सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. २२) ३६० ट्रक (३६,००१ क्विंटल) कांदा आला होता. पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाल्याने यंदा बाजारात आवक कमीच आहे. तरीदेखील, कांद्याचा सरासरी भाव अडीच ते तीन हजारापर्यंतच आहे. शुक्रवारी सोलापूर बाजार समितीत ३५ हजार ९६९ क्विंटल कांदा सरासरी अडीच हजार रुपयाच्या भावाने विकला गेला.
गतवर्षी निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कमी झाले आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका सोसावा लागला. पावसाळ्याच्या सुरवातीला लावलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने हजारो शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. मात्र, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तो कांदा जागेवरच खराब झाला. त्यामुळे कांद्याची आवक सुरवातीपासूनच कमी राहिली आहे. दुसरीकडे गतवर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली नाही. त्यामुळे बाजार समितीत दररोज ३५० ते ४०० गाड्यांचीच आवक दिसत आहे. सोलापुरातील कांद्याला बांगलादेशात मोठी मागणी आहे, तरीपण भाव अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाहीत. अजूनही शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा असून डिसेंबरमध्ये भाव वाढतील, असा अंदाज बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
कांद्याचा शुक्रवारचा बाजारभाव
एकूण आवक
३६० गाड्या
एकूण पिशव्या
७२,००२
एकूण क्विंटल
३६,००१
सरासरी भाव
२५०० रुपये
...तर व्यापाऱ्यांचा परवाना रद्द होणार
शेतकरी कांदा घेऊन बाजार समितीत आल्यावर त्यांना ठरल्याप्रमाणे विकलेल्या शेतमालाचे पैसे वेळेत मिळावेत एवढीच अपेक्षा आहे. कांदा विकल्यानंतर बहुतेक व्यापारी शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या मुदतीचा धनादेश देतात. पण, काहींच्या धनादेशाची तारीख संपूनही संबंधित शेतकऱ्यांचा धनादेश वटत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बाजार समितीकडे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासक मोहन निंबाळकर यांनी यापूर्वीच दिली आहे. शेतकऱ्यांनाही त्यांनी असा प्रकार झाल्यास तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. तर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळेत पैसे द्यावेत, अशा सूचना केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.