संबंध असून तो अजूनही फरार आहे. त्याला अजून पोलीस का पकडू शकले नाहीत? आरोपीच्या आईने आणि भावाने दिलेले जवाब कसं दुर्लक्षित करता येतील? असा मुद्दा काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड त्यांनी उपस्थित केला आहे.
Akshay Shinde Encounter: ''स्वसंरक्षण की हत्या?'' अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उपस्थित होताएत 'हे' प्रश्न; न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी
Updated on

Badlapur School Crime: बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला. अक्षयने पोलिसांकडे असलेली बंदूक हिसकावून त्यांच्यावर फायरिंग केलं, त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या; अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. परंतु या एन्काऊंटरसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधकांनीही मुद्दे उपस्थित करत पोलिस आणि सरकारवर संशय व्यक्त केलाय.

पोलिसांचा हलगर्जीपणा संशयास्पद- शरद पवार

बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.

उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा- नाना पटोले

  • बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही ?

  • फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का ?

  • हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का?

  • या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी.

याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे- विजय वडेट्टीवार

अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का??

अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली?

आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात?

बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे..

बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही.

आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!

स्वसंरक्षमाचा बनाव; अनिल देशमुखांचा आरोप

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो.

सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे.

न्यायव्यवस्थेची थट्टा- सुप्रिया सुळे

महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात उशीर करण्यात आला. लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली खरी पण आता आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा आहे.

स्वसंरक्षण की हत्या?- वर्षा गायकवाड

एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पोलिस आणि राज्याच्या गृहखात्यात नक्की चाललंय तरी काय?

बदलापूर प्रकरणात याआधीच पोलिसांवर प्रकरण दडपण्याचे, गुन्हा नोंदवण्यास उशीर करण्याचे गंभीर आरोप झालेले आहेत. या प्रकरणातील शाळेचे संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपाशी संबंध असून तो अजूनही फरार आहे. त्याला अजून पोलीस का पकडू शकले नाहीत? आरोपीच्या आईने आणि भावाने दिलेले जवाब कसं दुर्लक्षित करता येतील?

त्यामुळे जागच्या जागी हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि या प्रकरणाचे धागेदोरे ज्यांच्या दिशेने जात आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी तर अक्षय शिंदेची हत्या करण्यात आलेली नाही ना? याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत, पण राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे सत्ताकारणात व्यग्र आहेत. खरं तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा दिला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.