मोठी बातमी! निधीअभावी ‘पोलिसदादां’चीही ड्यूटी जुन्याच गणवेशावर; पोलिसांच्या गणवेशासाठी पुरेसा मिळेना निधी; शाळेतील चिमुकल्यांनाही अजून नाही दुसरा गणवेश

शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदांसह, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दोन गणवेश अपेक्षित असतानाही अद्याप सर्व चिमुकल्यांना पहिलाच गणवेश मिळाला नाही. दुसरीकडे शहर-जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही गणवेशाचा संपूर्ण निधी मिळाला नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
police
police sakal
Updated on

सोलापूर : शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदांसह, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दोन गणवेश मिळणे अपेक्षित असतानाही अद्याप सोलापूर जिल्ह्यातील अजूनही ७४ हजार चिमुकल्यांना पहिलाच गणवेश मिळालेला नाही. दुसरीकडे आता शहर-जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही गणवेशाचा संपूर्ण निधी मिळाला नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यांनाही जुन्याच गणवेशावर ड्यूटी करावी लागत असल्याची स्थिती आहे.

पोलिसदादांना दरवर्षी किमान १२५ दिवस तरी बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागते. याशिवाय निवडणुका, व्हीआयपी, व्हीव्हीआयपींचे दौरे, सभा, निदर्शने, आंदोलनावेळीदेखील पोलिसांना बंदोबस्त द्यावा लागतो. त्यावेळी त्यांना गणवेशाचे बंधन असते. सध्या सणासुदीचा काळ असून यावेळी पोलिसांना बंदोबस्ताची ड्युटी करावी लागते.

दरम्यान, दरवर्षी साधारणत: जून-जुलैमध्ये पोलिसांना गणवेशाचा निधी प्राप्त होतो. मात्र, यंदा ऑगस्ट संपत आला तरी गणवेशाचा संपूर्ण निधी शहर-जिल्ह्यांना प्राप्त झालेला नाही. दरवर्षी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या गणवेशासाठी पाच हजार १६७ रुपये दिले जातात, पण काही शहर-जिल्ह्यासाठी जो निधी आलाय, तो अपुरा असल्याने कोणाला गणवेशासाठी पैसे द्यायचे असा पेच निर्माण झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दुसरीकडे अनेकांना गणवेशाच्या निधीची प्रतीक्षा असून ते कर्मचारी जुन्याच गणवेशावर ड्यूटी बजावत असल्याची वस्तुस्थिती आहे.

पहिला गणवेश वाटप अंतिम टप्प्यात

जिल्ह्यातील एकूण दोन लाख आठ हजार ९३१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शिलाई करून दिला जात आहे. शासनस्तरावरून प्राप्त काही विद्यार्थ्यांच्या कटिंग कापडात खिसा वेगळ्याच रंगाचा किंवा खिसा, कॉलर नाही, कापड खूपच कमी अथवा काहींचे कापड आलेच नाही, असे प्रकार आढळले. त्यामुळे तशा १२ हजार १०० गणवेशाची शिलाई राहिली आहे.

- सोमनाथ लामगुंडे, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर

शाळेच्या पहिल्या दिवशीचा गणवेश अजूनही नाही

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दोन गणवेश देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, शाळा सुरू होऊन अडीच महिने झाल्यानंतरही सर्व विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत एक गणवेश मिळालेला नाही. एक गणवेश मक्तेदारामार्फत मायक्रो कटिंग करून महिला आर्थिक विकास महामंडळाकडून तर दुसरा गणवेश शाळेच्या माध्यमातून शिलाई केला जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश कधी मिळणार, याचेही उत्तर कोणत्याच शिक्षणाधिकाऱ्यांकडे नाही.

सोलापूरच्या पोलिसांचे मनुष्यबळ

  • अंदाजे ग्रामीण पोलिस

  • ५,०००

  • शहर पोलिस

  • २,५००

  • एकूण पोलिस

  • ७,५००

  • गणवेशासाठी रक्कम

  • प्रत्येकी ५१६७ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.