शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. उद्याच्या निर्णयाकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
एन्काऊंटरमध्ये मृत झालेल्या अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अजूनही बॉडी ताब्यात घेण्यासाठी अक्षयचे नातेवाईक आलेले नाहीत.
अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आज नागपूरात आले त्यामुळं आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी मोठ्या घोषणा करतील. आम्हाला केंद्र आणि राज्य सरकार द्या आम्ही वेगळा विदर्भ करू, धनगरांना आरक्षण देऊ, कापसाला भाव देऊ, सर्व पिकांना दीडपटीने एमएसपी देऊ असे म्हणत होते. एवढ्या मोठ्या विश्वविख्यात पक्षाचे नेते आले आणि काय करून गेले तर बुथवरची चर्चा करून गेले. विदर्भाची पुन्हा उपेक्षा केली, येणाऱ्या निवडणुकीत स्टार प्रचारक असलेले अमित शहा आणि मोदीजी महायुतीला कसा फायदा करून देतात हे तुम्ही पाहाच.
२२ वर्षीय तरुणाचा आर्थर रोड कारागृहात मृत्यू. १६ सप्टेंबरला झाली होती आरिफ कुरेशीला पॉक्सो प्रकरणात अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीत असताना अत्यवस्थ झाल्याने रुग्णालयात भरती करावं लागलं. त्यानंतर दोन दिवसात जे जे रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. काळाचौकी पोलीस ठाण्याला स्थानिकांनी घेराव घातला.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या कथित एन्काउंटरवर शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले की, माझा विरोधकांना प्रश्न आहे की, बदलापूरमध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला तेव्हा पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असे तुम्हाला वाटत नाही का?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं दोन दिवसाच्या राज्याच्या दौऱ्यासाठी नागपुरात आगमन.
तांत्रिक कारणामुळे नागपूर येथील मेट्रो शंकरनगर येथील रुळावरच बंद पडली. सीताबर्डी कडे जाणाऱ्या मार्गावर ही मेट्रो बंद पडली. त्यानंतर सर्व प्रवाशांना ट्रॅकवरच बाहेर काढण्यात आलं.
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदे ह नराधम होता, त्याने केलेल्या कृत्यानंतर बदलापूर संतप्त होते. महिला असुरक्षित म्हणून विरोधक ओरडत होते. त्या विकृताने पोलीसाचे हत्यार घेवून पोलिसांवर फायारींग केले त्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणार्थ त्याला मारला मी समर्थन करीत नाही त्याची चौकशी होईल. मात्र, आता याचे राजकारण विरोधक करत आहेत. मृत अक्षय शिंदेला त्याची पत्नीही विकृत म्हणते, असं अजित पवारांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. आता मनोज जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली असून त्यांनी उपचार घेण्याची विनंती महिला आंदोलकांकडून केली जात आहे.
बदलापूर बाल लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटवर ठाणे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. एन्काऊंटर हा सर्वोच्च न्यायालयाच्या मते खून आहे असं म्हणत आता, याप्रकरणी आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं आहे .
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची याचिका न्यायालयाने बेसलेस असल्याचे नमूद केले. याचिकाकर्त्यांना कोर्टाने सुनावणीदरम्यान स्पष्टपणे सांगितले की, "तुम्ही प्रकरण स्वतः मागे घ्या किंवा आम्ही हे प्रकरण डीसमिस करू." कोर्टाने याचिकाकर्त्यांना निवडणूक प्रक्रिया वेळेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर याचिकाकर्त्यांनी शेवटी आपली याचिका मागे घेतली, ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पुढे जाणार आहे.
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने तपासाची जबाबदारी हाती घेतली आहे. या प्रकरणात आरोपी मॉरीस नोरोन्हा विरोधात पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोसाळकर कुटुंबीयांनी आणखी लोकांचा सहभाग असल्याचा आरोप केला असून, सीबीआय याच दिशेने तपास करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात बोरिवली येथे फेसबुक लाइव्ह दरम्यान अभिषेक यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी मॉरीसने आत्महत्या केली होती. याआधी या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत होती, परंतु घोसाळकर यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात विशेष तपासाची मागणी केली होती.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे, यामुळे मराठा समाजात मोठा असंतोष दिसून येत आहे. याच दरम्यान, मराठा तरुण मंगेश साबळे यांनी फुलंब्री तहसीलदार यांच्या खुर्चीला आग लावून आपला संताप व्यक्त केला आहे.
मुडा जमीन घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. राज्यपालांची चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश देताना उच्च न्यायालयाने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
अभिनाता सलमान खान याच्या भेटीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या भेटीसाठी गॅलेक्सी निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान सलमान आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागे काय कारण आहे, याबाबत अद्याप कारण कळू शकले नाही.
बुडापेस्ट इथं बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारतासाठी दुहेरी सुवर्णपदक जिंकल्यानंतर बुद्धिबळ ग्रँडमास्टर डी गुकेश चेन्नई विमानतळावर दाखल झाला आहे.
पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर पाणी आणि चहा मिळणार आहे. विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर आता हे मिळणार आहे.
अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयात पोहचली आहे. या ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील महिनाभरापासून पावसाने उसंत घेतली होती. मात्र पहाटेपासूनच आज मुंबई उपनगरात जोरदार पाऊस सुरू
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी (ता. २४) छत्रपती संभाजीनगरमध्ये येत असून, एमजीएम येथील रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ते मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
नागपुरात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. आज हवामान विभागकडून विदर्भात ऍलो अलर्ट दिला आहे.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ठाण्यातील बदलापूर रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप केले.
बदलापूर अत्याचाराचा आरोपी अक्षय शिंदे याचा काल बदलापूर, ठाणे येथे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. काल रात्री त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आले आणि आज सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत त्याचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम जेजे रुग्णालयातील तज्ञ, तसेच फॉरेन्सिक टीम करतील.
उद्या, 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी राजौरी जिल्ह्यात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. जम्मू-काश्मीरमधील सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे.
बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. तातडीचा दिलासा देण्यास नकार देत याचिकेवरील सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केलीये. सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर शाळेशी संबंधित दोन फरार आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.
प्रयागराज : काल रात्री रेल्वेवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीये. नवी दिल्लीहून बिहारमधील गयाकडे जाणाऱ्या महाबोधी एक्सप्रेस ट्रेनवर हल्लेखोरांनी दगडफेक केली. रात्री साडेनऊच्या सुमारास प्रयागराज जंक्शनहून गयाकडे निघालेल्या या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे कळतंय.
मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज (मंगळवार 24 सप्टेंबर) मतदान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं राज्याचं लक्ष लागलंय.
राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून मुंबईच्या काही भागांतही जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई-ठाणे महामार्गावर पावसाला सुरुवात झालीये.
बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जागा वाटप प्रकरणात खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या याचिकेची सुनावणी संपली असून, आज (ता. २४) उच्च न्यायालय आपला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या बाजूने निकाल येणार की विरोधात, याबाबत तीव्र उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोल्हापूर : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी (ता. २५) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ३ वाजता ते शासकीय विश्रामगृहात येतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता ते हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील.
Latest Marathi Live Updates 24 September 2024 : महिनाभरापूर्वी बदलापूर येथे शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. तसेच राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना गायीचे दूध पुरवणाऱ्या दूध उत्पादकांना आता पाचऐवजी सात रुपये अनुदान दिले जाणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवारी (ता. २५) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जागा वाटप प्रकरणात खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या याचिकेची सुनावणी संपली असून, आज उच्च न्यायालय आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत असून काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.