Ashadhi Ekadashi 2024 : पंढरपुरात १५ लाख वारकऱ्यांची मांदियाळी

आषाढी वारीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात सुमारे १५ लाखांपर्यंत वारकरी दाखल झाले. मंदिर परिसरासह चंद्रभागा नदीतीरी लाखो वैष्णवांची मांदियाळी जमली आहे.
Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024sakal
Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : आषाढी वारीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात सुमारे १५ लाखांपर्यंत वारकरी दाखल झाले. मंदिर परिसरासह चंद्रभागा नदीतीरी लाखो वैष्णवांची मांदियाळी जमली आहे. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा अखंड जयघोष पंढरपुरात सुरू आहे. ‘विठ्ठल-विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी,’ अशा वातावरणाने अवघी पंढरी भक्तीने भारून गेली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी श्री विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह शेजारील तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधूनही वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. यंदा पाऊसमान वेळेवर झाल्याने वारकऱ्यांत चांगला उत्साह आहे. अगदी आळंदी आणि देहूहून निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातही वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांसमवेत शासकीय महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथील शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय ५५) व त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय ५०) यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या वेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. ते मागील १६ वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत.

प्रतिमिनिटाला ३० वारकऱ्यांचे दर्शन

विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन व मुखदर्शनासाठीच्या रांगा गर्दीने ओसंडून वाहत आहेत. या रांगांमध्ये सुमारे दीड ते दोन लाख वारकरी उभे आहेत. पदस्पर्श दर्शनाला १८ ते २० तासांचा अवधी लागत असून, प्रतिमिनिटाला २५ ते ३० वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत होते.

बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचे साकडे

‘‘हे विठ्ठला, माझ्या बळीराजाला सुखी, समाधानी ठेव, कष्टकऱ्यांच्या, सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, त्यांचे दुःख दूर कर, त्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येवोत,’’ असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विठ्ठलाच्या चरणी घातले. तसेच लवकरच तिरुपती बालाजीच्या धर्तीवर दर्शनासाठी पंढरपुरातही टोकन पद्धतीने दर्शन सुरू करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक असणारा १०३ कोटी रुपयांचा निधीही त्वरित देऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.