Chhagan Bhujbal : सलोख्यासाठी पुढाकार घ्या;आरक्षणवादावरून भुजबळांचे पवारांना साकडे,‘सिल्व्हर ओक’वर दीड तास चर्चा

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बारामती येथील सभेतून गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी अचानक पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalsakal
Updated on

मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बारामती येथील सभेतून गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी अचानक पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र ही भेट राजकीय नसून राज्यातील दोन समाजांतील सलोखा कायम राहावा, सध्या निर्माण झालेल्या स्फोटक परिस्थितीत पवारांनी लक्ष घालावे यासाठी त्यांना भेटल्याचे भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भुजबळ म्हणाले ‘‘ आज सकाळीच शरद पवार यांच्याकडे गेलो. प्रकृती बरी नसल्याने ते झोपून होते. त्यामुळे मी एक-दीड तास थांबलो त्यानंतर ते उठले आणि त्यांनी मला आत बोलाविले. ते बिछान्यावरच झोपून होते. थोड्या वेळानंतर आम्ही दीड तास चर्चा केली.’’ या भेटीचे कारण विचारले असता भुजबळ म्हणाले ‘‘ आपण कोणत्याही राजकीय हेतूने आलेलो नसल्याचे त्यांना सांगितले. मी राजकीय नेता, मंत्री, आमदार म्हणून आलेलो नाही. कोणतीही पक्षीय भूमिका घेतलेली नाही पण महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही केले आहे. आता राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अत्यंत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत, ओबीसी, धनगर, वंजारी, माळी समाजाच्या दुकानात मराठा समाजातील माणूस जात नाही. अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. राज्यातील दोन घटकांमधील सलोखा धोक्यात आला आहे. राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून शांतता निर्माण करणे ही तुमची जबाबदारी आहे हे त्यांना मी पटवून दिले.’’

नामांतर लढ्याचा उल्लेख

‘‘मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देत असताना मराठवाडा पेटला होता. त्यावेळी पवार साहेबांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली,’’ याचीही आठवण भुजबळ यांनी करून दिली. ‘‘ मराठा, ओबीसी नेत्यांमध्ये काय चर्चा होते? हे मला माहिती नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. येत्या एक दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले, ’’ अशी माहिती भुजबळ यांनी दिली. त्याचप्रमाणे येत्या काळात सर्वपक्षीय बैठक घेण्याबाबत त्यांना सुचविण्यात आले आहे. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली असे भुजबळांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांना फोन करणार

‘‘ पवारांची प्रकृती बरी नसल्याने ते येत्या एक ते दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना फोन करणार आहेत. राज्यातील कलुषित झालेले वातावरण निवळावे हाच या भेटीमागचा हेतू आहे. मराठा आणि ओबीसींवर अन्याय होऊ नये याकरता मी कोणालाही भेटायला तयार आहे. अगदी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेईन,’’ असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांना कुणाला भेटायला जात असताना आमची कुणाची परवानगी घ्यायची त्यांना गरज नाही. भुजबळ नाराज नाहीत. काल तर बारामतीच्या जनसन्मान मेळाव्यात त्यांनी उस्फूर्तपणे भाषण केले, त्यामुळे भुजबळ यांच्याबाबतीत निराधार वृत्त पसरवू नये.

- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

मराठा विरुद्ध ओबीसी वाद मिटवावा यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बैठक घ्यावी असे भुजबळ यांना वाटत असेल तर हा वाद थांबविण्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री अपयशी ठरले आहेत का? भुजबळ यांनी ओबीसी आंदोलनात जी वक्तव्ये केली त्यातून वाद मिटविण्याचे काम झाले की वाढविण्याचे? हे पाहण्यासारखे आहे. शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर विरोधक सर्वपक्षीय बैठकीला गेले नाहीत हे धादांत खोटे आहे.

- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते

भुजबळ दुटप्पी भूमिका घेत आहेत. एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवार साहेबांना आज भेटायला जाऊन आपण मार्गदर्शन करा असे सांगायचे. त्यांनी कितीही परतीचे प्रयत्न केले तरीसुद्धा त्यांना परत घेणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे.

- अनिल देशमुख, शरद पवार गटाचे नेते

बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जनसन्मान सभे’मध्ये रविवारी भाषण करत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “आरक्षणाबाबत सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वजण येणार होते. मात्र आयत्या वेळी बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला,” असा आरोप भुजबळ यांनी केला होता.

छगन भुजबळ कुणालाही भेटले तरी त्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. ते बेइमान आहेत. त्यांच्या घशात किती हात घाला तरी तो कोरडाच निघणार. ते कुणाचेच नाहीत. ते स्वतःचेच घर कसे भरेल हे पाहतात. भुजबळांमुळे राज्यातील वातावरण कलुषित झाले आहे. आता तेच शांतता ठेवा असे आवाहन करत आहेत.

- मनोज जरांगे- पाटील, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते

भुजबळ कायम ओबीसी समाजाच्या बाजूने उभे राहिले आहेत. आम्हाला शरद पवार यांच्याकडून अपेक्षा आहेत. शरद पवार यांनीच मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घेतली आहे. गावगाड्यामध्ये मराठा समाजाकडून वेठीस धरले जात आहे. जरांगे आव्हान देत असताना आता पवारांनी पुढे आले पाहिजे.

- लक्ष्मण हाके, ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com