लोकमान्य टिळकांना अपेक्षित ‘स्वराज्य’ भारतीयांपासून दूरच राहिलेले दिसते. समाज ‘स्वराज्य’ या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध विभागला गेला. ढिसाळ सरकारी कारभारामुळे सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला व हा ‘स्वार्थ राज’ असलेला देश बनला. अर्थव्यवस्था मंदीचा सामना करीत असताना शेअर बाजार मात्र रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. प्रत्येक महिन्याला अब्जाधीशांच्या यादीतील भारतीयांची संख्या वाढतच चालली आहे. हे लोकमान्यांना अपेक्षित ‘स्वराज्य’ नसून, त्याचे भ्रष्ट रूप आहे.
लोकमान्य टिळक यांनी लोकांना ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच,’ ही हाक दिली तेव्हा, त्यांनी भारतीयांना स्वतःच्या आयुष्यावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवा, असे सांगितले होते. त्यांचा विचार हा सर्वसामान्य नागरिकाला आत्मबल देणारा विचार होता. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ‘स्वतःचे राज्य’, म्हणजे अस्तित्वात असलेल्या सरकारी संस्थांमध्ये काम करणे यापेक्षा तो विचार वेगळा होता.
लोकमान्यांचे १ ऑगस्ट १९२०ला निधन झाल्यानंतर गांधीजींनी गोखलेंच्या ‘स्वतःच्या राज्या’च्या संकल्पनेचा स्वीकार केला; तर बॅ. जिना त्यांच्या द्विराष्ट्रवादाच्या संकल्पनेच्या मार्गाने गेले व परिणामी देशाची फाळणी झाली. जगाच्या इतिहासात कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळवताना असले काही सोसावे लागले नसेल. हे स्वातंत्र्य बेघर न झालेल्या व आपल्या प्रियजनांपासून दूर न झालेल्यांपुरतेच मर्यादित होते. फाळणीने दोन कोटी नागरिकांना त्यांच्या मूळ निवासापासून उखडून फेकले आणि हे सर्व भुकेकंगाल विस्थापित झाले. आपल्याला एक कायमचा शत्रू मिळाला व समाज ‘स्वराज्य’ या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध विभागला गेला. टिळकांच्या कल्पनेप्रमाणे सर्वसामान्य माणसाचे सक्षमीकरण झाले नाही. तत्कालीन नेत्यांनी सोव्हिएत युनियनची केंद्रीय पद्धतीने नियंत्रण करणारी अर्थव्यवस्था असलेले मॉडेल स्वीकारले, मात्र ती राबविण्यासाठीचे पुरेसे अधिकार त्यांच्याकडे नव्हते. ढिसाळ सरकारी कारभारामुळे सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला व भारत ‘स्वार्थ राज’ असलेला देश बनला.
या ‘स्वार्थ राज’मध्ये राजकीय पक्ष हे कुटुंबांचे व्यवसाय बनले. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारताची मोठी बाजारपेठ ताब्यात घेतली. स्थानिक व्यवसाय मारले गेले. हे वेगवेगळी राजकीय वैचारिकता असलेल्या पक्षांकडून झाले. घटनेत ‘समाजवादाचा’ पुरस्कार करणारा हा देश रोजगारातील असमानतेच्या निर्देशांकाचा विचार करता अगदी तळाला आहे. अर्थव्यवस्था मंदीचा सामना करीत असताना सोन्याचा भाव ५० हजारांच्या पुढे गेला आहे व शेअर बाजार तेजीचे नवे उच्चांक गाठत आहे. प्रत्येक महिन्याला अब्जाधीशांच्या यादीतील भारतीयांची संख्या वाढत चालली आहे. हे लोकमान्यांना अपेक्षित ‘स्वराज्य’ नाही.
सध्या देश माध्यमांकडून चालवला जातो आणि त्याची मालकी उद्योजकांच्या हातात आहे. प्रत्येक भारतीयासाठी इंटरनेट उपलब्ध आहे, मात्र त्यातून केवळ हुकमाची ताबेदार असलेली व एकाच उत्पादनाच्या वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची निवड करणारी स्वार्थी पिढी जन्माला आली आहे. (इंटनेटच्या माध्यमातून खरेतर सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकऱ्या व भुकेल्यांसाठी भाकरीची सोय होणे अपेक्षित होते.) लॉकडाउनच्या काळात हजारो स्थलांतरित उजाड हमरस्ते आणि रेल्वेच्या ट्रॅकवरून उपाशीपोटी चालत आपल्या घराकडे निघाल्याचे दृश्य सर्वत्र दिसत होते. भारताच्या इतिहासातील हा सर्वांत भीषण कालखंड होता.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
निष्काम कर्मयोग
लोकमान्य टिळक व स्वामी विवेकानंद यांची १९८२मध्ये मुंबई-पुणे प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये भेट झाली होती. लोकमान्यांनी या संन्याशाला आपल्या घरी राहण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले व स्वामीजी लोकमान्यांच्या घरी दहा दिवस राहिले. लोकमान्य आपल्या आठवणींमध्ये लिहितात, ‘स्वामीजींनी लोकांमध्ये मिसळणे टाळले. त्यांच्या खिशात एक छदामही नव्हता... स्वामींचा माझ्याप्रमाणेच असा विश्वास होता की, श्रीमद् भगवत गीता केवळ संन्यस्त राहण्याचा उपदेश करीत नाही, तर प्रत्येकाला अनासक्त राहण्याचा व फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचा संदेश देते.’
गेल्या शतकभरात देशाचे रुप किती पालटले आहे... लोकमान्यांसारखे तत्त्वज्ञानी-नेते व स्वामी विवेकानंदासारखे संन्यासी कोठे आहेत? सर्व धर्मादाय दवाखाने व शाळा कोठे गेल्या आहेत? आपल्या सर्व वैज्ञानिक संस्था कोरोना विषाणूबद्दल तर्कसंगत विधान करण्यात अयशस्वी का होत आहेत, आपल्या नेत्यांना लॉकडाउनचेही राजकारण का केले आहे, फेक न्यूज संदर्भातील नियमावली आम्हा कोणालाच धक्कादायक का वाटत नाही, प्रत्येकच क्षेत्रात स्वतःवर विश्वास नसलेल्यांची व नकारात्मक विचार करण्यांची फौज का आहे?
लोकमान्य आज पुन्हा जिवंत झाले तर नक्कीच अर्थपूर्ण स्वराज्यासाठी समाजात चैतन्य निर्माण करण्याच्या कामात स्वतःला झोकून देतील.
खरेखुरे स्वराज्य येवो ...
भारत जगातील सर्वांत मोठा दूध, डाळी व मसाल्यांचा उत्पादक देश आहे, म्हशींची संख्या जगात सर्वाधिक आहे, त्याचबरोबर गहू, तांदूळ व कपाशीचे लागवडीखालचे सर्वाधिक क्षेत्र असलेला देश आहे. तांदूळ, गहू, कपाशी, ऊस, मत्स्यशेती, शेळी व मेंढीचे मांस, फळे, भाजीपाला व चहाचा यांचा जगातील दुसरा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. मात्र, शेतकरी गरीबीत जगतात आणि पीक न आल्यास आत्महत्या करतात. मात्र, मी नकारात्मक विचार करणारा नाही.. देशाचे पंतप्रधान भारत २०२२मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे व प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर सुरक्षित छप्पर देण्याचे ध्येय निश्चित करतात, तेव्हा मी त्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो. हे प्रत्येक भारतीयाला आतापर्यंत नाकारले गेलेले व लोकमान्यांना अपेक्षित असलेले ‘स्वराज्य’ असेल...ते लवकर येवो, हीच टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने प्रार्थना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.