maharashtra vidhansabha election dates
maharashtra vidhansabha election datesesakal

15 ऑक्टोबरपूर्वी विधानसभेची आचारसंहिता? 5 वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील 16000 जणांनी बदलला मतदारसंघ; शिक्षण, नोकरी, उदरनिर्वाहासाठी मतदारांचे स्थलांतर

लोकसभा निवडणुकीवेळी सोलापूर जिल्ह्यातील १५ हजार मतदारांनी स्वत:चा मतदारसंघ बदलून घेतला. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सुमारे एक हजार मतदारांनी मतदारसंघ बदलून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

सोलापूर : पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी आणि पदवी किंवा पदव्युतर पदवी पूर्ण केलेले सोलापूर जिल्ह्यातील सरासरी सात ते नऊ हजार विद्यार्थी दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातून परजिल्ह्यात जातात ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यातील १५ हजार मतदारांनी स्वत:चा मतदारसंघ बदलून घेतला. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सुमारे एक हजार मतदारांनी मतदारसंघ बदलून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, शहर मध्य, अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, सांगोला या विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदारांनी स्वत:चा मतदारसंघ बदलल्याचे चित्र आहे. शिक्षण, नोकरी किंवा उदरनिर्वाहाच्या निमित्ताने या मतदारांनी स्थलांतर करावे लागल्याने अनेकांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर फॉर्म नं.आठ भरून दुसरीकडे मतदार नोंदणी केली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उपजिल्हा निवडणूक कार्यालयाला लोकसभा निवडणुकीवेळी तब्बल १५ हजार नावे डिलिट करावी लागली होती.

आता विधानसभा निवडणुकीवेळी मतदारयादी अंतिम करताना देखील या कार्यालयाला सुमारे तीन हजार नावे कमी करावी लागली आहेत. प्रत्येकवेळी स्थलांतरित मतदारांना तेथील स्थानिक नेते मतदानाला येण्याचे आवाहन करतात. पण, आता या मतदारांनी स्वत:चा मतदारसंघच बदलल्याने त्यांना त्याच जिल्ह्यात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

दरवर्षी सरासरी ४ हजार अभियंत्यांचे स्थलांतर

सोलापूर जिल्ह्यातील १६ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी सरासरी पाच हजार विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करतात. पण, सोलापूर जिल्ह्यात अपेक्षित जॉब मिळत नसल्याने त्यातील सुमारे चार हजार अभियंते जिल्ह्याबाहेर विशेषत: पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, नाशिक अशा ठिकाणी स्थलांतर करतात ही वस्तुस्थिती आहे. स्मार्ट सिटीतून जगभरात नावलौकिक झालेल्या सोलापूर शहरात अद्याप आयटी कंपनी तथा उद्योग नाहीत हे विशेष.

विधानसभेच्या दृष्टीने सध्या प्रशिक्षणाचा टप्पा

लोकसभेवेळी जिल्ह्यातील जवळपास १५ हजार मतदारांनी फॉर्म नं.आठ भरून मतदार यादीतून नावे दुसरीकडे स्थलांतरीत केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी आता तीन हजार मतदारांची नावे डिलिट केली असून त्यात मयत व स्थलांतरीत मतदार आहेत. काहींनी परजिल्ह्यात तर काहींनी जिल्ह्यातील दुसऱ्या मतदारसंघात नावे समाविष्ठ केली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात ३७ लाख ६३ हजार ९७९ मतदार आहेत.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

१५ ऑक्टोबरपूर्वी विधानसभेची आचारसंहिता?

निवडणूक आयोगाचा गुरूवारपासून (ता. २६) शनिवारपर्यंत (ता. २८) महाराष्ट्र दौरा होणार आहे. त्यावेळी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भातील आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन आचारसंहिता कधीपासून लागू होईल हे जाहीर होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यातील मतदाराची स्थिती

  • लोकसभेपूर्वी यादीतून डिलिट

  • १५,०००

  • विधानसभेपूर्वी डिलिट मतदार

  • ३,०००

  • विधानसभेसाठी पुरुष मतदार

  • १९,३५,९७९

  • विधानसभेसाठी महिला मतदार

  • १८,२७,५०८

  • अंतिम यादीतील एकूण मतदार

  • ३७,६३,९७९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.