घराच्या मागच्या व पुढच्या दोन्ही दरवाजांना करंट देण्याचा प्रयत्न केला.
वांगी (सांगली) : मानव जातीला लाजवेल अशी क्रूरता सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामधील (Sangli Kadegaon) वांगी गावात पाहायला मिळाली असून पूर्व वैमनस्यातून घराला करंट देऊन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दिवंगत शंकरराव निकम यांच्या संपूर्ण कुटुंबीयानाच (Nikam Family) मारण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे.
याप्रकरणी त्यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सूरज निकम यांनी चिंचणी-वांगी पोलिस (Wangi Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वातंत्र्यसेनानी कै. शंकरराव निकम यांचे मोठे सुपुत्र अशोकराव निकम वांगीच्या उत्तरेस शिवणी रोडलगत वास्तव्यास आहेत.
काल (मंगळवारी) रात्री बारा ते दीडच्या सुमारास निकम कुटुंबीय झोपी गेल्यानंतर अज्ञातांनी जवळच असलेल्या उच्च दाबाच्या ट्रान्सफाॕर्मरमधून केबल जोडून घराच्या मागच्या व पुढच्या दोन्ही दरवाजांना करंट देण्याचा प्रयत्न केला. निकम यांच्या घराजवळ असणाऱ्या हेवी ट्रांसफार्मरमधून (Electric Current) तारा जोडून त्या शेतातील घराच्या दोन्ही बाजूला असलेल्या दाराच्या कोयंड्यांना जोडण्यात आल्या.
नायलॉनच्या दोरीने सुमारे एक हजार फूट अंतरावरून या जोडलेल्या तारांचे नियंत्रण करायचे आणि ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याची तार खेचायची अशा हेतूने हल्लेखोरांनी त्याची जोडणी केली होती. रात्री दीडच्या सुमारास त्याचा चाप खेचला असावा. त्यामुळे तारांवर अचानक लोड येऊन ट्रान्सफॉर्मर जवळ स्फोट होऊन जाळ लागला. मोठ्या आवाजाने आणि आगीमुळे जागे झालेल्या निकम कुटुंबीयांनी दरवाजा उघडला.
या स्फोटामुळे ट्रीप होऊन वीज गेल्याने सुदैवाने घराबाहेर पडताना कडी-कोयंड्यांना हात लागूनही त्यांना विजेचा धक्का बसला नाही. काही वेळाने वीज पूर्ववत आल्यानंतर सूरज निकम यांच्या मातोश्रींना हलकासा करंट जाणवला. त्यानंतर पुन्हा तारा ट्रीप झाल्या. सावध झालेल्या निकम कुटुंबीयांनी हा आपल्याला सहकुटुंब मारून टाकण्याचा डाव आहे हे जाणून तातडीने बचावाच्या हालचाली केल्या.
या दरम्यान काही लोक तेथे मोठमोठ्याने बोलत असल्याचे आणि पिकाचा फायदा घेऊन धावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, हे हल्लेखोर कोण होते त्याचा अंधारामुळे सुगावा लागला नाही. मध्यरात्रीनंतर अशोकराव यांचे पूत्र सूरज निकम यांनी पोलिसांना याबाबत कळवले. याप्रकरणी सूरज निकम यांनी काही व्यक्तींच्या बाबतीत संशय व्यक्त केला असून त्यांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. घटनेचा अधिक तपास स.पो.नि.संदीप साळुंखे करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.