शिक्षक भरतीतील मनमानी थांबणार! खासगी संस्थांमधील भरतीसाठी होणाऱ्या मुलाखतीवेळी उपस्थित असणार शिक्षण खात्याचा प्रतिनिधी; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील 6 हजार शिक्षकांची भरती होत आहे. शिक्षण आयुक्तालयाने पवित्र पोर्टलवरून एका पदासाठी 10 उमेदवारांची यादी संस्थांना पाठविली आहे. त्या उमेदवारांच्या मुलाखती घेताना आता तेथे उपशिक्षणाधिकारी किंवा गटशिक्षणाधिकारी उपस्थित असतील.
school teacher
school teachersakal
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांसह राज्यभरात सहा हजार शिक्षकांची भरती होत आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्तालयाने पवित्र पोर्टलवरून एका पदासाठी दहा उमेदवारांची यादी संबंधित संस्थांना पाठविली आहे. त्या दहा उमेदवारांच्या मुलाखती घेताना आता तेथे उपशिक्षणाधिकारी किंवा गटशिक्षणाधिकारी उपस्थित असतील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी, हा त्यामागील हेतू आहे.

पवित्र पोर्टलवरून भरती होण्यापूर्वी खासगी शैक्षणिक संस्थामधील शिक्षक भरती त्यांच्या मनाप्रमाणे होत होती. त्यावेळी मोठी आर्थिक देवाणघेवाण, वशिलेबाजीला वाव होता. आता पवित्र पोर्टलवर संबंधित शैक्षणिक संस्थांनी रिक्त पदांची जाहिरात अपलोड करायची आणि त्या संस्थांमध्ये इच्छुकांनी पवित्र पोर्टलवर अर्ज करायचे, अशी पद्धत आहे. त्या संस्थांमधील एका शिक्षक पदासाठी दहा उमेदवारांना पवित्र पोर्टलवरूनच पाठविले जात आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल, हा त्यामागील हेतू आहे. आता तर त्या उमेदवाराच्या मुलाखतीसाठी माध्यमिक शिक्षण विभागाचा एक प्रतिनिधीच उपस्थित राहणार असल्याने गुणवंत, दर्जेदार उमेदवाराला संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) संस्थाचालक व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना शिक्षक भरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

संस्था चालकांना त्यानुसार कळविले आहे

जिल्ह्यातील खासगी अनुदानित संस्थांमध्ये २४६ शिक्षकांची भरती होणार आहे. पवित्र पोर्टलवरून एका पदासाठी दहा उमेदवार देण्यात आले आहेत. या उमेदवारांची मुलाखत, कागदपत्रे पडताळणी व त्यांना वर्गावर पाठ घ्यावा लागणार आहे. त्यावेळी आमच्या कार्यालयाकडील एक प्रतिनिधी त्याठिकाणी उपस्थित राहील, असे सर्व खासगी संस्थांना कळविण्यात आले आहे.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

३१ डिसेंबरपूर्वी नव्या शिक्षकांच्या नेमणुका

खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होत असून या टप्प्यात जिल्ह्यात २४६ शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवरून एकूण दोन हजार ४६० उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. त्यानुसार त्या सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी, मुलाखती होतील. त्या सर्वांना ३१ डिसेंबरपूर्वी संबंधित शाळांवर नेमणुका मिळतील, असेही माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.