मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच तापला आहे. शिवसेना (शिंदे गट ) आणि भाजप या मुद्द्यावर आक्रमक झाले असून सावरकर यांचा वारंवार अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्यासाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट) राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाच्या मुद्यावरून आज सोशल मीडियामध्ये शिंदे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यासाठी ‘आम्ही सारे सावरकर’ अशी मोहीम राबविण्यात आली. सर्वमंत्री आणि नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलमध्ये ‘ आम्ही सारे सावरकर’ असा प्रोफाईल पिक्चर ठेवला होता.
सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप महायुतीचा आहे. त्याचाच भाग म्हणून ही यात्रा असणार आहे.
राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान करीत आहेत यामुळे राज्यातील जनतेमध्ये असंतोष आणि चीड पसरली आहे. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढून सावरकरांच्या त्यागाची माहिती जनतेपर्यंत पोचविली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तुरुंगामध्ये राहून दाखवा
काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अवमान केला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना जोडे मारले होते. आता उद्धव ठाकरे राहुल गांधींना जोडे मारण्याची हिंमत दाखवणार का ?
असा सवाल करत बाळासाहेब असते तर त्यांनी राहुल गांधींना जोडे मारले असते आणि सावरकरांचा अपमान निमूटपणे सहन करणाऱ्यांनाही जोडे मारले असते, असे सांगत शिंदे यांनी उद्धव यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींनी एक दिवस अंदमानच्या जेलमध्ये राहून दाखवावे, असेही शिंदे म्हणाले. राहुल गांधी वारंवार सांगत आहेत मी सावरकर नाही गांधी आहे, तुमची सावरकर होण्याची लायकी नाही. त्यासाठी त्याग, देशप्रेम असायला हवे, ते तुमच्याकडे नाही. तुम्ही तर परदेशात जाऊन देशाची निंदा करता यापेक्षा जास्त दुर्दैव ते काय अशी टीकाही शिंदेंनी यावेळी बोलताना केली.
निषेध करून तरी काय उपयोग?
सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही हे बोलणाऱ्या नेत्यांचे आमदार विधानसभेत या मुद्यावर मूग गिळून गप्प होते. राजकारणासाठी, महाविकास आघाडीसाठी ते गप्प होते यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असू शकते. मालेगावच्या जाहीर सभेत सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असे ठाकरे म्हणाले, अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार?
असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केला. जनतेने त्यांचा दुटप्पीपणा ओळखला आहे. आम्ही मारल्यासारखे करतो, तुम्ही रडल्यासारखे करा असा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत चालविला आहे. उद्धव ठाकरे एकीकडे ही विधाने करीत असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे मात्र, ''दोन्ही पक्ष वेगळे आहेत आणि ती काँग्रेस पक्षाची भूमिका आहे'', असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत करतात.
म्हणजेच कुणी काय बोलावे, हेही घरात बसून ठरविल्यासारखे आहे. त्यामुळे उद्धव यांनी आता अशी कितीही मल्लिनाथी केली, तरी त्याचा काहीही फायदा नाही. आपली प्रेरणास्थाने जेव्हा अपमानित होतात आणि तेव्हाही आपण मूग गिळून गप्प बसतो, तेव्हा तो राजकारणातील हताशेचा, अनुनयाचा, हतबलतेचा परमोच्च बिंदू असतो. अशा अवस्थेत त्याचा निषेध करून तरी काय उपयोग? असे शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
शरणागतीचा परमोच्च बिंदू
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली असताना त्यांचा अत्यंत हिरीरीने बचाव करताना मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार दिसून आले. असे करताना त्यांना वीर सावरकर यांचा अपमान दिसला नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा हा परमोच्च बिंदू होता, असेही शिंदे यावेळी म्हणाले. सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून उद्धव उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे का? या प्रश्नावर "सत्तेला लाथ मारायची हिंमत त्यांच्यात नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सावरकर केवळ त्यांच्या भाषणात जिवंत राहतील, कृतीत सावरकर राहणार नाहीत. असेही शिंदे यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.