Parenting Tips: तुमची मुले अभ्यासात हुशार नाहीत का? पालकांनो, ‘ही’ पंचसूत्री तंतोतंत पाळा, १०० टक्के फरक जाणवेल

गुरुवारपासून शाळा सुरु होत आहेत. अनेक मुलांना शाळा किंवा पुढच्या वर्गाची भीती वाटते. अशावेळी पालक व शिक्षकांनी मुलांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पुस्तकी अभ्यासापेक्षाही विविध उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करायला हवे. पंचसूत्रीचे पालन करा, निश्चित फरक जाणवेल.
students
studentssakal media
Updated on

Parenting Tips : मुलांच्या प्रगतीत पालकांची खूप मोठा हातभार असतो. बालवयात मुलांवर अभ्यास व अपेक्षांचे ओझे न लादता त्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. शाळांमध्ये देखील शारीरिक शिक्षण हा विषय असतो, पण तो केवळ कागदावरच राहू लागला आहे. मैदानी खेळातून मुलांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ टिकून राहते, याचा विसर शाळांना पडायला नको.

दररोज किमान एक तास तरी मुलांसाठी मैदानी खेळ हवाच, असे तज्ज्ञांचे मत आहे. उन्हाळा सुटीनंतर आता गुरुवारपासून (ता. १५) शाळा सुरु होत आहेत. अनेक मुलांना शाळा किंवा पुढच्या वर्गात जाण्याची भीती वाटत असते.

अशावेळी पालक व शिक्षकांनी त्या मुलांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी केवळ पुस्तकी अभ्यासापेक्षाही विविध उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करायला हवे. पंचसूत्रीचे पालन करा, निश्चित फरक जाणवेल.

पालकांनी 'हे' आवर्जून लक्षात घ्यावे

१) मोबाईल, टीव्हीचा अतिवापर टाळा

कोरोना काळात अनेक मुलांना मोबाईल, टीव्हीची सवय लागली आहे. त्यातून डोळ्याचे विकार व पाठदुखीचा त्रास वाढल्याची वस्तुस्थिती आहे. मैदानी खेळांचा विसर पडल्याने लठ्ठपणा देखील वाढला आहे.

अशावेळी पालकांनी मुलांची ती सवय घालविण्यासाठी पहिल्यांदा स्वत:पासून सुरवात करावी. स्वत: मोबाईल बाजूला ठेवून मिळालेला वेळ मुलांसोबत घालवावा. जेणेकरून त्यांची सवय कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल. त्यावेळी तो मैदानी खेळ व अभ्यासाकडे लक्ष देवू शकणार आहे.

----------------------

२) मुलांचा दररोज घ्यावा होम वर्क

आपला मुलगा देखील इतर मुलांप्रमाणे हुशार व्हावा, अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असतेच. पण, इतर मुलांचे पालक त्यांच्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष देतात, काहीजण ट्यूशन लावतात. मुलांना शाळेत शिकताना पडलेले प्रश्न, न समजलेला विषय पुन्हा घरी शिकवतात.

या बाबींकडे सर्व पालकांनी आवर्जून लक्ष द्यावे आणि आपला मुलगा शाळेत काय शिकला, वर्गात शिकवलेले सगळे त्याला समजले का, अभ्यासात किंवा शाळेत त्याला काही अडचणी आहेत का, याकडे दररोज लक्ष द्यावे.

त्यातून त्याच्या मनातील शंका, प्रश्न दूर होतील आणि दुसऱ्या दिवशीपासून अभ्यासाकडे त्याचे लक्ष राहील आणि तो अभ्यासात हुशार होऊ शकतो.

-----------------

३) दररोज एक तास हवा मैदानी खेळ

स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुले मैदानी खेळ विसरल्याची स्थिती आहे. मुलांचा आवडता छंद मोबाईल व टिव्ही पाहणे हाच आहे. त्यांना आवडता खेळ विचारले असता, बहुतेक मुलांचे उत्तर असते मोबाईलमधील व्हिडिओ गेम.

पण, हा प्रकार मुलांच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीच्या बाबतीत खूपच गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पालकांनी मुलांचा दररोज किमान एक तास मैदानी खेळ घ्यावा. शाळांनीही ही बाब गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. मैदानी स्पर्धा तथा खेळांमध्ये सर्वच विद्यार्थी सहभागी होतील, याकडे देखील शाळांनी लक्ष द्यायला हवे.

students
Parenting Tips : जुळ्या मुलांची काळजी कशी घ्यावी,  एकाला प्रेम अन् दुसऱ्यावर राग असं तर होणार नाही ना?

४) मुलांच्या आहार व झोपेकडे हवे विशेष लक्ष

मुलांच्या तंदुरुस्तीसाठी कार्बोहायर्टेट, प्रोटिन, व्हिटॅमिन, मिनरल्स, फॅट व लोह या बाबी खूप महत्त्वपूर्ण आहेत. धान्यातून कार्बोहायर्टेट, डाळीतून प्रोटिन, व्हिटॅमिन व मिनरल्स हे भाजीपाला व फळातून, फॅट हे पनीर, दुधातून मिळते. पाणी भरपूर प्यायला हवे.

मुलांच्या आहारात दररोज मोड आलेले कडधान्य हवे. फास्टफूड तथा जंकफूड द्यायलाच नको. मुलांचा चहा वर्ज्य करावा. त्यांचा पोषक आहार असावा आणि रात्री किमान दहा वाजता मुलगा झोपायलाच हवा, असे नियोजन करणे जरुरी आहे.

----------------

५) ब्राह्मी मुहूर्तावेळी मुलांना उठवावे

आयुर्वेदात ब्राह्मी मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. सूर्योदयापूर्वीच ४५ मिनिटे ते सूर्योदयापर्यंत असा हा तो मुहूर्त मानला जातो. पहाटे चार ते सकाळी सहा या वेळेत मुले उठली आणि त्यावेळी केलेला अभ्यास किंवा कृती शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने मोलाची मानली जाते.

त्यावेळी हवा शुद्ध असते, वातावरण शांत असते. त्या वेळेत सकारात्मक ऊर्जा मिळते. या मुहूर्तावेळी केलेला अभ्यास सहजपणे स्मरणात राहतो, असेही काही तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे मुलांची आठ तासांची झोप पूर्ण होईल, यादृष्टिने पालकांनी मुलांना रात्री दहापूर्वीच झोपविण्याची खबरदारी घ्यावी.

students
Parenting Tips : तुमचे मुलांनाही येतोय का अभ्यासाचा कंटाळा? या Tricks अवलंबून बघाच, मुलांमध्ये नक्की फरक पडेल!

आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. जावळे म्हणतात...

मुलांसोबतचा सुसंवाद, स्क्रीनचा वापर टाळणे, मैदानी खेळ, सकाळचा व्यायाम, वाचनाची आवड, होम वर्क, प्रात्यक्षिक व उपक्रमातून शिक्षण, मुलांचा आहार व झोप या बाबींकडे पालकांनी प्रामुख्याने लक्ष दिल्यास निश्चितपणे मुलांच्या अडचणी दूर होतील.

ब्राह्मी मुहुर्ताचे पालन करावे. त्यातून मुलांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढेल, असा विश्वास शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विणा जावळे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.