पंढरपूर - ब्रिटीश राजवटीचा काळ. क्रांतिकारकांची धरपकड. गुजरातमधील विठ्ठल भक्तांना लागलेली पंढरीची ओढ. पण, जायचे कसे? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण श्रीमंत सरकार प्रतापसिंहराव महाराज गायकवाड यांचे दिंडीला प्रमाणपत्र मिळाले. ते घेऊन विणेकरी, टाळकऱ्यांच्या सोबतीला जमादार अशी मंडळी निघाली व बडोदा ते पंढरपूर ही आषाढी वारी सुरू झाली.
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ सरदार आबासाहेब मुजूमदारांच्या मार्गदर्शनात व वसंत कप्तान यांच्या नेतृत्वाखाली १९४४ मध्ये ‘गुर्जर-मराठी’ विठ्ठलभक्त वारकऱ्यांची पहिली वारी झाली. डुडुळगाव- आळंदी- सासवडमार्गे ही वारी १९६९ पर्यंत सुरू होती, याच्या नोंदी आढळल्या आहेत. त्या शोधल्या आहेत, संत साहित्याच्या अभ्यासक मनीषा बाठे यांनी.
पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी सुमारे ३३८ वर्षांपूर्वी आषाढी पायी पालखीची परंपरा सुरू केली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका घेऊन ते पंढरीची वारी करायचे. १८३२ नंतर सरदार हैबतबाबा आरफळकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. मात्र आषाढीसाठी गुजरातमधून स्वातंत्र्यपूर्व काळात अर्थात १९४४ पासून पायी दिंडी येत होती, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
सयाजीराव गायकवाड यांच्या सत्तेकडून आश्रय
श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज गायकवाड यांच्याकडे आबासाहेब मुजुमदार ‘मंत्री’ होते. परंतु पुढे त्यांनी आखाड्यांसाठी पूर्णवेळ काम सुरू केले. त्या वेळी बडोद्यातील शास्त्र्यानु पोळ (शास्त्र्याचे बोळ) परिसरातील रावबहाद्दूर वसंत बळवंत कप्तान हे मल्लांना ‘मल्लखांब, कुस्ती व मैदानी’ खेळांचे प्रशिक्षण द्यायचे.
शिवाय गुजराती भाषेमध्ये ‘कप्तान’ नावाचे वृत्तपत्रही चालवायचे. एकदा त्यांच्या लक्षात आले की, ‘गुजरातमधील थकलेली मराठी जनांची मने आषाढीच्या वेळी लाडक्या ‘विठुरायाच्या’ भेटीला तळमळू लागतात. त्यामुळे त्यांनी पर्याय काढला की, अशा वयोवृद्धांची दिंडी घेऊन आखाड्यातील तरुणांना एकत्र करून ‘डाकोर’ या गुजरातमधील ‘रणछोडरायांच्या जागृत स्थानी’ वारी काढून महाराष्ट्राबाहेरील वारकऱ्यांची वारी घडवायची.
पंढरपूर शक्य नाही तर किमान डाकोरला कृष्णभेट तरी घडवायची. त्यानुसार १९३२ मध्ये त्यांच्या शब्दांवर शेकडो आखाड्यातील युवक एकत्र झाले. त्यांनी आपापल्या परीने वृद्धांचे सवंगडी होत ‘डाकोर’ येथे पहिली आषाढी वारी काढली. गुजरातमध्ये या दिंडीचे खूप कौतुक झाले. गुर्जरांना नामदेवरायांच्या काळापासून पंढरीच्या विठ्ठलाबद्दल प्रेमभावना होतीच.
‘बडोदा-पंढरपूर’ वारी
कालांतराने चार-पाच वर्षे सातत्य राहिलेल्या या मंडळींना सयाजीराजांनी एकदा विशेष भेटीस बोलावले व सल्ला दिला की, ‘आपण सर्व समाजाचे शक्तिसौष्ठव! आपल्याकडून ‘बडोदा ते पंढरपूर’ अशी वारी व्हायला हवी.’ तसे तातडीने होऊ शकले नाही. परंतु पुढे १९४३ मध्ये कप्तान यांनी ‘डाकोर येथील आषाढीवारीच्या अनुभवांची लेखमाला’ ‘व्यायाम’ या मासिकात प्रसिद्ध केली, लेखमालेचे नाव होते, ‘गुजरातचे पंढरपूर’.
त्यानंतर दिंडीच्या अकराव्या वर्षाच्या निमित्ताने मुजूमदारांनी महाराज सयाजीरावांच्या स्मरणार्थ पुढे ‘बडोदा ते पंढरपूर’ अशी वारी सुरू केली. अर्थातच त्याचे नेतृत्व वसंत कप्तांनांकडे होते. त्या वेळी शहरातील मल्ल झाडून सहभागी झाले आणि ‘गुर्जर-मराठी’ दिंडीने बडोद्यातून पंढरपूरपर्यंत दिंडी सुरू केली.
संत नामदेवरायांचा प्रभाव
संत ज्ञानेश्वर माउली यांच्या समाधिपश्चात संत नामदेव महाराज यांनी उत्तर भारताकडे तीर्थाटन केले होते. त्यातील द्वारका- सौराष्ट्र प्रांतात ते अडीच-तीन वर्षे होते. या काळात नामदेवरायांनी येथील ‘सोरठी मातीतील मारूं-गुर्जरी व अपभ्रंश गिरा’ अशा लोकबोलींमध्ये अनेक पदे लिहिली.
गुजरातमधील स्थानिक नोंदींनुसार नामदेवांनी ‘कीर्तन-प्रवचनातून विठ्ठल प्रेम, पंढरपूर, आषाढी एकादशीची वारीचे माहात्म्य सांगत सौराष्ट्राला भारावून टाकले होते. त्यांचा समाजावर इतका प्रभाव होता की, त्यांच्या पश्चात शंभर वर्षांनी गुजरातचे संतकवी नरसी महेता यांनीही त्यांच्या अनेक रचनांत ‘नामदेवांच्या भक्तीचे दाखले व पंढरपूर माहात्म्य’ सांगितलेले दिसते.
एवढेच नव्हे तर संत नामदेवांचा ‘आषाढी एकादशी वारी’चा ‘वसा’ हा संत नरसी महेतांनी प्रत्यक्ष ‘द्वारका वारी’ने स्वीकारला. महेतांच्या पश्चातही ‘विठ्ठलप्रेमाचा’ तो प्रवाह पुढे पाचशे वर्षे गुजराती साहित्यात जागोजागी स्पष्ट दिसतो.
नरसी महेतांची पदे...
पद १
जे हरिजननी निंदा करे। ते रौरव नरक संचरे।
जूठा पुरुषनी पक्षे धरे। ते निश्चे नरके परवरे ।।
नरसैंया नागर तुं अविधार। पूर्वे पंढरपूर मोझार।
ब्राह्मणे आणी सर्तक गाय। लइ बांधी सुलतान सभाय।।
नामदेव गाय सजीव करे। तो तुलसीमाला कंठे धरे
ते नामदेवनी जीवडी गाय। ऐवा समरथ वैकुंठराय।।
पद २
पुंडलिक विठ्ठलो हृदये धरी। उजवळ गंगाजीनो प्रवाह।
उजवळ वाणी नरसैंया तणी।।
आज जवळपास सर्वच वृत्तपत्र व दूरचित्रवाणी वाहिन्या वारीचे वार्तांकन करत आहेत. त्यावेळी सुद्धा श्रीमंत आबासाहेब मुजुमदार संस्थापित व संपादित ‘व्यायाम’ मासिकात ‘बडोदा ते डाकोर या आषाढीवारीच्या अनुभवांची लेखमाला’ प्रसिद्ध झाली होती. अर्थातच लेखमालेचे नाव होते, ‘गुजरातचे पंढरपूर!’
- मनीषा बाठे, संत वाङ्मयाच्या अभ्यासक, पुणे
अशी होती दिंडी
ब्रिटिशांचा अडथळा दिंडीला येऊ शकत होता. त्यामुळे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे उत्तराधिकारी प्रतापसिंहराव राजेंनी दिंडीबरोबर एक प्रमाणपत्र दिले. ते घेऊन एक वारकरी सर्वांत पुढे चालायचा. ‘गुर्जर-मराठी’ दिंडीने महाराज सयाजीरावंच्या स्मरणार्थ बडोदा आखाड्यांतील मराठीजनांची दिंडी महाराष्ट्रातील पंढरपूरपर्यंत अशा मोहिमेची तयारी सुरू केली होती. १९४४ पासून ते १९६९ पर्यंत दिंडीमध्ये दरवर्षी नवनवीन मान्यवरही सहभागी होत गेले, असे उल्लेख आढळतात. बडोदा येथून निघालेली ही दिंडी डुडुळगाव- आळंदी- सासवड मार्गे पंढरपूरला जायची.
मनीषा बाठे यांचे संशोधन
संत साहित्याच्या अभ्यासक मनीषा बाठे यांनी संत नामदेवरायांच्या गुजरातमधील कार्यावर संशोधन व अभ्यास केला आहे. त्याचाच भाग म्हणून बडोदा-पंढरपूर वारी विषयही पुढे आला आहे. राजस्थान, पंजाबसह अन्य राज्यातील संत नामदेवरायांच्या कार्याचा अभ्यास करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. विसाव्या शतकापर्यंत बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या सत्ताक्षेत्रातील काही नोंदी कै. आबासाहेब मुजूमदार यांच्या बडोदा-दफ्तरातून मनीषा बाठे यांनी शोधल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.