"जेव्हा पवारांनी मातोश्रीवर बॉम्बहल्ल्याचा कट शिजल्याची टिप दिली, मग बाळासाहेबांनी..."; राणेंनी सांगितला थरारक किस्सा

Balasaheb Thackeray Death Anniversary
Balasaheb Thackeray Death Anniversary
Updated on

Balasaheb Thackeray Death Anniversary: मुंबई शहरावर 4 दशके राज्य करणारे बाळासाहेब ठाकरे आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. लोक त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणतात. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बाळ केशव ठाकरे होते पण ते बाळासाहेब ठाकरे म्हणून लोकप्रिय होते. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. आज त्यांच्या 11वा स्मृतिदिन आहे.

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा एक किस्सा नारायण राणे यांनी सांगितला आहे. नारायण राणे त्यावेळी शिवसेनेत होते. ते मुख्यमंत्री पदावर देखील होते. दरम्यान त्यांनी त्यांचे आत्‍मचरित्र झंझावात मधील एक किस्सा शेअर केला आहे.

नारायण राणे यांनी फेसबुकवर शेअर केलेला किस्सा...

शरद पवार यांनी उध्‍दवजींना सावध केलं की, मातोश्रीवर बॉम्‍बहल्‍ला करण्‍याचा कट शिजल्‍याची पक्‍की खबर येत असून त्‍यासाठी अतिरेकी मुंबईत पोहोचले देखील आहेत. पण, पवारांच्‍या काळजीचं कारण वेगळंच होतं. त्‍यांच्‍या मते, या कटात चक्‍क काही घरभेदी सामील होते. साक्षात मातोश्रीच्‍या आतल्‍या गोटातले घरभेदी. त्‍यांना साथ होती राज्‍याच्‍या पोलीस दलातल्‍या आणि गृहमंत्रालयातल्‍या सूर्याजी पिसाळाच्‍या अवलादींची... पवारांनी सांगितलं की, हा हल्‍ला परवाच्‍या दिवशी होणार आहे. त्‍यांनी उध्‍दवजी यांना पोलीस बंदोबस्‍त वाढवण्‍याबद्दल विचारणा केली आणि त्‍यांना सावधगिरीचा सल्‍ला दिला की, ही बातमी ठाकरे कुटुंबाव्‍यतिरिक्‍त बाहेर कळता कामा नये.

या बातमीनं सुन्‍न झालेल्‍या उध्‍दवजी यांनी तातडीने यावर साहेबांशी बराच वेळ चर्चा केली. बाळासाहेबांनी घरातल्‍या प्रत्‍येक सदस्‍याला सुरक्षित ठिकाणी निघून जाण्‍याचा आणि काही दिवस 'मातोश्री' पासून दूर राहण्‍याचा आदेश दिला. त्‍यांनी सर्वांना असा सल्ला दिला की, कुणालाही एकमेकांच्‍या या ठावठिकाण्‍याबद्दल कसलीच कल्‍पना असता कामा नये. मग, दुसऱ्याच दिवशी साहेब आपली पत्‍नी श्रीमती मीनाताई आणि त्‍यांचा विश्‍वासू सेवक थापा यांच्‍यासमवेत त्‍यांच्‍या मित्‍सुबिशी पजेरो गाडीने लोणावळयाकडे निघाले.

बाळासाहेबांसाठी त्‍या काळात एकच सुरक्षित ठिकाण होतं आणि ते म्‍हणजे लोणावळा. लोणावळयाला निघण्‍यापूर्वी साहेबांनी मला मातोश्रीवर बोलाविले. त्‍यांनी मला विचारले, काय करतोस?  कुठे जाणार आहेस काय?  उद्या सकाळी तू तुझा फौजफाटा घेऊन मातोश्रीवर ये. कुठे जायचे ते मी सकाळी सांगेन. माझ्या गाडीमागे यायचं काहीही विचारायचं नाही.

मी म्‍हणालो, ठीक आहे साहेब. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मातोश्रीवर पोहोचलो. मी येताच साहेबांची गाडी कलानगरातून बाहेर पडली. तिथून ती सरळ लोणावळ्याला एका बंगल्‍याजवळ जाऊन थांबली. त्‍या बंगल्‍याच्‍या आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्‍त लागलेला होता. साहेब त्‍या बंगल्‍यात थांबले. त्‍या बंगल्‍याच्‍या समोरच्‍या बंगल्‍यात आम्‍हा शिवसैनिकांची आणि पोलिसांची राहण्‍याची व्‍यवस्‍था होती.

Balasaheb Thackeray Death Anniversary
Maratha Reservation : PM मोदींना भेटल्यावरच मराठा आरक्षणाचा तोडगा निघेल, अन्यथा..; काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

रात्री साहेबांनी मला बोलावून घेतले आणि विचारले की, व्‍यवस्‍था चांगली झाली आहे काय? मी 'होय' असे सांगितले. तो डिसेंबरचा उत्‍तरार्ध असल्‍यामुळे थंडी मोठया प्रमाणावर होती. रात्री २ वाजताच्‍या सुमारास माँसाहेब गॅलरीत आल्‍या. त्‍यांनी पाहिलं की, आम्‍ही चार जण एका गाडीमध्‍ये बंगल्‍याच्‍या समोरच बसलो आहोत आणि गाडीच्‍या बाहेर शेकोटी पेटविलेली आहे. त्‍यांनी वरुनच विचारले, 'काय राणे, झोप येत नाही काय?' मी म्‍हणालो, 'नाही. माँसाहेब, आम्‍ही जागतो आहोत.' त्‍यानंतर, त्‍यांनी चहा वगैरे काही पाहिजे का, अशी विचारणा केली. मी 'नाही' म्‍हणालो, तेवढ्यात, साहेब पण बाहेर गॅलरीत आले. त्‍यांनी आमची विचारपूस केली आणि जेवण झाले काय, याचीही चौकशी केली. त्‍यानंतर माँसाहेब आणि साहेबसुध्‍दा आत गेले.

मारेकऱ्यांनी आमचा माग काढला असेल किंवा नसेल. पण, मला नशिबावर हवाला ठेवून चालणार नव्‍हतं. या सुरक्षारक्षकांचा काय भरवसा, कोण कधी फिरेल, काही सांगता येतं? धोका फार मोठा होता. साहेबांच्‍या सुरक्षिततेसाठी आम्‍हा शिवसैनिकांना संपूर्ण रात्र डोळ्यांत तेल घालून उभं राहावं लागणार होतं. साहेबांवर माझं प्रेम आणि निष्‍ठा होती, ती अशी. शेवटी ते माझे गुरु होते, पितृतुल्‍य होते...

Balasaheb Thackeray Death Anniversary
Assembly Elections: मध्य प्रदेशात मतदानापूर्वी मोठा राडा, काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारामारी; पोलिसांकडून अश्रुधुरांचा मारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.