सोलापूरः सोलापूरमध्ये आज बकरी ईदच्या दिवशी धक्कादायक प्रकार घडला आहे. ईदगाह मैदानावर जिथे मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी येतात तिथे 'लव्ह पाकिस्तान' असं लिहिलेले फुगे विकले जात होते. मुस्लिम बांधवांच्या हा प्रकार लक्षात आला आणि सदरील फुगे विकणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे.
आज बकरी ईद आणि आषाढी एकादशी दोन्हीही सण आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण असल्याचं दिसून येतंय. त्यातच सोलापूरमध्ये ईदगाह मैदानावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी येतात. आज नमाज पठण झाल्यानंतर तिथे फुगेवाला 'लव्ह पाकिस्तान' असं लिहिलेले फुगे विकत असल्याचं लक्षात आलं.
ही गंभीर बाब मुस्लिम बांधवांच्या लक्षात आल्यानंतर त्या फुगेवाल्याला तातडीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सदरील फुगेवाला अशिक्षित होता. परंतु हे फुगे कुठे तयार झाले, कुठल्या होलसेल विक्रेत्याकडून त्याने खरेदी केले, याची चौकशी पोलिस करीत आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएमच्या वतीने करण्यात आलेली आहे.
''हा गंभीर प्रकार असून ईदच्या दिवशी आई-वडील छोट्या-छोट्या मुलांना घेऊन येतात, मुलं फुगे खरेदी करतात. त्याच फुग्यांवर असं लिहिल्याचा धक्कादायक प्रकार आहे. सामाजित तेढ निर्माण करण्याच प्रयत्न असून यातील आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करा'' अशी मागणी रियाज सय्यद यांनी केली आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
बकरी ईद निमित्त सोलापुरात ठिकठिकाणी आज सकाळी नमाज पठण झाले. नमाज पठणासाठी लहान मुले सोबत येतात. मुले फुगे खरेदी करतात. सोलापुरातील होटगी रोडवरील शाही आलमगीर ईदगाह मैदानावर नमाज पठणाच्या ठिकाणी रंगीबेरंगी फुगे विक्रीसाठी एक युवक आला होता. त्याच्याकडे असलेल्या हिरव्या रंगाच्या फुग्यावर लव पाकिस्तानचा उल्लेख असल्याचे मुस्लिम युवकांना आढळले.
नमाज पठण सुरू होण्यापूर्वी या युवकांनी त्या फुगे विक्रेत्याकडे या फुग्यां संदर्भात विचारणा केली. नमाजाच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास ही बाब त्या युवकांनी आणून दिली. एमआयमच्या वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष रियाज सय्यद यांनी या संदर्भात विजापूरनाका पोलिस ठाण्याला निवेदन देऊन या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
नमाजच्या ठिकाणी लव पास्किस्तानचे फुगे विक्रीसाठी आलेल्या युवकाला हे फुगे कोठून मिळाले?, अशा पध्दतीचे फुगे विक्री करण्या मागे कोणाचे षडयंत्र आहे का? यासह सर्व प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी एमआयएमच्यावतीने करण्यात आली आहे.
नमाज पठणाच्या ठिकाणी मुस्लिम युवकांनी दाखविलेली सजगता, तत्परता यामुळे सार्वजनिक शांतता कायम राखण्यास मदत झाली आहे. या घटनेनंतर सोलापुरातील पोलिस सतर्क झाले असून फुगे विक्रेत्याने कोठून फुगे आणले? याचा कसून तपास केला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.