सोलापूर : सध्या विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात काही ठिकाणी कामांचे भूमिपूजन करून, काहींनी पार्ट्या करून, उमेदवारी अर्ज भरताना काहींनी खोटी माहिती देवून किंवा माहिती लपवून आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. तर शासकीय तंत्रनिकेतनमधील अधिव्याख्याता भाजपचा प्रचार करत असल्याचीही तक्रार आहे. याशिवाय आमदार राजेंद्र राऊत, आमदार विजयकुमार देशमुख यांनी उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याच्याही तक्रारी आहेत. त्यातील काहींचा निपटारा झाला असून काहींची माहिती घेतली जात आहे.
निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी करणाऱ्यांमध्ये माजी महापौर मनोहर सपाटे, पुण्यातील शिवनेरी कॉन्ट्रॅक्टर, कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष, दिनानाथ काटकर, विनोद विक्रम जाधव, विकास भाऊ मुंढे, आकाश पांडुरंग दळवी, नवाज सलिम मुलाणी, विक्रांत श्रीकांत गायकवाड, प्रशांत नागनाथ इंगळे, डॉ. अभिषेक हरीदास यांचा समावेश आहे. दरम्यान, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेचे संचालक कृष्णा पांडुरंग पोळ यांनी तक्रार करीत सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक को-ऑप असोसिएशन लि. सोलापूर यांनी आदर्श आचारसंहिता काळात भरती प्रक्रिया नियोजित केल्याचे म्हटले आहे. जिल्हा उपनिबंधक व जिल्हा नागरी बॅंक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून त्यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. तर नरखेड (ता. मोहोळ) येथील संतोष सुरेश पाटील यांनी सभेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून संबंधितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारदारांच्या तक्रारींचे स्वरुप...
सपाटे यांनी २५ ऑक्टोबरला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. प्रभाग क्र. ११ मधील निराळे वस्तीलगत क्रांती तालिम तरुण मंडळाच्या जागेत जबरदस्तीने कब्जा करून मंदिर बांधकाम केले जात असल्याची त्यांनी तक्रार केली.
दिनानाथ काटकर यांनी ३० ऑक्टोबरला दोन तक्रारी केल्या आहेत. त्यात काही अधिकारी ठरावीक उमेदवारांसाठी काम करत असल्याची तक्रार केली आहे. राजकीय लोक काही अधिकाऱ्यांसोबत पार्ट्या करीत असल्याचेही त्यात म्हटले आहे.
कामगार संघटना महासंघाच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांना बांधकाम कामगार म्हणून नोंदवून गृहउपयोगी वस्तूसंच व अन्य लाभाचे अनुदान वितरीत करीत भाजपने आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केली आहे. ठेकदार व विभागाच्या अधिकाऱ्याची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राजेंद्र राऊत यांनी नामनिर्देशन पत्रासोबत शपथत्रात माहिती लपविली, खोटी माहिती दिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अपात्र करावा, अशी तक्रार बार्शीतील आकाश दळवी यांनी केली आहे.
नवाज मुलाणी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत उमेदवाराच्या खर्चाने एका गावात सार्वजनिक जागेवर कमान बसविण्यासाठी विनापरवाना कार्यक्रम घेऊन आचारसंहिता भंग केल्याचे म्हटले आहे.
उमेदवारी अर्जासोबत विजयकुमार देशमुखांनी खोटे शपथपत्र देवून शासनाची दिशाभूल केल्याने त्यांचा अर्ज रद्द करावा, अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विक्रांत गायकवाड यांनी केली आहे. तर ‘मनसे’चे उमेदवार प्रशांत इंगळे यांनीही अशीच तक्रार केली आहे.
‘शहर मध्य’मध्ये दोघांवर गुन्हे
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ एका मंदिरात विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी एका भाजप महिला कार्यकर्त्याविरूद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तर एका कार्यकर्त्याने धार्मिक भावना दुखावतील, असे स्टेट्स व्हॉट्सॲपला ठेवले होते. त्याच्याविरुद्ध पण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.