Vijay Wadettiwar : महायुतीकडून विश्वासघात; वडेट्टीवारांचा आरोप

‘जनतेचा विश्वास गमावलेल्या महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज, महाभ्रष्टाचारी महायुती सरकारने शेतकऱ्यांसह जनतेचा विश्वासघात केला,’
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwarsakal
Updated on

‘जनतेचा विश्वास गमावलेल्या महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज, महाभ्रष्टाचारी महायुती सरकारने शेतकऱ्यांसह जनतेचा विश्वासघात केला,’ असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असल्याचे स्पष्ट केले.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ‘प्रचितगड’ या शासकीय निवासस्थानी आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, ‘शेकाप’चे आमदार जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, ‘या सरकारकडून शेतकऱ्यांच्या खतांवर, बियाणांवर, ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारांवर १८ टक्के जीएसटी लावला जात आहे. तर दुसरीकडे हेलिकॉप्टर खरेदी करत असताना पाच टक्के, हिरे खरेदी करत असताना तीन टक्के, सोने खरेदी करत असताना दोन टक्के जीएसटी लावला जात असल्याचे सांगत, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आणि त्यांना उद्ध्वस्त करणारे असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ‘नीट’ आता दलालांच्या हातात गेली आहे. तरी देखील महाराष्ट्र सरकारने आपल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी नाही. राज्यात तलाठी भरतीमध्ये तसेच इतर भरतींमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे परीक्षार्थी नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. त्यामुळे याच अधिवेशनात सरकारने पेपरफुटीविरोधात कडक कायदा करण्याची मागणी करणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘राज्यात आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक चिघळवला जात आहे. मराठा-ओबीसी, आदिवासी-धनगर यांच्यामध्ये संघर्ष उभा करून जाती-जातीत भांडणे लावणे हा महायुती सरकारचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे आरक्षणचा प्रश्न सोडविण्यासाठी जात निहाय जनगणना करवी.’

‘राज्यात महिला, दलितांवरील अत्याचार वाढले आहेत, खून, दरोडे, बलात्काराचे गुन्हे वाढले असून गुडांनी डोके वर काढले आहे. तसेच वाळू माफियांचा हैदोस वाढला आहे. पुणे, नागपूर येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणामुळे नाचक्की झाली. महायुती सरकार राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली आहे,’ अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढले.

चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध

शालेय शिक्षण मंत्री हे जाहीर कार्यक्रमात मनुस्मृतीचा श्लोक पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणार असल्याचे सांगत आहेत. म्हणजे मनुस्मृतीचा चंचुप्रवेश करून तुमची पुढची भूमिका काय असणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याच्या धोरणाला कडाडून विरोध करणार असल्याचे महाविकास आघाडीने स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.