दोन दिवसांत रामराजे अध्यक्षपदासाठी एक नाव अंतिम करतील आणि शरद पवार, अजित पवार त्यावर मोहर उमटवतील.
सातारा : देशभरातील सहकार अडचणीत असताना बँकेचा (Satara District Bank Election) कारभार यापुढे अधिक पारदर्शकपणे आणि पुरेसा वेळ देऊन करावा लागणार आहे. नवा अध्यक्ष त्यादृष्टीनेही सक्षम हवा. नेतानिवड करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या नेत्यांनी एक बाब लक्षात घ्यायला हवी, ही बँक जिल्ह्याची महत्त्वाची आर्थिक संस्था आहे... झेडपी नव्हे..!
आजपासून बरोबर चार दिवसांनी सहकार क्षेत्रात राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या आणि देशभरात आपला नावलौकिक वाढविलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणा एकाच्या गळ्यात पडलेली असेल. ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची सध्या जिल्ह्यातील जनतेत उत्सुकता आहे आणि ती तशी असणे साहजिकही आहे. कारण, फार मोठी परंपरा असलेल्या जिल्ह्याच्या या आर्थिक सत्ताकेंद्राच्या अध्यक्षपदी तशीच सक्षम व्यक्ती असायला हवी, असं जनतेला वाटतं. म्हणूनच गेली काही वर्षे या बँकेत मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणारे बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar), राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), बँकेचे सध्याचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle), मकरंद पाटील (Makarand Patil) नव्या अध्यक्षपदाबाबत काय निर्णय घेणार, याकडे जनतेच्या नजरा आहेत.
अध्यक्षपदासाठी नव्या संचालक मंडळातील नितीन पाटील यांच्यासह आणखी काही नावे चर्चेत असल्याचं सांगितलं जातं. स्वतः शिवेंद्रसिंहराजेही पुन्हा इच्छुक असल्याची चर्चा आहे. अर्थात, यापैकी कोणीही अद्याप आपल्या नावाचा उघड दावा केलेला नाही. ही सारी नावे अजून तरी मीडियातच आहेत. नाही म्हणायला नितीन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मात्र सहकारमंत्र्यांना भेटून त्यांच्या नावाचा आग्रह धरलेला आहे. येत्या दोन दिवसांत रामराजे आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेते अध्यक्षपदासाठी एक नाव अंतिम करतील आणि पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार त्यावर मोहर उमटवतील. खरेतर ही बँक केवळ बँक नसून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी या बँकेची धुरा सांभाळली. हे करत असताना आपले पक्षीय अभिनिवेश नेहमीच बाजूला ठेवले. राजकारणाचे जोडे घालून कोणीच बँकेत गेले नाही.
अगदी बाळासाहेब देसाई, किसन वीरांपासून सुरू झालेली ही परंपरा रघुनाथराव पाटील, जयसिंग बडदरे, केशवराव पाटील, नरसिंग सस्ते, बाबूराव घोरपडे, सुरेश वीर, भि. दा. भिलारे, विलासराव पाटील-उंडाळकर, दादाराजे खर्डेकर, बकाजीराव पाटील, सदाशिवराव पोळ, विलासराव पाटील-वाठारकर, लक्ष्मणराव पाटील आणि अगदी अलीकडच्या काळात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या रूपाने युवा नेत्यानेही जोपासली, पुढे नेली. विधान परिषदेचे सभापती, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर हे नेहमीच सहकारात तरुण नेतृत्व आले पाहिजे, या भूमिकेचे समर्थन करताना दिसून आले. अनेक संचालक मंडळांनी गेली कित्येक वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेला एक उंची प्राप्त करून दिली. या सगळ्याच नेत्यांनी आपलं राजकारण आणि बँक यात कायम अंतर राखलं. बँकेची आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही. शेतकरी सभासदांना अल्पदरात पतपुरवठा कसा होईल, ठेवीदारांचे हित कसे जोपासले जाईल, याची नेहमीच दक्षता घेतली. परिणामी, बँकेने प्रगतीचे अनेकानेक टप्पे गाठले. बँकेची ख्याती सर्वदूर पोचली.
अर्थात, याआधीही अनेकदा बँकेसाठी मोठा राजकीय संघर्ष झाला होता. अगदी ‘पॅनेल टू पॅनेल’ निवडणुकाही झाल्या होत्या; पण या मंडळींनी नंतर बँक चालवताना शेतकरीहितासाठी बँकेत राजकारण येऊ दिलं नाही. त्यामुळे लोकांना ही जिल्हा बँक नेहमीच आपली वाटली. या विश्वासामुळेच बागायती क्षेत्राबरोबर अगदी दुष्काळी टप्प्यातील लोकांच्याही भरभरून ठेवी या बँकेत दिसून येतात. विलासराव पाटील-उंडाळकर, अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील या दिग्गजांनी तर अनेक वर्षे या बँकेचं प्रतिनिधित्व केले. त्यांनी बसविलेली आर्थिक घडी विस्कटू नये, याची काळजी पुढे रामराजे आणि (कै.) लक्ष्मणराव पाटील या जोडगोळीने घेतली. त्या काळात या दोघांना राम-लक्ष्मणाची जोडी असं गंमतीनं संबोधलं जायचं. याच दोघांनी पुढे उदयास आलेल्या शिवेंद्रसिंहराजे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला बँकेत संधी दिली. शिवेंद्रसिंहराजेंनी या संधीचे सोने करत पुढे अध्यक्षपदापर्यंत मजल मारली, हे सर्वश्रूत आहे. बँकेच्या आज दिसत असलेल्या या यशामागे या सर्व नेत्यांनी निर्माण केलेली परंपरा आहे. राज्यातील अनेक बँका अडचणीत असताना साताऱ्याची ही बँक कायमच पहिल्या तीनमध्ये राहिली आहे. शेतकरी हितासोबतच त्यांच्या पैशाचं रक्षण करणाऱ्या नेतृत्वाची परंपरा बँकेला लाभली. बँकेचं आजचं यश हे त्याचेच तर द्योतक आहे.
बँकेची ही परंपरा पुढे जायला हवी. ती पुढे नेणारा, जिल्हा बँकेतील ज्येष्ठ आणि नव्याने आलेल्या नेत्यांत समन्वय राखू शकणारा अभ्यासू नेता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडायला हवा. ज्येष्ठ मंडळींकडून नेतानिवडीत नक्कीच याचा विचार केला जाईल. त्या दृष्टीने नितीन पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. श्री. पाटील यांना बँकेतील कामाचा अनुभव आहे. त्यांच्याकडे सध्यातरी दुसरी मोठी कोणती राजकीय जबाबदारी नाही. त्यामुळे ते बँकेसाठी पूर्ण वेळ देऊ शकतात. रामराजे, बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबतच ते इतर संचालकांबरोबरही समन्वय राखून काम करू शकतात. त्यांचे इतर नेत्यांशीही चांगले संबंध राहिलेले आहेत. अगदी उदयनराजे भोसले यांनीही राजकीय अडचणींच्या काळात (कै.) लक्ष्मणराव पाटील यांचे आशीर्वाद घेतल्याचे जनतेने पाहिले आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही बँकेच्या संचालक मंडळात पहिल्यांदा निवड झाल्याच्या काळापासून लक्ष्मणरावतात्यांबाबत नेहमीच कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा नितीन पाटलांसाठी होकार येऊ शकतो. या साऱ्या पाटलांच्या जमेच्या बाजू आहेत.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मावळती कारकिर्दही बँकेच्या परंपरेला साजेशी ठरली. मधल्या काळात त्यांनी केलेल्या पक्षांतराचा कोणताही विपरित परिणाम त्यांनी बँकेच्या कामकाजात होऊ दिला नाही आणि संचालक मंडळानेही त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. त्यांची उमेदवारीही अध्यक्षपदासाठी योग्य ठरू शकते; पण बँकेच्या निवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामोडी त्यांच्यासाठी मायनस ठरू शकतात. निवडणुकीत उडालेला राजकीय धुरळा बँकेत येऊ नये, यासाठी ते स्वतःच मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहण्याचा निर्णय घेऊन आपल्यातील राजकीय प्रगल्भतेचं दर्शन घडवू शकतात. या वेळच्या निवडणुकीचं आणखी एक फलित म्हणजे अनेक नेते बँकेत प्रथमच प्रवेश करते झाले आहेत. सत्यजितसिंह पाटणकर, शिवरुपराजे खर्डेकर, शेखर गोरे, सुनील खत्री, ज्ञानदेव रांजणे, ऋतुजा वाठारकर आदींना बँकेच्या संचालक मंडळात काम करण्याची संधी मिळालेली आहे. या सर्वांनी मिळालेल्या या संधीचं सोनं करायला हवं. त्यांनी या निमित्ताने सहकारातील बँक समजून घ्यावी. अभ्यास करावा. भविष्यात यातूनच बँक सक्षमपणे सांभाळणारे नेतृत्व उभे राहू शकते.
असो! या सर्व पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे येत्या चार-पाच दिवसांतच स्पष्ट होईल. बँकेच्या आजवरच्या नेत्यांनी जपलेली परंपरा, घालून दिलेली आर्थिक घडी विस्कटू न देता बँकेला पुढे घेऊन जाणाऱ्या कोणाही सक्षम व्यक्तीच्या गळ्यात ती पडो... एवढीच अपेक्षा! सध्या काळ आव्हानात्मक आहे. सहकारात नव्याने येऊ घातलेले कायदे, नियमावली, सुधारणा या बाबी अडचणी निर्माण करणार आहेत. देशभरातील सहकार अडचणीत असताना बँकेचा कारभार यापुढे अधिक पारदर्शकपणे आणि पुरेसा वेळ देऊन करावा लागणार आहे. नवा अध्यक्ष त्यादृष्टीनेही सक्षम असायला हवा. नेतानिवड करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या नेत्यांनी एक बाब लक्षात घ्यायला हवी, ही बँक जिल्ह्याची महत्त्वाची आर्थिक संस्था आहे... झेडपी नव्हे..!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.