राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडत आहे. अशातच मोठे नेते, माजी आमदार, खासदार पक्षांतर करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांना मोठी गळती लागली आहे. काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा, त्यानंतर काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी, आणि जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्यानंतर आता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.(Maharashtra Politics)
अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून त्या नेत्याचा पक्षप्रवेश लवकरच होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शरद पवार गटाला मोठा दणका देण्याची तयारी भाजपने केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील ४८ पैकी ४२ हून अधिक जागा जिंकायच्या असतील तर या दोन पक्षांतील महत्त्वाचे आणि मोठे नेते आपल्यासोबत आले पाहिजेत त्यानंतर हे शक्य होईल, अशी भाजपची भूमिका असल्याची माहिती आहे.
भाजपने पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केलं केंद्रित
पश्चिम महाराष्ट्रात आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा यांची सत्ता राहिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं आव्हान देत आपली जागा बनवण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. मात्र, अद्याप भाजप पश्चिम महाराष्ट्रात आपला पाय तितक्या मजबूतीने रोवू शकलेलं नाही. त्यामुळे भाजपने या भागाती नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीतील बंडात शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार, मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचे खाते देणार अशा बातम्या मध्यंतरी होत्या, पण त्या नेत्याने त्याबाबत स्पष्टीकरण देताना हे वृत्त फेटाळले आहे.
शरद पवारांसोबत असलेला ‘तो’ नेता कोण?
शरद पवार गटातील हा नेता जर भाजप सोबत आला तर भाजपला सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये आपले वर्चस्व निर्माण करता येईल असं भाजपचं समीकरण आहे. दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव असलेल्या ये नेत्याचे सहकार क्षेत्रातही मोठं नाव आहे.
या नेत्याची राज्यातील भाजपच्या एका बड्या नेत्यासोबत आणि दिल्लीतील एका नेत्यासोबत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती वृत्तपत्रांनी सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या नेत्याला भाजपमध्ये आणून त्यांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी द्यायची किंवा त्या नेत्यालाच लोकसभेला उभं करायचं या दोन्ही पर्यायांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते आणि शरद पवार यांचे खास म्हणून या नेत्याचे महत्त्व पक्षात कायम राहिले.
अशोक चव्हाणांमुळे मराठवाड्यात फायदा
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघांत मोठा फायदा होईल. लोकसभेच्या जागावाटपात नेहमीच शिवसेनेला मराठवाड्यात अधिक जागा मिळाल्या. शिवसेनेतील फुटीनंतर आता स्वत:ची ताकद मराठवाड्यात वाढविली पाहिजे या भूमिकेतूनच चव्हाण यांना सोबत घेतले गेले.
जागावाटपाचे तिढे सोडविण्याचे आव्हान
लोकसभेच्या निवडणुकांना जेमतेम १०० दिवस उरले आहेत. महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीचा यावेळचा रणसंग्राम वेगळाच आहे. दोन्हीकडे प्रमुख तीन पक्ष आहेत. युती आणि आघाडी नव्याने झाली असल्याने जागावाटप कसे होणार, हा नवा विषय आहे अन् सगळेच नवे असल्याने तो नव्यानेच सोडवावा लागणार आहे. सत्ताधारी युतीत मोदी या नावाभोवती सगळे केंद्रित झाले असल्याने सूत्र स्पष्ट आहे. शिंदे गटाचे किती खासदार यावेळी जिंकून येऊ शकतात, याचे भाजपने काही कोष्टक तयार केले असेल. ते सांगून तसे बदल करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाईल. ते बदल प्रत्यक्षात आणले जातील. शिंदे गट यथाशक्ती विरोध करुन पाहील; पण त्यामुळे फार काही पदरी पडेल असे नाही .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.