मुंबई - कोरोना संसर्गाचा राज्याला असलेला धोका पूर्णपणे टळला नसल्याने राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांना १ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, काही अतिरिक्त नियमही लागू केले आहेत. यानुसार, इतर राज्यांतून कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना ‘आरटी-पीसीआर’चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश मुख्य सचिव कार्यालयाने आज काढले आहेत. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सरकारने राज्यात १५ मेपर्यंत लागू केलेले कडक नियम १ जूनला सकाळी सात वाजेपर्यंत लागू असतील. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत, असे सरकारने या आदेशात म्हटले आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने आणखीही काही नियमांचा समावेश केला आहे. यानुसार, इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी आधीच्या ४८ तासांच्या कालावधीत केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह आलेला अहवाल दाखविणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच, परराज्यातून मालवाहू वाहनाच्या वाहनचालक व क्लीनर यांनाही ४८ तासांच्या अवधीत काढलेला निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सक्तीचा असून तो जास्तीत जास्त ७ दिवसांपर्यंत ग्राह्य धरला जाणार आहे.
ग्रामीण भागातील बाजारपेठा, मंड्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्यावर स्थानिक प्रशासनाची देखरेख असेल. दूध संकलन, दूध वाहतूक यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र अत्यावश्यक सेवेच्याअंतर्गत किरकोळ दूधविक्री ही निर्बंधांच्या चौकटीतच करता येणार आहे. विमानतळ, बंदर सेवा, आरोग्य व औषध वाहतूक अथवा कोविड व्यवस्थापन याबाबत संबधित कर्मचाऱ्यांना मेट्रो तसेच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. नियमावलीनुसार राज्यात १ जूनपर्यंत मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल.
असे असतील नियम
- परराज्यांतून येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल सक्तीचा
- जिल्हा बंदी लागू
- अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
- सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
- खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
- सार्वजनिक वाहतूक ५० टक्के क्षमतेने; एसटी बस वाहतूक ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
- खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास १० हजार दंड
- सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थिती
- अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयांत १५ टक्के उपस्थिती
- लग्न समारंभासाठी २५ जणांना फक्त २ तासांसाठी परवानगी
-विवाहाबाबत नियम मोडल्यास ५० हजार दंड भरावा लागणार
- बाहेरून येणाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करणार
सकाळी 7 ते 11 या वेळेत काय सुरु राहणार?
किराणा मालाची दुकाने, दूध, भाजीपाला, फळे विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहतील. तसंच अंडी, मटण, चिकन, मासे विक्रीच्या दुकानांनासुद्धा यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. याव्यतिरिक्त बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने, पशूखाद्य विक्रीही सकाळी सुरु राहील. पावसाळ्यात लागणार्या वस्तुंची दुकानेही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.