Latest Maharashtra News Updates : अक्षय शिंदे प्रकरणातील तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा - अंधारे

Breaking Marathi News Updates 23 September 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

अक्षय शिंदे प्रकरणातील तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा - अंधारे

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर म्हणजे बदलापूर घटनेचे सत्य बाहेर येण्याचा आधीच दडपून टाकण्यासारखं आहे. स्व संरक्षणाचा बनाव रचला गेला का? त्याची ये जा करताना सुरक्षा घेतली गेली नव्हती का? त्याच्या हातात बेड्या असताना त्याने पोलिसांची बंदूक कशी काढली, असं त्या म्हणाल्या आहेत.

मुख्य आरोपींचा एन्काउंटर करून हा खटला संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे - नाना पटोले

"या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बदलापूर घटनेतील शाळेच्या ट्रस्टीला अद्याप अटक झालेली नाही, तो फरार आहे, त्याला अद्याप अटक का झाली नाही? या प्रकरणातील फरार आरोपींना अटक होणार का? मुख्य आरोपींचा एन्काउंटर करून हा खटला संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे, या प्रकरणाची सत्यता समोर आणण्यासाठी पोलिसांनी आरोपींचे एन्काऊंटर केले आहे का? या घटनेमागे रश्मी शुल्कांचा हात आहे, असा थेट आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

तो कसं पोलिसांची रिवाल्वर काढून घेऊन गोळ्या झाडू शकतो - अनिल देशमुख

अक्षय शिंदे याचे दोन्ही हात बेड्याने बांधलेले असताना, तो कसं पोलिसांची रिवाल्वर काढून घेऊन गोळ्या झाडू शकतो, याच्यावर विश्वास बसत नाही, असं ते म्हणाले आहेत.

अक्षय शिंदेंच्या शवविच्छेदनची होणार व्हिडिओ ग्राफी

अक्षय शिंदेंच्या शवविच्छेदनची व्हिडिओ ग्राफी होणार आहे. सर जे जे रुग्णालयात डॉक्टरांच पॅनल करणार अक्षय शिंदेंच्या मृतदेहाच शव विच्छेदन.

बदलापुरात फटके फोडले

अक्षय शिंदेंच्या मृत्यूनंतर बदलापुरात फटके फोडले आहेत.

आधी फाशीची मागणी करणारेच आता आरोपीची बाजू घेत आहेत, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कान टोचले

आधी फाशीची मागणी करणारेच आता आरोपीची बाजू घेत आहेत, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत.

कळवा हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल

बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अक्षयवर पोलिसांनी गोळीबार केला. यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. आता अक्षयचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये असून वरिष्ठ पोलिस अधिकारी कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

Mumbai Live : जलील यांच्या तिरंगा रॅलीमुळं मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प

इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीमुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प. पडघा टोल नाका परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ऐन वर्दळीच्या वेळी जलील यांची तिरंगा रॅली पडघा परिसरात पोहचल्यानं वाहतूक खोळंबली आहे. हजारो वाहनांचा ताफा घेवून तिरंगा रॅलीच्या माध्यमातून जलील मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत.

Mumbai Live : हायकोर्टाच्या बांद्र्यातील प्रस्ताविक नवीन संकुलाचे भूमिपूजन

उच्च न्यायालयाच्या प्रस्ताविक नवीन संकुलाचे भूमिपूजन समारंभ आज बांद्रा येथे पार पडत आहे

बांद्रा येथील शासकीय वसाहत जवळ उच्च न्यायालयाचा प्रस्तावित नवीन संकुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे

या कार्यक्रमाला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, सुप्रीम कोर्टाचे इतर न्यायाधीश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत...

Nashik Live : त्र्यंबकेश्वर देवस्थान पुन्हा वादात! ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकांकडून वृद्धाला मारहाण 

त्र्यंबकेश्वर देवस्थान पुन्हा वादात. ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकांकडून वृद्धाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंदिराच्या मागील बाजूच्या नदीच्या दिशेनं जाताना वीट फेकून मारल्याचा आरोप आहे. वृद्ध व्यक्ती यात गंभीर जखमी झाल्यानं त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. पोट दुखायला लागल्यानं शौचासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. याबाबत माहिती घेऊन कारवाई करणार अशी माहिती मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांनी दिली आहे.

Katraj Dairy Live : कात्रज डेअरीला तीन कोटींचा नफा

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३ कोटी १ लाख ५७ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. या वर्षात ३७१ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल झाली असून आतापर्यंतची ही सार्वाधिक उलाढाल आहे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थांची सरासरी ८० कोटी आणि दूधविक्री सरासरी २७६ कोटी रुपयांची झाली आहे. दूध दरफरकाची मागील वर्षात तरतुद नसताना चालू उलाढालीतुन एक रुपया प्रतिलिटरप्रमाणे ६ कोटी ६१ लाख ४२ हजार दूध फरकही देण्यात आल्याची माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली आहे.

International Rhino Foundation Live Updates: जगभरात गेंड्यांच्या संख्येत किंचित वाढ 

जगभरात गेंड्यांच्या संख्येत किंचित वाढ, मात्र दक्षिण आफ्रिकेत शिकारीच्या घटनांमध्येही वाढ. इंटरनॅशनल राइनो फाउंडेशनच्या अहवालानुसार पांढऱ्या गेंड्यांची संख्या १५,९४२ वरून १७,४६४ झाली, तर काळ्या आणि एक शिंगे असलेल्या गेंड्यांची संख्या स्थिर.

President Droupadi Murmu Live Updates: बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती यांनी बुद्धिबळपटूंचं केलं अभिनंदन

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वर्चस्व गाजवल्याबद्दल आणि सुवर्णपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुद्धिबळपटूंचं केलं अभिनंदन. जगातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना नमवून आपलं सामर्थ्य सिद्ध केलं आहे.

Mumbai Local Live : लोकलमध्ये सापडली 20 लाखांची रोकड असलेली बॅग

डोंबिवली, ता. 23 - आसनगाव रेल्वे स्थानकातून मुंबई दिशेला जाणाऱ्या लोकलच्या मधल्या जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळून आली. कल्याण रेल्वे स्थानकात गाडी येताच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ती बॅग जप्त करत त्यात पाहणी केली असता 20 लाखांची रोकड बॅगमध्ये आढळून आली आहे. या बॅगेचा मुळ मालक कोण याचा शोध रेल्वे पोलिस घेत आहेत.

Melghat Accident Live : मेळघाट परिसरात झालेल्या बस अपघातात चार जण ठार; बावनकुळे यांची माहिती

"मेळघाट परिसरात झालेल्या बस अपघाताची घटना अत्यंत क्लेशकारक आहे. या दुर्दैवी अपघातात ४ प्रवाशी दगावले; काही जखमी आहेत. शाळेत जाणाऱ्या शिक्षकांचाही यात समावेश आहे. जखमींवर अचलपूर येथे उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो ही प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. ॐ शांती!" अशी पोस्ट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर केली आहे.

Gopal Rai Live : अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली केलेले काम पुढे नेणे माझे कर्तव्य : गोपाल राय

"अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली केलेले काम पुढे नेणे हे माझे मुख्य कर्तव्य आहे... पर्यावरण मंत्री असल्याने, हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी नियंत्रित करणे हे मोठे आव्हान आहे. पण आम्ही आधीच काम करत आहोत. हिवाळी कृती आराखडा आणि आम्ही तज्ज्ञांशी, संबंधित विभागांशी चर्चा करून आराखडा तयार केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी मी मुख्य सचिवांसोबत बैठक आयोजित केली आहे... हिवाळी कृती आराखडा 25 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे, असे दिल्लीचे मंत्री गोपाल राय म्हणाले"

Delhi CM Live: आतिशी यांनी रिक्त ठेवली केजरीवालांसाठी मुख्यमंत्र्यांची खुर्ची

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी राजधानी दिल्लीचा पदभार स्वीकारताच मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

PM Modi USA Tour: "21व्या शतकात तंत्रज्ञानाच्या प्रगतीत भारत आघाडीवर राहावा"

21व्या शतकात तंत्रज्ञानाच्या प्रगतीत भारत आघाडीवर आणि केंद्रस्थानी असावा अशी मोदींची इच्छा आहे. तंत्रज्ञान सर्वसमावेशक असावं असं त्यांनी सांगितल. तेव्हा मला सर्वात जास्त आवडलं.

-ख्रिस व्हिएबॅकर, बायोजेनचे सीईओ.

Amit Thackeray Live:  अमित ठाकरेंची 100 निरीक्षकांसोबत बैठक

मनसेनेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेच्या १०० निरीक्षकांची बैठक आज सुरू झाली आहे. या बैठकीत निरीक्षकांनी जिल्हानिहाय घेतलेल्या आढव्यावावर चर्चा होणार आहे. राज ठाकरे यांनी विधानसभेला 225 जागा लढविण्याची घोषणा केली होती, त्यामुळे प्रत्यक्ष चाचणीमध्ये किती जागा अनुकूल आहेत याचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत मनसेच्या भविष्यातील रणनीती आणि योजना निश्चित करण्यावर भर दिला जाईल.

PM Modi US Visit LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची घेतली भेट. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटमवर तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सेमीकंडक्टर तंत्रज्ञानावर झाली चर्चा.

BJP Live: भाजपच्या निवडणूक समितीची आज बैठक, पहिल्या यादीवर होणार चर्चा

भाजपच्या निवडणूक समितीची आज दुपारी ३ वाजता बैठक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक होणार आहे.

निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या पहिल्या यादीवर चर्चा होऊ शकते. तसेच आगामी विधानसभा निवडणूक तयारी बाबत आढावा घेतला जाणार. आजच्या बैठकीतील अहवाल अमित शहा यांच्या समोर मांडण्यात येणार.

BJP Mahashtra Live: भाजपच्या निवडणूक समितीची आज दुपारी ३ वाजता बैठक

भाजपच्या निवडणूक समितीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता बैठक होणार आहे.

Amit Shah Live Update: 25 तारखेला अमित शहा नाशिक दौऱ्यावर

25 तारखेला अमित शहा नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहा यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेते पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन

Ajit Pawar Live : अजित पवारांना धक्का देण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यात

अजित पवारांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आजपासून तीन दिवस नाशिक जिल्ह्यात येणार आहे.

Imtiaz Jaleel LIVE : महंत रामगिरी महाराज, आमदार नीतेश राणेंच्या विरोधात इम्तियाज जलील यांची 'चलो मुंबई तिरंगा रॅली'

AIMIM महाराष्ट्र प्रमुख इम्तियाज जलील यांनी महंत रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नीतेश राणे यांच्या प्रक्षोभक विधानांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथून 'चलो मुंबई तिरंगा रॅली' काढली.

Kishtwar LIVE : सुरक्षा दल-दहशतवाद्यांत चतरू भागात चकमक सुरू

किश्तवार, जम्मू-काश्मीर : 21 सप्टेंबरपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये किश्तवारच्या चतरू भागात चकमक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर ठाण मांडलं आहे.

Tirupati laddu Controversy LIVE : 'लाडू प्रसाद'च्या वादानंतर तिरुपती मंदिरात महाशांती होम

आंध्र प्रदेश : तिरुमला तिरुपती देवस्थानने 'लाडू प्रसाद'च्या वादानंतर महाशांती होम आयोजित केला आहे. तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी शामला राव आणि मंडळाचे इतर अधिकारी पुरोहितांसह या होममध्ये सहभागी झाले आहेत.

Sultanpur Robbery Case : सुलतानपूर दरोडा प्रकरणात एसटीएफला मोठं यश; एक लाखाचं बक्षीस असलेला अनुज प्रताप सिंग चकमकीत ठार

सुलतानपूर दरोडा प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालंय. एक लाखांचे बक्षीस असलेला अनुज प्रताप सिंग लखनऊ एसटीएफ आणि उन्नाव पोलिसांच्या संयुक्त पथकाच्या चकमकीत मारला गेला. अनुजवर सोनाराच्या दुकानात घुसून दरोडा टाकल्याचा आरोप होता. यापूर्वी याच दरोड्यात जौनपूर येथील मंगेश यादव उर्फ ​​कुंभे हा एसटीएफने केलेल्या चकमकीत ठार झाला होता.

Sharad Pawar LIVE : शरद पवार यांची आज चिपळूणमध्ये जाहीर सभा

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार पक्षफुटीनंतर प्रथमच चिपळूणमध्ये येत आहेत. आज (ता. २३) सकाळी ११ वाजता बहादूरशेख चौक येथील स्वा. सावरकर मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी (ता. २१) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूणमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करण्याचे टाळले. त्यामुळे शरद पवार सभेत काय बोलणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष आहे.

Sanjay Ghatge LIVE : संजय घाटगेंच्या निवडीवर आज होणार शिक्कामोर्तब

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदावर आज (ता. २३) माजी आमदार संजय घाटगे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. सकाळी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होईल. कागल विधानसभा मतदारसंघात निवडणूक न लढवता पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घाटगे यांनी घेतला आहे. या पाठिंब्याचे बक्षीस म्हणून घाटगे यांना जिल्हा बँकेत संधी देण्याचा निर्णय मुश्रीफ यांनी घेतला आहे.

Ambabai Temple LIVE : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आजपासून स्वच्छतेला होणार प्रारंभ

Latest Marathi Live Updates 23 September 2024 : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आजपासून स्वच्छतेला प्रारंभ होणार आहे. सकाळी मुंबईवरून स्वच्छतेसाठी कर्मचारी पोहोचतील. सकाळी दहा वाजता स्वच्छतेला सुरुवात होईल. तसेच राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला असून मनोज जरांगे यांच्या मागण्यांसदर्भात सरकारची आज बैठक आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेची बैठक बोलवलीये, तर शरद पवार यांची आज चिपळूणमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे, त्यामुळे काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.