ठराविक विचारधारा लोकशाहीस घातक

शरद पवार : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्‍घाटन
Sharad Pawar Inauguration akhil bharatiy Marathi Sahitya Sammelan udgir
Sharad Pawar Inauguration akhil bharatiy Marathi Sahitya Sammelan udgirsakal
Updated on

उदगीर : ‘‘समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद जन्माला आला. परंतु आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे,’’ अशी स्पष्टोक्ती ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्‍घाटक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

साहित्य संमेलनाचे मोठ्या उत्साहात शुक्रवारी उद्‍घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, कोकणी साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, शिवराज पाटील चाकूरकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री अशोक चव्हाण, सुभाष देसाई, अमित देशमुख, स्वागताध्यक्ष- राज्यमंत्री संजय बनसोडे, रामचंद्र तिरुके, गो. ब. देगलूरकर आदी यावेळी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, ‘‘मराठवाड्यातील उदगीर येथे साहित्य संमेलन होते, याचा मला विशेष आनंद आहे.

निजाम आणि रझाकारांच्या जुलमी राजवटीत मराठी अस्मिता टिकवून ठेवणारे हे शहर आहे. मला साहित्य, कला, क्रीडा प्रकारांची आवड आहे. सार्वजनिक जीवनात व्यग्र असलो तरी पुस्तके वाचनाचा छंद मी जोपासला आहे. मला असे जाणवते की, साहित्यातून काव्य कमी होत चालले आहे. काव्यसंग्रह प्रकाशनाच्या अर्थकारणाचे गणित जुळत नसावे, असा माझा तर्क आहे. एकूणच ग्रंथ प्रकाशनाची व्यावसायिक बाजू फारशी उत्साहवर्धक नसावी. नवतंत्रज्ञान म्हणा, परभाषेचे आक्रमण म्हणा, मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल म्हणा, मराठी शिक्षणाकडे कमी होत चाललेला ओढा म्हणा, ग्रंथ प्रकाशन संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे, हे चित्र निराशाजनक आहे.’’

‘‘रसिकांच्या सहकार्याशिवाय साहित्यरथ धावणार नाही. लोकाश्रय आणि राजाश्रय ही साहित्यरथाची दोन चाके आहेत, असे मी मानतो. विद्याधर गोखले यांच्या म्हणण्यानुसार साहित्यिकांच्या हाती राज्यकर्त्यांचा अंकुश हवा; परंतु राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कंट्रोल असू नये. संशोधनात्मक लेखनाकडे अधिक भर द्यावा,’’ असेही पवार म्हणाले.

राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये

पवार म्हणाले, ‘‘साहित्य आणि राजकारण यांचा अतूट संबंध आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण हे उत्तम साहित्यिक होते. इतिहासाकडे पाहिल्यास असे लक्षात येते की, राजे, राज्यकर्ते जातात; परंतु ग्रंथ चिरकाल टिकून राहतात. लेखणीतून क्रांती घडते. त्यामुळे साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. साहित्यिक आणि राज्यकर्त्यांमध्ये समन्वयाचे आणि स्नेहभावाचे नाते असावे. समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद जन्माला आला. परंतु आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.

गोव्यात या, मी जबाबदारी घेतो

‘मला संवाद आवडतो. माणुसकीच्या नजरेतून संवाद घडावा. भाषा जोडणारा दुवा असून मला मराठीबद्दल विशेष आपुलकी, जिव्हाळा आहे,’ असे स्पष्ट करत ‘पुढील साहित्य संमेलन गोव्यात घ्या, मी जबाबदारी घेतो,’ असे आवतन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी दिले.

‘ऐतिहासिक परंपरा असलेल्या या भूमीत होणाऱ्या साहित्य संमेलनात निव्वळ साहित्यावर चर्चा होईल, या अपेक्षेने उद्‍घाटनाचे निमंत्रण स्वीकारले,’ असे स्पष्ट करत मावजो म्हणाले, ‘कोकणी आणि मराठीच्या नात्याला सहाशे वर्षांचा इतिहास आहे. संत नामदेवांपासून ही परंपरा आहे. बहुभाषिकांचे गाव असलेल्या उदगीरमधून हीच परंपरा पुढे जात आहे. भाषा वैभव कसे जपावे, हे उदगीरकरकरांकडून शिकावे. बहुभाषिकतेचा आदर करणारी ही भूमी आहे. कोकणी ही साहित्यिक भाषा आहे. इतर भाषांतील ‘वैभव’ सामावून घेतल्यानेच भाषा अधिक संपन्न होते.’’

ते म्हणाले, ‘‘भारतीय भाषेत मराठी भाषा संपन्न आहे. त्याचा मला अभिमान आहे. येथे आल्यावर सुंदर मराठी भाषा दिसली. तिचा आनंद घेण्यासाठी येथे आलो आहे. मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. कोणत्याही पुस्तकावर, साहित्यावर बंदी आणणे योग्य नाही. त्याऐवजी त्याला उत्तर देणारे सकस साहित्य निर्माण झाले पाहिजे. आणीबाणीच्या काळात लेखकांनीच तीव्र विरोध आणि निषेध व्यक्त केला होता. साहित्यात ‘चिअर्स लीडर’ तयार होत आहेत, हे दुर्दैवी आहे. भाषा हा जोडणारा दुवा आहे. त्यामुळे दुसऱ्या भाषेत लिहिणारे चुकीचे ठरत नाहीत. आपल्या भाषेवर प्रेम असणे हे स्वाभाविकच आहे. वाद घालण्यापेक्षा संवाद साधा त्यामुळे अनेक वाद सन्मानाने मिटवता येतील.’’

सर्वभाषिक एकता तारक

भारत सासणे म्हणाले, उदगीरमध्ये पाच ते सहा भाषा बोलल्या जातात. सर्व भाषा बोलणारा समाज येथे आनंदाने आणि एकत्रितपणे राहत आहे. त्यामध्ये कोणताही भाषिक संघर्ष नाही. आजच्या काळातील ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आजच्या विद्वेषवृद्धीच्या काळात हा संदेश आपल्या सर्वांना तारक आहे.’’

अपेक्षा, अन् संकल्प

शिवराज पाटील चाकूरकर यांनी डिजिटलचे आव्हान लक्षात घेऊन साहित्यिकांनी त्या लेखनाकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठवाडा हे मराठी भाषेचे आगर असून या ठिकाणी भाषेचा आदर आणि दबदबा कायम असल्याचे स्पष्ट केले.

मंत्री देशमुख यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारवर दबाव आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मंत्री देसाई यांनी पुस्तकांचे गाव ही संकल्पना अधिक सक्षमपणे राबविली जाणार असल्याचे सांगितले. ठाले पाटील यांनी गोवा आणि मराठी माणसाचे नाते तपासावे. स्वागताध्यक्ष मंत्री संजय बनसोडे यांनी संमेलनामागची भूमिका स्पष्ट केली. कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी प्रास्ताविक केले. संमेलनाच्यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘अश्मक’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

अध्यक्षपदी महिलांना संधी मिळावी

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर महिला साहित्यिकांना कमी संधी मिळत असल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. यासाठी महामंडळाने घटनेत बदल करावा. दर पाचव्या संमेलनानंतर पुढील सहाव्या संमेलनाध्यक्षपदी महिला साहित्यिकांची निवड करावी, अशी सूचना त्यांनी केली.

ठाले पाटलांकडून सासणे यांना सूत्रे

माजी संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर संमेलनास न आल्याने महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते भारत सासणे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दरम्यान संमेलनाध्यक्षांना वर्षभरासाठी प्रवासासाठी साहित्य महामंडळाच्यावतीने मिलिंद जोशी यांनी एक लाखांचा धनादेश सासणे यांच्याकडे सुपूर्द केला.

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, उदगीर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी शुक्रवारी दीप प्रज्वलन करताना ज्येष्ठ नेते शरद पवार. शेजारी (डावीकडून) दामोदर मावजो, कौतिकराव ठाले- पाटील, मीना सासणे, संमेलनाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, कार्यवाह रामचंद्र तिरुके आदी.

-आशिष तागडे, महिमा ठोंबरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.