सोलापूर : राज्यातील एक लाख 10 हजार 229 शाळांमध्ये सव्वादोन कोटी विद्यार्थी प्रवेशित आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यांनतर 1 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या. मात्र, शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीत 65 टक्क्यांवर गेलेली नाही. कोरोना काळात शाळाबाह्य मुलांची संख्या खूपच वाढली असून बालविवाहाचे प्रमाणही अधिक राहिले आहे. शाळकरी मुले शेतमजुरीवर दिसतात. आता शाळेतील विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीची कारणे शोधून त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
कोरोनामुळे मार्च 2020 पासून बहुतेक दिवस शाळा बंदच राहिल्या. त्यानंतर पहिली ते सातवीच्या बहुतेक शाळा 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरु झाल्या आहेत. शाळा बंदमुळे मुलगी घरात एकटीच असायची आणि तिची चिंता पालकांना होती. ऑनलाइन मोबाइल घेऊन देण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. सातवी, आठवीत असतानाच विवाह झाल्यास पुढील खर्च कमी होईल, कोरोनाच्या निर्बंधांत स्वस्तात विवाह होतो, पुढे तिच्या शिक्षणाचा, विवाहाचा खर्च मोठा होईल आणि त्या खर्चाचा डोंगर माथ्यावर कायम उभारेल, अशी भितीही पालकांना होती. त्यामुळे बालविवाह वाढल्याचे बोलले जाते. दुसरीकडे कोरोनात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता, शाळा बंद असल्याने मुलेही घरात निवांतच. त्यामुळे ती मुले हॉटेल, वीटभट्टी, हातीगाडीसह अन्य ठिकाणी काम करू लागली. शाळा बंदमुळे चिमुकल्यांना उपस्थिती भत्ताही मिळाला नाही. गणवेश, शालेय साहित्यही नाही. त्याशिवाय उपस्थिती वाढावी म्हणून कोणतीही ठोस योजना नाही. आगामी काळात तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून एक स्वतंत्र योजना आखली जात आहे.
स्वतंत्र सर्वे करून त्याची नेमकी कारणे शोधली जातील
कोरोना काळात बालविवाह वाढले असून शाळाबाह्य झालेल्या मुलांचे प्रमाणही अधिक आहे. शेतमजुरीसह अन्य ठिकाणी बालके काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे बालरक्षकांच्या मदतीने बालविवाह, बालमजुरीचा स्वतंत्र सर्वे करून त्याची नेमकी कारणे शोधली जातील. त्यानंतर सरकार पातळीवर ठोस उपाययोजना केल्या जातील.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
शाळाबाह्य मुलांची वाढली संख्या
राज्यातील शाळाबाह्य मुलांची संख्या आजवर कधीही 10 ते 15 हजारांवर गेली नाही. मात्र, सप्टेंबर 2020 मधील सर्व्हेमध्ये मुंबई उपनगर, पालघर, नाशिक, नंदुरबार, अकोला, मुंबई, नगर, जळगाव, ठाणे, सोलापूर, बीड, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शाळाबाह्य मुले आढळली. विशेषत: बुलढाणा, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्ह्यातील काही भागाचा सर्व्हे कोरोनामुळे होऊ शकला नाही. तरीही, राज्यभरात तब्बल 25 हजार 204 मुले शाळाबाह्य आढळली. त्यात जवळपास 300 मुले बालमजूर होती. आता ही संख्या 50 हजारांहून अधिक झाल्याचा अंदाज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.