Babasaheb Ambedkar : भारतात सर्वाधिक तर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत आहेत महामानवाचे खास पुतळे

भारतात सर्वात जास्त पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. आणि त्यांची संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे.
Statue of Babasaheb Ambedkar
Statue of Babasaheb Ambedkaresakal
Updated on
Summary

भारतात सर्वात जास्त पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. आणि त्यांची संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. आपल्या महाराष्ट्रातही आंबेडकरांचे सर्वाधिक पुतळे पहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊ कोण-कोणत्या जिल्ह्यांत बाबासाहेबांचे पुतळे आहेत..

आज 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती आहे. आंबेडकर जयंती देशातील सरकारी कार्यालयांमध्ये आणि सर्वसामान्य लोक आपापल्या पद्धतीनं साजरी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू इथं झाला.

त्यांचं मूळ नाव भीमराव होतं. आंबेडकरांचे वडील रामजी वालद मालोजी सकपाळ महू इथं मेजर सुभेदार होते. आंबेडकरांचं कुटुंब मराठी होतं आणि ते मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे गावचे होते. आईचं नाव भीमाबाई सकपाळ होतं.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे तमाम भारतीयांसाठी बाबासाहेबांचा सांस्कृतिक वारसा आहेत. आपणास माहितच असेल की, भारतात सर्वात जास्त पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. आणि त्यांची संख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. आपल्या महाराष्ट्रातही आंबेडकरांचे सर्वाधिक पुतळे पहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊ कोण-कोणत्या जिल्ह्यांत बाबासाहेबांचे पुतळे आहेत..

कोल्हापूर : आज देशात सर्वाधिक पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. गिनीज बुकातही तशी नोंद आहे. 70 वर्षांपूर्वी भारतात डॉ. आंबेडकरांचा पहिला पुतळा त्यांच्या हयातीत शाहू महाराजांच्या नगरीत बसवण्यात आला, ही गोष्ट फार थोड्या लोकांना ठाऊक आहे. कोल्हापूरचे शाहूभक्त माजी आमदार दिवंगत बाबूराव धारवाडे यांनी 'जुनं कोल्हापूर' या आपल्या पुस्तकात ही माहिती दिली आहे. महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारानं नी कार्यानं भाई माधवराव बागल चांगलेच प्रभावित झाले होते. यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राँझचे पुतळे करून घेतले आणि दिनांक 9 डिसेंबर 1950 रोजी हजारो लोकांसमोर अनावरण केलं. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1952 साली राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी कोल्हापूरला आले होते. तेव्हा त्यांनी स्वतः हा पुतळा पहिला.

Kolhapur
Kolhapur

लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी लातूरमध्ये करण्यात आली आहे. या पुतळ्याला ‘स्टॅचू ऑफ नॉलेज’ असं नाव देण्यात आलं आहे. भाजप खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून ही मूर्ती साकारण्यात आलीये. 13 एप्रिल 2022 रोजी या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. लातूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क या मध्यवर्ती ठिकाणी हा महापुतळा आहे. राज्यातील सर्वात उंच पुतळा म्हणूनही याची नोंद झाली आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी 1400 किलो स्टील, 1400 किलो पीओपी, 3570 किलो फायबर आणि 200 लिटर रंग एवढे साहित्य वापरण्यात आलं आहे.

Latur
Latur

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पंधरा फूट उंचीचा पुतळा आहे. बाबासाहेबांचा पुतळा महापालिकेत उभारावा, अशी भिवंडीकरांची मागणी होती. त्यानुसार पालिकेनं पूर्णाकृती पुतळा उभारावा असा ठराव घेऊन त्यासंबंधी शासनाच्या सर्व संबंधित विभागाच्या परवानग्या घेण्यात आल्या आणि जवळपास 46 लाख रुपये खर्च करून भव्य पूर्णाकृती पुतळा उभारला. या पुतळ्याची उंची 15 फूट असून 1250 किलो एवढं वजन आणि डार्क ब्राऊन ऑक्सीडाईझ करण्यात आलेल्या या पुतळ्याचं 100 वर्षे एवढं आयुष्यमान असल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. हा पुतळ्याचं वास्तू विशारद जीवन धिवरे शिल्पकार स्वप्नील कदम यांनी केलं.

Bhiwandi
Bhiwandi

सोलापूर : मागील 35 वर्षांपासून तुळजापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी वेगवेगळ्या संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर तुळजापुरात डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा 4 मार्च 2022 रोजी उभारण्यात आला. यासाठी 30 मार्च 2021 रोजी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. 28 जुलै 2021 रोजी याला प्रशासकीय मान्यता मिळाली. यानंतर 9 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधान सचिव नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडं प्रस्ताव सादर करण्यात आला. येथील चौक सुशोभीकरण करणे 87.31 लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा बसवणे 12 लाख असं एकूण 1 कोटी रुपये खर्च आला आहे. या पुतळ्यामुळं शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

Solapur
Solapur

मुंबई : येथील इंदू मिलमध्ये उभारण्यात येत असलेल्या स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मॉडेलला राज्य सरकारच्या वतीनं स्मारकाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सर्व पक्षीय समितीनं मान्यता दिली आहे. हा पुतळा 350 फूट उंचीचा असणार आहे. जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हे हा पुतळा उभारणार असून गाझियाबाद इथं या पुतळ्याची 25 फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

Mumbai
Mumbai

डिचोली (सावंतवाडी) : शहरातील हरिजनवाडा-बोर्डे इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला नव्यानं झळाळी देण्यात आली असून, बाबासाहेबांचा नवीन अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. डिचोलीच्या उपनगराध्यक्ष सुखदा तेली यांनी स्वखर्चानं बाबासाहेबांचा नवीन पुतळा बसविलेला आहे. 14 एप्रिल 2011 रोजी हरिजनवाडा इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारून त्यांचा पुतळा बसविण्यात आला होता. सावंतवाडी येथील शिल्पकार विलास मांजरेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार केला आहे.

Sawantwadi
Sawantwadi

पारगाव (पुणे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्या अंगात एक सकारात्मक ऊर्जा संचारते. पारगाव येथील माजी सरपंच राजेंद्र विष्णू शिशुपाल यांनी नव्यानं बांधलेल्या स्वतःच्या दुमजली घराला त्यांनी 'क्रांतिसूर्य' असं नाव दिलं असून टेरेसवर उभारलेला सहा फूट उंचीचा पुतळा सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. दौंड तालुक्यातील पारगाव या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला असून हे सर्वांचं आकर्षण ठरत आहे. सोनेरी रंगाचा असणारा, अंगावर कोट, पॅन्ट, हातात पुस्तक आणि चष्मा अशी वेशभूषा केलेला हा पुतळा हुबेहूब दिसत आहे. पुणे येथील एका कारागिराकडून त्यांनी हा पुतळा बनवून घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं. हा पुतळा उभारणीसाठी किती खर्च आला याबाबत ते कधीही लोकांना सांगत नाहीत. कारण, या मानवाची किंमत होऊच शकत नसल्याचे ते म्हणाले.

Pargaon Pune
Pargaon Pune

नाशिक : पाथर्डी फाटा इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम प्रलंबित होतं. मात्र, नगरसेवक राकेश दोंदे यांच्या प्रयत्नांनी पाथर्डी फाटा इथं डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आला. नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा चबूताऱ्यासह जमिनीपासून सुमारे तीस फूट अंतरावर अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. या पुतळ्याच्या अगदी समोरील बाजूस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा 2021 मध्ये उभारण्यात आला. आंबेडकरांचा हा पुतळा शिल्पकार विजय बुराडे यांनी दिल्लीतील संसदेतील पुतळ्याप्रमाणं बनविला असून कांस्य धातूपासून तो बनवण्यात आला आहे. याकरिता सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला.

Nashik
Nashik

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होऊन 30 वर्ष झाली, पण अजूनही नामांतर किंवा नामविस्तार म्हटलं की एक प्रदीर्घ लढा आठवतो. या लढ्याचा इतिहास असाच प्रेरणादायी आहे. तसेच तो दिल्या-घेतल्याचा हिशेब मांडणारा आहे. हा लढा कुणाच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारा नव्हता. कुणाचा दुस्वास करणारा तर मुळीच नव्हता. ज्या डॉ. बाबासाहेबांनी झोपडी-झोपडीत ज्ञानाचा प्रकाश आणला, त्या महामानवाला अभिवादन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. त्यावेळी मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांनी नामांतराबाबत पुढाकार घेतला. विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांची संयुक्त बैठक घेऊन नामविस्ताराचा ठराव मंजूर केला. दिनांक 27 जुलै 1978 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी घोषणा झाली. याच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

Aurangabad
Aurangabad

तासगाव (सांगली) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बसस्थानक चौकात असलेला भव्य असा पुतळा शहराचा मानबिंदू आणि प्रेरणास्थान बनला आहे. अत्यंत दिमाखदार आणि भव्य असा हा आंबेडकरांचा पुतळा, मूळचे कडेगांवचे आणि सद्या कांदिवली मुंबई इथं असलेले शिल्पकार संजय यादव यांनी बनविला आहे. तासगाव शहरात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची अनेक वर्षांची मागणी 15 फेब्रुवारी 2019 रोजी या पुतळ्याचं अनावरण होवून पूर्ण झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते करण्यात आले. तासगाव नगरपालिका आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या पुतळ्याला 9 लाख तर चबुतरा उभारणीला 25 लाख रुपये खर्च आला आहे. आकर्षक चबुतरा आणि सजावट पुतळ्याच्या भव्यपणात आणखी भर टाकते.

Sangli
Sangli

सातारा : सन 1990 मध्ये मंत्री एन. एम. कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. अभयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी राज्यमंत्री शामरावजी आष्टेकर उपस्थित होते. हा आंबेडकरांचा पुतळा साताऱ्याच्या लौकिकात भर घालत आहे.

Satara
Satara

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()