मुंबई - ‘राज्यात सरकारच्या आशीर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे हित सरकार जोपासत आहे.
राज्याला उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम सरकारकडून सुरू आहे. अशा सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी होणार नाही,’ अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केली.
अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आज महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख, शिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले, ‘महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकीय परंपरा आहे. परंतु या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली असून राज्याच्या आदर्श, सुसंस्कृत राजकीय परंपरेला गालबोट लागले आहे. गुंड मंत्रालयात रील बनवतात. पुण्यात २०० गुंडांची परेड होते त्यानंतर पुण्यात २२०० कोटींचे ड्रग सापडते तरी सरकार गप्प आहे. गुंडांना राजाश्रय मिळत असल्याने पोलिसांना गुंड जुमानत नाहीत.
निवडणुकीच्या तोंडावर गुंडांशी सल्लामसलत केली जाते. आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतात. प्रक्षोभक विधाने करून, चिथावणीखोर भाषण करून काही लोकप्रतिनिधी राजकीय वातावरण गढूळ करतात. खुलेआम स्टेजवरून माता-भगिनी विषयी काहीही बोलले तरी देखील सरकार त्यांना पाठीशी घालते आहे. गुंडांना पोसण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सुरू आहे.’
सरकारकडून फसवणूक
‘सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली आहे. आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. न्यायालयात न टिकणारे आरक्षण दिले आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. शेतमालाची हमीभावाने खरेदी केली जात नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जात नाही. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीन खरेदी केली जात आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयांचे अनुदान दिले नाही. तरीही सरकार टेंभा मिरवते आहे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणांची अंमलबजावणी होत नाही. विदर्भातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची, जनतेची फसवणूक केली आहे,’ त्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकला असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
शासकीय नोकर भरतीत गैरव्यवहार होत आहे. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची घोषणा केली होती. मात्र त्या शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलेले नाही. आरोग्य विभागाच्या ॲम्बुलन्स कंत्राटातून लूट सुरू आहे. पीक विमा कंपन्यांची दादागिरी वाढली आहे.
- अंबादास दानवे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.