Pralhad Keshav Atre Jayanti : 'असे अत्रे पुन्हा न होणे'...

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी यांनी समृद्ध केलेल्या मराठी विनोद परंपरेलाआपल्या खेळकर विनोदातून अत्रेंनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
Pralhad Keshav Atre Jayanti
Pralhad Keshav Atre Jayantiesakal
Updated on

- प्रा. मिलिंद जोशी

प्रल्हाद केशव अत्रे (pralhad keshav atre) (जन्म 13 ऑगस्ट 1898 मृत्यू 13 जून 1969 )आपल्या असामान्य लेखन कर्तृत्वाने आणि विलक्षण प्रतिभेने विविध साहित्य प्रकारात विपुल साहित्य निर्मिती करून आचार्य अत्रे यांनी आपली अमीट नाममुद्रा मराठी साहित्यात उमटवली. चतुरस्त्र आणि अष्टपैलू हे शब्द थिटे वाटावेत इतके अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.शिक्षक, कवी, गीतकार, विनोदकार, पटकथाकार,विडंबनकार,नाटककार,वक्ता, पत्रकार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अजोड ठरली.त्यांनी साहित्याकडे लोकजागृतीचा पाया आणि विनोदाकडे जीवनाच्या युद्धात लढण्याचे प्रभावी शस्त्र म्हणून पाहिले.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी यांनी समृद्ध केलेल्या मराठी विनोद परंपरेलाआपल्या खेळकर विनोदातून अत्रेंनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. जीवनातील विसंगती आणि विकृती वर बोट ठेवत आपल्या विनोदातून समाजाला हसवताना अत्रेंनी रंजनाबरोबर डोळ्यात अंजन घालण्याचे ही काम केले. रसरशीत जीवनदृष्टी देणारे त्यांचे साहित्य आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. किर्लोस्कर देवलांपासून उगम पावलेल्या आणि गडकरी खाडीलकरांच्या काळात शिखरावर पोचलेल्या मराठी रंगभूमीला मूक आणि बोल पटांच्या काळात जेव्हा वाईट दिवस आले तेंव्हा नाटककार अत्रेंनी रंगभूमीला सावरत अत्रे पर्व निर्माण केले.नवयुग आणि मराठा या पत्रांच्या माध्यमातून पत्रकारिता करताना त्यांच्यातल्या योद्धा पत्रकाराचे दर्शन महाराष्ट्राला घडले .

आपल्या साहित्य आणि मराठी मनाला समृद्ध करणाऱ्या अत्रे यांचं योगदान हे कधीही विसरता येणार नाही. त्यांनी मराठी भाषेला वेगवेगळ्या कलाकृती दिल्या. त्याचा आनंद आजही वाचक, प्रेक्षक त्यांच्या साहित्य, नाटक आणि चित्रपटांतून घेताना दिसत आहे. एका व्यक्तीनं त्याच्या आयुष्य़ात काय काय मिळवावं याचं उदाहरण म्हणूनही अत्रे यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहता येईल. प्रचंड हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला लागु होणारा शब्द म्हणून सांगता येईल. त्यांनी नेहमीच अनेक प्रकारच्या भूमिका घेऊन समाजात जनजागृती केली. त्यासाठी आपल्या मराठा वृत्तपत्राचा आधार घेतला. त्यातून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तेव्हा मराठा मध्ये येणारा अग्रलेख वाचणे हा वाचकांसाठी मोठा आनंद होता. अत्रे कुणावर काय लिहितात, याकडे वाचकांचं लक्ष होते. (pralhad keshav atre)

Pralhad Keshav Atre Jayanti
स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी रिलिज झालेले दोन चित्रपट माहितीये?

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. . त्यानी राजकारणासह जीवनाचे कोणतेही क्षेत्र वर्ज्य मानले नाही. नगरपालिकेपासून विधानसभेपर्यन्त लोकप्रतिनिधी म्हणून कामातून आपला दबदबा निर्माण करताना त्यांनी सामान्य माणसाचा आवाज बुलंद केला. साने गुरुजींच्या श्यामची आई या कादंबरीवर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला 1953 साली सुवर्ण कमळ मिळाले.साहित्य सम्मेलन आणि नाट्य संमेलन अशा दोनही सम्मेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.जे जे उत्तम उदात्त उन्नत अशा मूल्यांची त्यांनी आयुष्यभर उपासना केली. (Birth Anniversary)

(या लेखाचे लेखक पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.