सोलापूर : उजनी धरणाने तळ गाठला असून दुसरीकडे पावसाचा काही थांगपत्ता नाही. त्यामुळे संभाव्य संकटाचा अंदाज घेऊन आषाढी वारीच्या निमित्ताने सोडल्या जाणाऱ्या आवर्तनासोबतच सोलापूर शहरासाठी देखील पाणी सोडण्याचे नियोजन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे तब्बल तीन टीएमसी पाण्याची बचत शक्य आहे.
दरवर्षी सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून आवश्यकतेनुसार तीनवेळा पाणी सोडले जाते. प्रत्येकवेळी साधारणतः सहा ते साडेसहा टीएमसी पाणी सोडावे लागते. उजनी धरणाची साठवण क्षमता ११० टीएमसीपर्यंत असून त्यातील ६३ टीएमसी पाणी मृतसाठा मानला जातो. यंदा उजनी धरण ७ मे रोजी मायनसमध्ये गेले.
१५ जूनपासून पावसाला सुरवात होईल, अशी सर्वांनाच आशा होती. तत्पूर्वी, सलग दोन-अडीच महिने शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. मागील सव्वा महिन्यात उजनी धरणातील १५ टीएमसी पाणी संपले आहे. दरवर्षी पावसाळ्यात उजनी धरण १०० टक्के भरते, पण ऐन उन्हाळ्यात मायनसमध्ये जातेच, अशी आजवरील स्थिती आहे.
उजनी धरणाच्या बॅक वॉटरवर अनेक औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व धाराशिव, इंदापूर, नगर, सोलापूर शहराच्या देखील पाणी पुरवठ्याच्या योजना अवलंबून आहेत. त्यामुळे उजनी धरणातील पाणी सोडताना अधिकाऱ्यांकडून काटेकोर नियोजन केले जात आहे.
‘या’ नियोजनामुळे होईल ३ टीएमसी बचत
सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाणी आता कमी झाले असून आगामी १५ दिवस पुरेल इतकेच पाणी त्यात शिल्लक आहे. आषाढीसाठी (पंढरपूर शहर-तालुक्यासाठी) पाणी सोडले जाणारच आहे, त्यामुळे पुन्हा ते पाणी बंद करायचे अन् काही दिवसांनी सोडायचे हे सद्य:स्थितीत परवडणारे नाही. या पार्श्वभूमीवर आता २१ जूनला पंढरपूरपर्यंत पाणी सोडले जाणार असून २४ जूनपर्यंत ते पाणी पंढरपुरात पोचेल. त्यानंतर २९ जूनपासून विसर्ग वाढवून तसेच पुढे सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे तीन टीएमसी पाणी वाचेल, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे.
मायनस ७० टक्क्यांपर्यंत जाऊ, पण...
उजनी धरण सध्या मायनस ३० टक्के आहे. पंढरपूर व सोलापूर शहरासाठी पाणी सोडल्यावर धरण मायनस ४५ टक्क्यांपेक्षाही खाली जाणार आहे. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास मायनस ७० टक्क्यांपर्यंत धरणातून नदीद्वारे पाणी सोडता येते. पण, त्यावेळी उजनीच्या बॅक वॉटरवरील एमआयडीसी व चार-पाच शहरांच्या पाणी पुरवठा योजना बंद पडतील, अशी परिस्थिती ओढवणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.