सोलापूर : गौरी- गणपती सणाच्या निमित्ताने शासनाने रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. आता दोन्ही सण संपूनही नागरिकांना आनंदाचा शिधा मिळालेला नाही. आतापर्यंत उत्तर, दक्षिण सोलापूर, माळशिरस, अक्कलकोट व पंढरपूर या पाच तालुक्यांसाठीचा आनंदाचा शिधा प्राप्त झाला, पण उर्वरित सहा तालुक्यांसह सोलापूर शहरातील सर्व लाभार्थींसाठी तो मिळालेला नाही. त्यामुळे भाजपचे आमदार ज्या तालुक्यात तेथेच आनंदाचा शिधा दिल्याचा आरोप रेशनकार्डधारक करीत आहेत.
सणासुदीत गोरगरिबांना रेशनधान्य दुकानातून दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्तात मिळाव्यात म्हणून राज्य शासनाने आनंदाचा शिधा म्हणजेच साखर, रवा, डाळ व तेल या चार वस्तू १०० रुपयांत देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सणासुदीत त्यांना त्या वस्तू मिळणे अपेक्षित असतानाही आतापर्यंत लाभार्थींना त्या वस्तू कधीच वेळेत मिळालेल्या नाहीत. आता गौरी- गणपतीच्या सणानिमित्ताने मिळणाऱ्या आनंदाचा शिधामधील तेल आलेले नाही.
जिल्ह्यासाठी तेलाचे तीन लाख ५१ हजार संच मिळणे अपेक्षित असतानाही दोन लाख संच अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. याशिवाय काही तालुक्यांमध्ये साखर, रवा, डाळ देखील कमी प्रमाणात आली आहे. त्यामुळे पुरवठा विभागाला त्याचे वाटप करता येत नसल्याचे चित्र आहे. सोलापूर शहरातील देखील ५० टक्के लाभार्थींसाठी अद्याप आनंदाचा शिधा मिळाला नसल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
काही दिवसांत मिळेल आनंदाचा शिधा
गौरी- गणपती सणाच्या निमित्ताने जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. पण, अजून सहा तालुक्यांना आनंदाचा शिधा आला नसून पाच तालुक्यांसाठी तो आला आहे. त्यातही तेल कमी असून मक्तेदाराकडे त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. काही दिवसात लाभार्थींना आनंदाचा शिधा मिळेल.
- संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर
धान्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला दिली नोटीस
आनंदाचा शिधा पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरून स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. भांबुर्डा, शिवाजी नगर (पुणे) यांना कंत्राट देण्यात आले आहे. पण, त्यांच्याकडून मुदतीत आनंदाचा शिधा उपलब्ध झाला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी धान्य पुरवठा न केल्याने सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्या मक्तेदाराला नोटीस पाठवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य मक्तेदाराने त्यांच्या अंतर्गत दुसरा कंत्राटदार नेमल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
आनंदाचा शिधाची सद्य:स्थिती
ग्रामीणचे लाभार्थी
३,५१,०८६
शहरातील लाभार्थी
१.२४ लाख
एकूण रेशनकार्डधारक लाभार्थी
४.६५ लाख
शिधा न मिळालेले तालुके
६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.