मुंबई : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीसह अन्य घटक पक्षांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे भाजप-मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असे स्वरूप आल्याने राज्यभरात काही ठिकाणी राजकीय तणाव निर्माण झाला. मुंबईत काही ठिकाणी बेस्ट बसवर दगडफेक झाली, तर जळगावात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत हाणामारीचा प्रकार घडला.
महाराष्ट्र बंददरम्यान मुंबईत काही ठिकाणी बेस्ट बसवर दगडफेक झाल्याने सुमारे सहा ते आठ बसचे नुकसान झाले. तर ठाण्यात रिक्षा वाहतूक सुरू ठेवणाऱ्यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. बोरिवलीत शिवसैनिकांनी जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली. तर विलेपार्ले मधे व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेली दुकाने भाजप आमदाराने उघडण्यास लावल्याने थोडा तणाव निर्माण झाला. जळगावात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यात हाणामारी झाल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
साताऱ्यातही काही भाजप समर्थकांनी दुकाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याने तोडफोडीच्या किरकोळ घटना घडल्या. पुणे, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, अहमदनगर, यवतमाळ, अमरावती या शहरात बंदला व्यापारी आणि दुकानदारांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. या बंदमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व नेते सहभागी झाले होते. राज्यातील प्रमुख महामार्गावर फारसे आक्रमक आंदोलन झाले नसले तरी सकाळी काही ठिकाणी रास्ता रोकोच्या घटना घडल्या. मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर महाविकास आघाडीच्या आंदोलनकर्त्यांनी टायर जाळल्याने वाहतूक विस्कळित झाली होती.
केंद्र आणि यूपी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. तर भारतीय जनता पक्षाने तत्कालीन आघाडी सरकारच्या काळातील मावळ गोळीबाराची आठवण करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. आज सकाळी हुतात्मा चौकात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रवक्ते नवाब मलिक यांनी बंदमध्ये सहभागी होत भाजपवर हल्लाबोल केला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व प्रमुख मंत्री आणि पदाधिकारी यांनी थेट राजभवनाच्या समोर धरणे आंदोलन केले.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला राज्यभरात प्रतिसाद मिळाला. यावरून आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर शेतकरी विरोधी असल्याची एकमुखी टीका केली. ज्या शेतकऱ्यांना भाजपच्या मंत्रिपुत्राने चिरडले त्या शेतकऱ्यांच्या वेदना भाजपला कळणार नाहीत. भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष असून हा द्रोह आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. तर भाजपच्या नेत्यांनी यावर पलटवार करत मावळ गोळीबाराचे प्रकरण पुढे करत हल्लाबोल केला. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर थेट मावळचा दौरा करत गोळीबारात मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे शेतकरी प्रेम ढोंग असल्याची टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.