खासदार महास्वामींचे जात प्रमाणपत्र प्रकरण! जात पडताळणी समितीचे अक्कलकोट तहसीलदारांना पत्र; फॉरेन्सिक लॅबच्या अहवाल लवकरात लवकर देण्याची मागणी

डॉ. महास्वामींच्या वडिलांच्या गौडगाव (बु) ग्रामपंचायतीतील जन्म-मृत्यू नोंदीच्या पडताळणीचा न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेचा अहवाल लवकरात लवकर द्यावा, जेणेकरून कोर्टाच्या आदेशानुसार वेळेत निकाल देता येईल. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, असे पत्र अक्कलकोट तहसीलदारांना पाठविल्याचे समितीतील सूत्रांनी सांगितले.
sakal
cast certificatesolapur
Updated on

सोलापूर : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत पडताळणी समितीला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन महिन्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. या अनुषंगाने समितीने अक्कलकोट तहसीलदारांना पत्र पाठवून डॉ. महास्वामींच्या वडिलांच्या गौडगाव (बु) ग्रामपंचायतीतील जन्म-मृत्यू नोंदीच्या पडताळणीचा न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेचा अहवाल लवकरात लवकर द्यावा, जेणेकरून कोर्टाच्या आदेशानुसार वेळेत निकाल देता येईल. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, असे पत्र अक्कलकोट तहसीलदारांना पाठविल्याचे समितीतील सूत्रांनी सांगितले.

सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या आदेशानुसार अक्कलकोटच्या तत्कालीन तहसीलदारांनी खासदार डॉ. महास्वामी यांच्या वडिलांचे गौडगाव (बु) येथील १९१५ सालचे जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर परराज्यातील न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेकडे (फॉरेन्सिक लॅब) पडताळणीसाठी पाठविले. ग्रामपंचायतीकडील त्या जन्म-मृत्यू नोंदवहीतील नोंदीची शाई व अक्षरे त्या काळातीलच आहेत का?, त्यात पुन्हा बदल केला की नाही, या बाबींची फॉरेन्सिक लॅबमध्ये पडताळणी होणार आहे.

तत्कालीन तहसीलदारांनी परराज्यातील न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेत ते रजिस्टर पाठवूनही आता चार महिने झाले, पण अद्याप अहवाल आलेला नाही. तत्पूर्वी, उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी न्यायालयाने समितीने आता दिरंगाई न करता दोन महिन्यात या प्रकरणावर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. त्याअनुषंगाने आता पुन्हा विलंब व्हायला नको म्हणून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अक्कलकोट तहसीलदारांना तो अहवाल लवकरात लवकर द्यावा, असे पत्राद्वारे कळविले आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच त्यासंदर्भातील पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

‘त्या’ अहवालानंतर दक्षता पथकाचा येईल अहवाल

दक्षता पथकाच्या माध्यमातून खासदार डॉ. महास्वामींच्या जात प्रमाणपत्राची यापूर्वी चौकशी झाली होती. पण, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची फेरचौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल देण्यासाठी समितीला अक्कलकोट तहसीलदारांनी परराज्यातील न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेकडे पाठविलेल्या रजिस्टरसंदर्भातील अहवाल आवश्यक आहे. समितीला तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही दिवसातच दक्षता पथकाचा अहवाल येईल. दोन्ही अहवालाचा अभ्यास करून समितीकडून या प्रकरणाचा अंतिम निकाल दिला जाईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.