महाराष्ट्रातील महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेच्या मुहूर्तावर मार्गी लागण्याची चिन्हे असल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी भाजप ८ मंत्रिपदे स्वत:कडे ठेवणार आहे. या १०४ आमदार असलेल्या सर्वाधिक मोठ्या पक्षाला सर्वाधिक म्हणजेच आठ मंत्रिपदे मिळणार असून मित्रपक्षांना ६ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
सत्तेत सहभागी होताना दिलेल्या आश्वासनातील १ कॅबिनेट मंत्रिपद तर २ राज्यमंत्रिपदांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कमालीची आग्रही आहे तर मुख्यमंत्री शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदांची संख्या वाढवून हवी आहे. दिल्लीत यासंबंधात शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
पितृपंधरवडा आटोपताच १५ किंवा १६ ऑक्टोबरलाच विस्तार होऊ शकतो. सध्या भाजप, शिवसेना यांचे प्रत्येकी १० मंत्री आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नऊ मंत्री आहेत. बड्या नेत्यासाठी एक खाते रिक्त ठेवले आहे, असे बोलले जाते .जयंत पाटील यांचा प्रवेश निश्चित झाला की शपथविधी होईल. त्यांच्यासाठी ही जागा राखीव ठेवली असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटातील अस्वस्थता गेले काही दिवस वाढत चालली होती. भाजपने ८ मंत्रिपदे घेतल्यास केवळ सहा मंत्रिपदे सहकाऱ्यांसाठी शिल्लक राहतात .त्यातील प्रत्येकी तीन पदे घ्या, असा भाजपचा प्रस्ताव आहे. जागा वाढवून घेता येतील काय याबाबत मुख्यमंत्री शिंदे सर्वशक्ती पणाला लावून प्रयत्न करीत आहेत.
भाजपतील आशीष शेलार या बडया नेत्यासह डॉ.संजय कुटे, प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड हे नेते शपथ घेतील असे मानले जाते. अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा, सांगली, नाशिक या जिल्ह्यांत भाजपचा मंत्री नाही. विधानपरिषदेतील एकाही आमदाराला मंत्रिपदाची शपथ दिलेली नाही. तसेच एकाही महिलेचा मंत्रिमंडळात समावेश नाही. भाजपने मराठा जातीला प्राधान्य देतानाच ओबीसी समाजाला न्याय देण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
महिलांच्या आरक्षणाचा निर्णय घेणाऱ्या भाजपकडून देवयानी फरांदे, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ या तिघींचा मंत्रिपदासाठी विचार होवू शकेल. वऱ्हाड भागाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कुशाग्र बुद्धीच्या राजेंद्र पटनी तर आदिवासी समाजातील डॉ.ऊइेके (जि.यवतमाळ ) यांना संधी मिळू शकते.
शिंदे गटात रस्सीखेच
शिंदे गटातील भरत गोगावले ,संदीपान भुमरे यांच्यासह सरकारला पाठिंबा देणारे बच्चू कडू या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत.शिंदे गटात मंत्री होण्यासाठी तीव्र स्पर्धा असल्यानेच विस्तार रखडला होता. मुंबईचे महत्त्व लक्षात घेता शिंदे गटाकडून एखादे नाव अचानक समोर येवू शकते. अजित पवार गटातून साताऱ्यातील मकरंद पाटील यांचे नाव चर्चेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.