मुंबई : मागील दोन वर्षे तोंडाला मास्क लावून श्वास घेणाऱ्या नागरिकांना आता विना‘मास्क’श्वास घेण्याची परवानगी देत महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोरोना ‘साथरोग प्रतिबंधक कायदा’चे राज्यात लागू असलेले निर्बंध आज रद्द केले. त्यामुळे तब्बल ७३८ दिवसांनंतर सण-उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरे करता येणार आहे. गुढीपाडवा, रमजान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्याने साजरी करण्यासही या निर्णयामुळे परवानगी मिळाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारून नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरीत्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (२ एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत.’’यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
‘‘मात्र कोरोनाचा धोका भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून स्वतःची तसेच इतरांचीही काळजी घ्यावी,’’असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील डॉक्टरांसह सर्व फ्रंटलाइन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढताना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांनाही धन्यवाद दिले.
राज्याचे निर्णय
मार्च २०२०पासूनचे सर्व कोरोना निर्बंध संपुष्टात
सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त
मास्कसक्ती नाही, मास्क लावणे ऐच्छिक
हॉटेल, उद्याने, जीम, चित्रपटगृहे, शैक्षणिक संस्थामधील उपस्थितीवर मर्यादा नाही
लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रमातही उपस्थितीवर मर्यादा नाही
बस, उपनगरी गाड्या आणि रेल्वेने प्रवास करताना ‘लसप्रमाणपत्रा’ची गरज नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.