शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरेचे नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं होतं. त्यांचा यांचा जन्म श्रावण शुद्ध चतुर्थी, शके १८४४ म्हणजेच २९ जुलै १९२२ रोजी झाला होता. नुकतेच त्यांनी १०० व्या वर्षात प्रदार्पण केले होते. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण प्लेगच्या साथीमुळे त्यांना पुण्यात स्थलांतर करावे लागले होते. त्यांचे वडील मोरेश्वर पुरंदरे हे पुण्यात भावे शाळेत चित्रकला शिक्षक होते. त्याच शाळेत बाबासाहेबांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये त्यांनी ज्युनिअर बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले होते.
बालपणापासूनच इतिहासाचे असलेले प्रेम उत्तरोत्तर वाढतच गेले. वयाच्या १६व्या वर्षापासून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे, महाराष्ट्राच्या इतिहासाचे, उज्ज्वल परंपरेचे अभ्यासपूर्ण संशोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करत. ज्येष्ठ इतिहासकार आणि कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्याबद्दल बोलताना एकदा पु. ल. देशपांडे म्हणाले, ‘‘देशस्थी रंगाचा, कायस्थी अंगाचा, लेंगा व शर्ट घालणारा, हसतमुख माणूस इतिहासकार आहे. यावर माझा प्रथमदर्शनी विश्वासच बसला नाही. बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे भारदस्त, साक्षात कुठल्याही ऐतिहासिक अष्टप्रधान मंडळात सहजी खपून जाईल ऐसे नाव धारण करणारे हे इतिहासकार प्रथमदर्शनी इतिहासकार वाटतच नाहीत.’’
इतिहास माजघरापर्यंत गेला..
‘इतिहास’ माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे बाबासाहेब म्हणत. भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करत असतानाच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली.
‘ठिणग्या’ : छत्रपतींवरील पहिले पुस्तक
बाबासाहेबांनी वयाच्या १२ व्या वर्षी नारायणराव पेशवे यांच्या जीवनावर एक ऐतिहासिक कादंबरी लिहिली होती. अर्थात ती प्रसिद्ध झाली नाही. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी काही कविताही लिहिल्या होत्या. अगदी लहान वयातच बाबासाहेबांनी शिवाजी महाराजाच्या आयुष्यावर कथा लिहील्या. त्या सर्व एकत्रित करूण १९४६ मध्ये ‘जळत्या ठिणग्या’ या पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. राजा शिव-छत्रपती हे त्यांच्या आयुष्यातील प्रसिद्ध लिखाण आहे.
जाणता राजा..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेले ‘जाणता राजा’ हे १९८५ मध्ये प्रसिद्ध झालेले नाटक सर्वांत प्रसिद्ध व लोकप्रिय ठरले. तेव्हापासून हे नाटक महाराष्ट्रासह आग्रा, दिल्ली, भोपाळ तसेच अमेरिकेतही गेले. या नाटकाचा ८६४ वेळा प्रयोग केला गेला आहे. मूळ प्रत मराठी व नंतर हिंदी मध्येही याचे भाषांतर करण्यात आले. हे नाटक २०० पेक्षा जास्त कलाकारांकारून रंगवले गेले आहे, तसेच यात हत्ती, उंट व घोड्यांचा सुद्धा समावेश असतो. नाटक क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना मध्य प्रदेश सरकार कडून २००७-०८ साली ‘कालिदास सन्मान’ हा पुरस्कार दिला गेला होता.
पद्मविभूषण..
बाबासाहेबांनी शिवरायांसोबतच पुण्याच्या पेशव्यांचाही गहन अभ्यास केला आहे. बाबासाहेबांनी १९७० च्या काळात माधव देशपांडे व माधव मेहेरे व बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेत मार्गदर्शन केले. १९ ऑगस्ट २०१५ रोजी बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. पुरंदरे यांच्या अव्याहत आणि अथक अशा ‘ऐतिहासिक’ कार्याची दखल भारत सरकारने घेतली असून २०१९ साली त्यांना ‘पद्मविभूषण’ने सन्मानित केले होते.
बाबासाहेब-गोनीदा..
बाबासाहेब आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय मेहुणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.
दिग्गजांचा सहवास..
सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, इतिहास संशोधक न. र. फाटक आणि सेतुमाधवराव पगडी, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, प्रसिद्ध वक्ते शिवाजीराव भोसले, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, प्रसिद्ध साहित्यिक नरहर कुरूंदकर, कवी कुसुमाग्रज, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि विजय भटकर यांचा सहवास त्यांना लाभला. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. ‘शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.