१८ लाखांच्या तपासासाठी एक लाखांवर खर्च! सायबर गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांचा दोन राज्यात प्रवास; ‌चार बॅंक खात्यात ६७.२४ लाख रुपये ट्रान्सफर

शहरातील नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टर महिलेला सायबर गुन्हेगारांनी गुन्हा दाखल व अटकेची भीती दाखवून तब्बल ६७ लाख २४ लाख रुपयास फसविले आहे. गुन्हेगारांनी रक्कम चार वेगवेगळ्या खात्यात वर्ग केली असून ती खाती लखनौ, गोरखपूर, काठमांडू, ओरिसा, हरियाना, राजस्थान येथील आहेत.
Sakal Exclusive
Sakal Exclusivesakal
Updated on

सोलापूर : शहरातील नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टर महिलेला सायबर गुन्हेगारांनी गुन्हा दाखल व अटकेची भीती दाखवून तब्बल ६७ लाख २४ लाख रुपयास फसविले आहे. गुन्हेगारांनी रक्कम चार वेगवेगळ्या खात्यात वर्ग केली असून ती खाती लखनौ, गोरखपूर, काठमांडू, ओरिसा, हरियाना, राजस्थान येथील आहेत. ११ लाख रुपये वर्ग झालेल्या खात्याचा तपास सोलापूर शहर सायबर पोलिस करीत आहेत. त्यासाठी आतापर्यंत पोलिसांचाच एक लाख रुपयांचा खर्च झाला असून आणखी तीन खात्यांचा तपास झालेला नाही. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यासाठी आणखी काही लाखांचा खर्च होईल, अशी स्थिती आहे.

तुमच्या नावाचे सीमकार्ड खरेदी करून त्यावरून पॉर्न साईटला भेट देण्यात आली असून यावरून तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात तुम्हाला कधीही अटक होवू शकते, अशी भीती दाखवली. त्यातून तुमची समाजात बदनामी होईल, असेही ते म्हणाले. घाबरलेल्या महिला डॉक्टरला त्यांनी मग वेगवेगळ्या बॅंक खात्यांचे क्रमांक पाठवून त्यात टप्प्याटप्प्याने रक्कम पाठविण्यास भाग पाडले. गुन्हेगारांच्या सांगण्यावरून महिला डॉक्टरने एक-दोन नव्हे तब्बल ६७ लाख २४ हजार रुपये त्या खात्यावर पाठविले. तरीपण, समोरील व्यक्ती आणखी रकमेची मागणी करीत असल्याने त्यांनी कुटुंबात चर्चा करून पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याची बाब समोर आली. सोलापूर शहर पोलिसांनी या गुन्ह्यात आतापर्यंत मुंबईतील तिघांना अटक केली असून आता लखनौमधून एक संशयित जेरबंद केला आहे. त्याला न्यायालयाने उद्यापर्यंत (गुरुवार) पोलिस कोठडी ठोठावली आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेला तो आरोपी कमिशनवर काम करीत होता. मुंबईतील लोकांनी पाठविलेली बॅंक खाती गोरखपूरच्या व्यक्तीला पाठवायची जबाबदारी त्याच्यावर होती.

गोरखपूरचा व्यक्ती ती माहिती काठमांडू (नेपाळ) येथे पाठवायचा, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. आता गोरखपूरच्या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. मुंबई, लखनौ येथून आरोपी अटक करायला ये-जा करणे, त्याठिकाणी राहाणे, जेवण अशा बाबींसाठी आतापर्यंत एक लाखांचा खर्च झाला आहे. आता गोरखपूरला जाऊन त्या संशयित आरोपीचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे. त्यानंतर उर्वरित खात्यांचाही तपास करावा लागेल, अशी सद्य:स्थिती आहे. सुशिक्षित लोक भितीमुळे किंवा ज्यादा पैशाच्या अमिषातून सायबर गुन्हेगारांच्या अमिषाला बळी पडतात आणि त्याचा तपास पोलिसांना करावा लागतो, तोही शासकीय पैसा खर्च करून हे विशेष. नागरिकांनी सायबर गुन्हेगारांचे अमिष ओळखून त्याला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

चार खात्यात ६७ लाख ट्रान्स्फर

महिला डॉक्टरला फसवणूक सायबर गुन्हेगारांनी घेतलेली रक्कम त्यांनी उत्तरप्रदेश (लखनौ, गोरखपूर), ओरिसा, हरियाना, राजस्थान अशा विविध राज्यातील बॅंक खात्यांमध्ये वर्ग केली आहे. आतापर्यंत ज्या खात्यात ११ लाख रुपये वर्ग झाले होते, त्या खात्याशी संबंधित संशयितांची साखळी सोलापूर शहर सायबर पोलिसांकडून शोधली जात आहेत. त्या संशयितांच्या माध्यमातून उर्वरित खात्यांशी संबंधित आरोपींचा शोध घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.