सोलापूर : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सातपैकी पाच दिवस तर अर्ज माघारीसाठी पाचपैकी दोन दिवसांचाच अवधी मिळणार आहे. ३१ ऑक्टोबरला नरक चतुर्थी असून त्यादिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील सुट्टी असणार आहे. पण, त्या दिवशी उमेदवारांना अर्ज माघार घेता येणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन चार दिवस झाले, तरीदेखील अद्याप ना महायुती ना महाविकास आघाडीतील पक्षाकडून उमेदवारांची एकही यादी जाहीर झालेली नाही. सर्वच पक्षांकडून बंडखोरी होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी कधीपर्यंत जाहीर होणार आणि त्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी किती दिवस मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी पाच ठिकाणी भाजपचे चिन्हावरील आमदार असून बार्शीचे आमदार भाजपपुरस्कृत आहेत. त्यामुळे सहा जागा भाजपने घेतल्यास उर्वरित पाच जागांपैकी कोणत्या जागा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार, याचा अंदाज इच्छुकांकडून बांधला जात आहे.
प्रशासनाची तयारी पूर्ण
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली आहे. इच्छुक उमेदवारांना २२ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यात शनिवार व रविवारी सुट्टी असणार आहे. उमेदवारांना अर्ज माघारीसाठी ३१ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर हे दोन दिवस मिळतील.
- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर
विधानसभा निवडणुकीचा प्रोग्राम
उमेदवारी अर्ज दाखल : २२ ते २९ ऑक्टोबर (शनिवार, रविवार सुट्टी)
अर्जांची छाननी व अंतिम यादी : ३० ऑक्टोबर
अर्ज माघार : ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर (१ ते ३ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी)
प्रचार कालावधी : ५ ते १८ नोव्हेंबर
मतदान : २० नोव्हेंबर
मतमोजणी : २३ नोव्हेंबर
निवडून येणारा उमेदवार हाच निकष
महायुतीचे जिल्ह्यातील जागावाटप अजूनही निश्चित झालेले नाही. मोठा भाऊ कोण आणि त्यांना किती व कोणत्या जागा सोडायच्या हे गणित जुळलेले नाही. तरीपण, निवडून येणारा उमेदवार हाच उमेदवारासाठी निकष राहील, असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. शुक्रवारी (ता. १८) झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेतही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज शेजवाल, अमोल शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मनीष देशमुख यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे बोट दाखवत जागा कोणतीही कोणाला मिळो, आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढू अशी भूमिका विशद केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.