Chhatrapati Rajaram Jayanti : छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे द्वितीय पुत्र होते जे छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर मराठा साम्राज्याचे तीसरे छत्रपती बनले होते.
छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस 24 फेब्रुवारी 1670 ला राजगड किल्ल्यात झाला होता. मात्र वयाच्या ३०व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरलं होतं अशात आता मराठा साम्राज्य कोण सांभाळणार, असा प्रश्न होता. तेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांनी वयाच्या १९ व्या वर्षी मराठा साम्राज्याचे तीसरे छत्रपती बनले.
त्यांचा प्रवास एकंदरीत खूप साहसी आणि प्रेरीत करणारा होता. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.(Chhatrapati Shivaji Maharaj son look after Swarajya Maratha Empire )
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांसमोर असलेले स्वराज्य रक्षणाचे आव्हान प्रचंड होते. हे आव्हान पेलणे पुढील दोन कारणांसाठी कठीण होते. औरंगजेबासारखा धूर्त पाताळयंत्री व धर्मवेडा मोगल बादशहा मराठी राज्य चिरडण्यासाठी सर्व सामर्थ्यानिशी महाराष्ट्रांत येऊन १८-१९ वर्षे झाली होती. ह्या काळात त्याने मराठ्यांचे गुणदोष पाहिले होते.
मराठी वतनदारांचे वतनप्रेम हा सगळ्यात मोठा दोष तो अचूक हेरुन मराठी वतनदारांना मुक्त हस्ताने वतने देऊन त्यांची निष्ठा त्याने विकत घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्प्रयासाने उभारलेल्या स्वराज्यात फूट पडली. अनेक मराठी सरदार वतनाच्या लोभाने मोगलांना मिळाले. त्यांना मराठी राज्याशी बांधून ठेवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनाही सढळपणे वतने देण्याचे धोरण अवलंबणे भाग पडले.
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती राजाराम महाराजांनाही मराठी सरदार शिपायात देशभक्तीची भावना चेतविण्यासाठी वतनाचा आधार द्यावा लागला. छत्रपती संभाजी राजांच्या क्रूर वधामुळे मराठी समाजाचा आत्मविश्वास ढळला होता. स्वराज्याच्या स्थैर्याविषयी शंका उत्पन्न झाली होती.
मराठी समाजातील पराभूत मनोवृत्ती नाहीशी करून त्यांचा आत्मविश्वास, स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान जागृत करण्याचे व परिणामस्वरूप मराठी राज्य मोंगल साम्राज्याच्या पाशवी व लष्करी सत्तेपासून सुरक्षित ठेवण्याचे अमूल्य व महत्वपूर्ण कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी केले.
छत्रपती राजाराम महाराजांची योग्यता :
रियासतकार सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम महाराजांस स्थिरबुद्धी म्हटले आहे ते यथार्थच आहे. छत्रपती राजाराम महाराजांना त्यांच्या मातोश्रीने छत्रपती संभाजी महाराजास बाजूला सारुन मराठी राज्याचे धनी केले. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः सिंहासनाधिष्ठित होऊन छत्रपती राजाराम महाराजांस ९ वर्षे नजर कैदेत ठेविले. या मुदतीत स्थिर मन राखून महाराजांनी एकही दूषणास्पद शब्द छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत उच्चारला नाही.
मातोश्रीस झालेल्या यातनांचे दुःख त्यांनी गिळले. भावजय, पुतण्या ह्यांवर अतीव प्रेम केले. हे राज्य शाहू महाराजांचे. त्यांची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली म्हणजे तेच राज्याचे धनी होतील असा सुझ विचार त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाल्यावर बोलून दाखविला.
राज्य प्राप्त झाल्यावर स्वराज्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्याचे काम त्यांच्यापुढे दत्त म्हणून उभे होते. त्याकरिता जनतेस वतन इनामाच्या खिरापती वाटून लोकसंग्रह केला. जिंजीच्या ७/८ वर्षांच्या वास्तव्यात परकीयास औदार्याने जिंकले.
सत्यप्रियता व स्वकार्यदक्षता, स्वाभिमान आणि स्वधर्मप्रियता हे अलौकिक गुण त्यांच्या ठिकाणी होते. ते अजातशत्रू होते. त्यांनी शत्रूच्या छावणीवर हल्ला करून येसूबाई व शाहू यांना सोडवून आणण्याचा प्रयत्न केला पण तोही निष्फळ ठरला.
त्यांनी वतनदार मंडळीचे सहकार्य मिळविले. जे वतनदार मोगलांकडे गेले होते त्यांना स्वराज्य सेवेकरता परत बोलाविले. त्यांची वतने कायम ठेवून त्यांना नवीन वतने देण्याची आश्वासने देऊन त्यांना राष्ट्रकार्यास लावण्याचा यशस्वी प्रयत्न छत्रपती राजाराम महाराजांनी केला.
यामुळे मराठा वीरांनी स्वबळावर इ. स. १७०१ च्या सुमारास छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रेरणेने नर्मदेच्या दक्षिणेस खानदेश, वऱ्हाड, कोकण ह्या प्रांतातील प्रदेशातून आणि खेड्यातून मराठे सत्ताधीश बनत चालले.
इंग्रज प्रवासी विलियम नॉरिस इ. स. १७०१ च्या फेब्रुवारीत म्हणतो की, "मोठमोठे मोगल अधिकारी प्रवास करण्यास कचरत, इतका त्यांना मराठ्यांचा धाक वाटत होता" [हिंदवी स्वराज्य आणि मोगल, पृ. २३०. ] एवढा मराठ्यांचा दरारा केवळ छत्रपती राजाराम महाराजांच्या वतन पद्धतीने केला.
मुलूख जिंकावा व जहागीर म्हणून तो आपणच लाटावा हा प्रघात छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केल्यामुळे पुढे मराठे अटकेपर्यंत जाऊ शकले. यातच मराठ्यांच्या विनाशाची बीजे पेरली गेली.
संदर्भ -
( महाराष्ट्राचा इतिहास- मराठा कालखंड (भाग १)
शिवकाल (१६३० ते १७०७ इ.)
लेखक - डॉ. वि. गो. खोबरेकर, एम. ए. पीएडी )
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.