सोलापूर : महाविद्यालय शिक्षण घेताना अनेक हुशार विद्यार्थ्यांना कौटुंबिक परिस्थितीमुळे महागडे शिक्षण घेता येत नाही. अनेकांना शिक्षकाचे आकर्षण असते. त्यामुळे त्यांचा कल ‘बीएड’कडे होता. पण, आता जुनी पेन्शन योजना बंद, शिक्षणसेवक म्हणून तीन वर्षे सेवेची अट, नोकरभरतीची प्रतीक्षा, नोकरीसाठी संस्थाचालकांना द्यावे लागणारे डोनेशन अशा प्रमुख कारणांमुळे बीएड महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नाहीत. विविध कारणांमुळे जिल्ह्यातील आठ महाविद्यालये बंद झाली आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी २३ बीएड महाविद्यालये होती. डीएड कॉलेजचाही भाव वधारलेला होता. चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास लगचेच नोकरी मिळत होती. पण, आता ही पदवी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊनही टीईटी, टेट उत्तीर्ण होऊन पुन्हा नोकरीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे मागील विद्यार्थ्यांचे अनुभव पाहून आता बीएड, डीएडकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे.
अनेकांनी बीएड, डीएड करूनही नोकरी मिळत नसल्याने पर्यायी रोजगार स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांना विद्यार्थी मिळत नसल्याने महाविद्यालये बंद करावी लागली आहेत. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार बीएड, डीएड महाविद्यालयांमध्ये बदल होणार आहे. सध्या चालू महाविद्यालयांचे क्लस्टर तयार करून दोन वर्षांचे बीएड, डीएड आता चार वर्षांचे होणार असून त्यात विद्यार्थ्यास पदवीसह बीएड, डीएडचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात ‘बीएड’ चार वर्षांचे
नवीन शैक्षणिक धोरणांनुसार आता बीए, बीकॉम, बीएस्सी करून दोन वर्षांचे बीएड बंद होणार आहे. नवीन धोरणांनुसार पदवीचे शिक्षण घेत घेतच बीएडचा अभ्यासक्रम त्यात समाविष्ट असणार आहे. चार वर्षांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या विद्यार्थ्यास अभ्यासक्रमानुसार (शाखा) बीए.बीएड, बीएससी-बीएड, बीकॉम.बीएड अशी पदवी मिळणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या बीएड महाविद्यालयांना आगामी काही वर्षांत स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागणार आहे. त्याची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात २०२३ पासून प्रभावीपणे होणार आहे.
जिल्ह्यातील ‘ही’ ८ महाविद्यालये बंद
१) सोजर टिचर ट्रेनिंग सेंटर, बार्शी, २) श्री स्वामी समर्थ एमएड महाविद्यालय, गादेगाव रेाड, बार्शी, ३) पार्वती ताड शिक्षणशासत्र मविद्यालय, मंगळवेढा, ४) श्री विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर, ५) श्री विठ्ठल एमएड महाविद्यालय, वेणुनगर, ६) राजाराम भोसले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, करोळे, ७) जय जगदंबा एमएड महाविद्यालय, वैराग व ८) श्री सचिन टी. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय, रुई (बार्शी).
नवीन धोरणांनुसार सध्याच्या महाविद्यालयांना करावा लागेल बदल
नवीन शैक्षणिक धोरणांनुसार आता बीएड चार वर्षांचे होणार असून बारावीनंतर विद्यार्थ्यांना चार वर्षांत पदवीसह बीएडची पदवी मिळणार आहे. टप्प्याटप्याने या महाविद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल करून घ्यावा लागणार आहे.
- डॉ. राजनीश कामत, प्रभारी कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापर विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.