मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे गतीने निर्णय घेत आहेत.
कोल्हापूर : ‘देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जनतेचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक पतळीवरील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य महायुतीला पाठिंबा देत आहेत. लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे यांना स्वतःचे पक्ष आणि उमेदवार शोधावे लागणार आहेत,’ अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते (Chandrashekhar Bawankule) बोलत होते. ‘महाविजय २०२४’ अभियानअंतर्गत ते कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. बावनकुळे म्हणाले, ‘भारताचा अमृतकाळ सुरू झाला असून, यामध्ये देशाच्या प्रगतीची छबी जागतिक पटलावर उमटली आहे. देशाच्या विकासाचे धोरण आणि त्याची अंमलबजावणी यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे.
याच गोष्टी लक्षात घेऊन देशाच्या पुनर्बांधणीमध्ये योगदान देण्यासाठी अजित पवार आणि त्यांना मानणारे राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे गतीने निर्णय घेत आहेत. प्रत्येकाला विकासकामांसाठी निधी मिळत आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य महायुतीला पाठिंबा देत आहेत.
लोकसभा निवडणुकीपर्यंत जनतेचा हा पाठिंबा नरेंद्र मोदी यांना एवढा वाढेल की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार यांना आपला पक्ष आणि निवडणुकीसाठी उमेदवारही शोधावा लागेल. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला राज्यातून ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बावनकुळे म्हणाले, ‘पक्षाचा विस्तार होतो, त्यावेळी नवे कार्यकर्ते सहभागी होतात. मग काही जुन्या कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटते, पण संवादातून त्यांच्या प्रश्नावर उत्तर काढू. निवडणुकीमध्ये मेरीट असेलच तरच उमेदवारी दिली जाईल.’
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बावनकुळे यांनी करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. रावजी मंगल कार्यालय येथे हा मेळावा झाला. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेचा पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
महाद्वार रोडवर बावनकुळे यांनी ‘संपर्क से संवाद’ या उपक्रमांतर्गत रॅली काढली. यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी भेटून त्यांना पंतप्रधान कोण असावा, याबद्दल विचारले. त्यानंतर त्यांनी गुजरी कॉर्नर येथे सभा घेतली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, माजी आमदार अमल महाडिक, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, हेमंत अराध्ये, सचिन तोडकर, अशोक देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.