मुंबई: २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने पहिलीच्या वर्गासाठी लागू केलेल्या मराठी बालभारती या पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ ही कविता हिंदी, इंग्रजी शब्दांमुळे वादात सापडली आहे. कवितेत असलेल्या हिंदी, इंग्रजी, अरबी शब्दांच्या वापरावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत, तर काही भाषाप्रेमींनी या कवितेत असलेल्या ‘वन्समोअर, वन्समोअर झाला शोर!’ या ओळीतील इंग्रजी शब्दांवर आक्षेप घेतले असून यावर सोशल मीडियावर खमंग चर्चा रंगली आहे.
पहिलीच्या ‘बालभारती’च्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ ही मूळ कविता पूर्वी भावे यांची आहे. ही कविता भावे यांनी लहानपणी लिहिली असल्याचेही काही दावे सोशल मीडियावर सुरू आहेत. अशा प्रकारच्या कविता मराठी बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकात टाकून बालभारतीच्या भाषा अभ्यास गट आणि इतर समित्यांनी आपली गुणवत्ता दाखवून दिल्याचेही सोशल मीडियावर म्हटले आहे.
एका फेसबुक पोस्टवर या कवितेतली मुलगी ही कोकणस्थ आहे. कारण तिने वरचा ‘सां’ (अनुस्वारासह) लावला आहे. शिवाय बालवयातच कवितांबद्दल तिटकारा निर्माण करण्याचे महद्कार्य करणारे बालभारती, शिक्षण खाते, शिक्षण मंत्रालय किंवा जे कोणी असेल त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. कवयित्रीचे तर नित्य प्रातःस्मरण केले पाहिजे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया फेसबुकवर एका अभ्यासकाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे, या कवितेच्या कवयित्रीला पूजा खेडकरचीही उपमा दिली आहे.
‘जंगलात ठरली मैफल’ ही कविताच मुळात आंग्लाळलेली दिसते. अशा प्रकारची कविता बालभारतीने निवडलीच कशी, असा सवाल आहे. मराठीत अनेक चांगल्या कवितांचा खजिना असताना अशा प्रकारची इंग्रजीमिश्रित आणि चुकीची कविता घेण्याची गरज मंडळाला आणि बालभारतीच्या तज्ज्ञांना वाटणेच मुळात दुर्दैव आहे.
- डॉ. प्रा. दीपक पवार, मराठी भाषा अभ्यासक
पहिल्या वर्गातील मुलांवर मराठी भाषा संस्कार करण्यासाठी कविता निवडताना मराठीचे अधिकाधिक हिंदीकरण, इंग्रजीकरण करण्यासाठी इंग्रजी, हिंदी शब्द असणाऱ्या कविता निवडाव्या, असे निवड आणि संपादक मंडळाला कोणाचे निर्देश आहेत का, ‘सा’वर अनुस्वार कशाला, ‘वाघोबा म्हणाले, नाही ना बात’ म्हणजे काय, ही कोणती मराठी बालकविता आहे? ज्यांना पहिल्या वर्गातील मुलांवर मराठी संस्कार घडवायला मराठी शब्ददेखील ठाऊक नसावेत अशांची ही कविता लादणारे कोण विद्वान आहेत?
- श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ साहित्यिक
अरबी, फारसी शब्द आहेत. वन्समोअर इंग्रजी, तर शोर हा शब्द आहे. पूर्वी भावे यांच्या कवितेत नीट यमक जुळविण्याचा पत्ताही नाही. लांबलचक गद्य ओळी एकमेकांना जुळवून कविता करण्यात आल्याचे दिसते. अशा प्रकारच्या कविता केवळ नावे, आडनावे भारदस्त असल्याने अभ्यासक्रमांना लावल्या जात असतील, तर ते खेदजनक आहे.
- नितीन सावंत, मराठी भाषा अभ्यासक
२०१७ मध्येही कवयित्री पूर्वी भावे यांची जंगलात ठरली मैफल ही कविता पहिलीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. यातून मुलांना स्कीलबेस शब्दही कळावेत, असा एक प्रयत्न त्यात आहे. कवयित्रीने यमक जुळविण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यातून काही चुकीचा संदेश जात नाही. आता या कवितेला समाविष्ट करून सात वर्षे झाली, मात्र यात आक्षेपार्ह आणि कोणत्या विषयाचे विडंबन होईल, असे काहीही नाही. शिवाय भावना दुखावल्या असाही विषय यात नाही. ही कविता बडबड गीते स्वरूपात आहे. कवितेच्या ओळीत अवधान खेचून ठेवण्याचा उद्देश आहे.
- कृष्णकुमार पाटील, अध्यक्ष, बालभारती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.