तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदाराचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईनंतर विरोधी पक्षानं पावसाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक भिडले. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला. सत्ताधारी पक्षाकडून याप्रकरणी 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात यावा, असा ठराव मांडण्यात आला. हा ठराव मंजूर करण्यात आला असून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
या आमदारांवर निलबंनाची कारवाई
आशिष शेलार, पराग अळवणी, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावल, गिरीश महाजन, नारायण कुचे, राम सातपुते, योगेश सागर, हरिष पिंपळे, किर्तीकमुार उर्फ बंटी बागडीया
12 आमदाराचं निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला होता. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं. यावेळी विरोधकांचा जोरदार गदारोळ सुरु होता. कामकाज तहकूब झाल्यानंतर कुटे यांनी अध्यक्षांच्या केबिनमध्ये भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. कुटे यांनी तो आरोप फेटाळला आणि गर्दीमुळे धक्का लागल्याचा दावा केला. आम्हाला सभागृहात बोलू न दिल्याने आपण आक्रमक झाल्याचे त्यांनी मान्य केले.
विरोधकांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या- तालिका अध्यक्ष
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला. यावर बोलताना तालिका अध्यक्ष यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. सदस्यांना बसू नका असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. प्रस्ताव मांडण्यापूर्वीच विरोधकांनी हरकत घेतली. प्रस्ताव मंजूर करत असताना सदस्य व्यासपीठावर आले. विरोधकांनी माईक खेचण्याचा प्रयत्न केला. सभागृहातील गोंधळानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधक-सत्ताधारी बसून तोडगा काढतात. सभागृहाबाहेर गेल्यानंतर आपण कधीही कटुता ठेवत नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी बसल्यानंतर फडणवीस लाललाल होऊन माझ्याकडे आले, मी बोलायची संधी न दिल्याने ते रागावले होते. विरोधक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. विरोधकांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या. तुम्ही 50-60 आले तरी मी एकटा आहे. एक पाऊल सुद्धा मी मागे हटणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.