अहमदनगर ः मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील मी शिपाई आहे. समाजाला आरक्षण आणि निर्भयाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरकार कोणाचेही असो आम्हाला त्याचे देणे-घेणे नाही. आमची लढाई न्यायासाठी आहे, असा इशारा देत छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी रणसिंग फुंकले.
छत्रपती संभाजीराजे यांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील निर्भयाच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.
मी छत्रपती शाहू महाराजांच्या तत्वानुसार काम करीत आहे. समाजाला आरक्षण हेच माझं ध्येय आहे. कोपर्डीतील घटनेनंतर समाजाने न्यायासाठी ५८पेक्षा जास्त मोर्चे काढले. या घटनेनंतर समाज एकत्र आला ही चांगली गोष्ट आहे. परंतु आरक्षणाचा विषय मार्गी लागला नाही. या पुढील लढाई केवळ आरक्षणासाठीच असेल. मोर्चे काढून झाले आहेत, उगाच वेळकाढूपणा करू नका. ३३८ बच्या माध्यमातून राज्यपाल आणि नंतर राष्ट्रपतींकडे जाता येतं. त्यानंतर संसदेत हा मुद्दा ठेवता येईल. सरकारने यावर काय करायचं ते ठरवावं. हा माझा ३६ जिल्ह्याचा दौरा आहे. आमच्या पाच प्रमुख मागण्या आहेत, असेही संभाजीराजे म्हणाले.
निर्भयासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
निर्भयाच्या आई-वडिलांनी आरोपींना अद्यापि फाशीची शिक्षा झाली नसल्याची खंत संभाजीराजेंकडे व्यक्त केली. त्यावर संभाजीराजेंनी या बाबत मुख्यमंत्र्यांना भेटून स्पेशल बेंच नेमण्याची मागणी करू. राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात अॅप्लिकेशन दिलं पाहिजे. निर्भयाला न्याय न मिळणं दुर्दैव आहे. निर्भयाच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केल्यानंतर आरक्षणासाठी समाजाच्या वतीने मोठी घोषणाबाजी करण्यात आली.
चंद्रकांतदादांनी मला शिकवू नये
भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण आणि संभाजीराजेंच्या रणनीतीविषयी भाष्य केले आहे. त्याविषयी संभाजी राजे म्हणाले, मी २००७पासून मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहे. त्यामुळे मला कोणी लढ्याविषयी शिकवू नये. एकवेळ देवेंद्र फडणवीस यांनी सल्ला दिला तर मी मानू शकतो. परंतु मला कोणी शिकवू नये, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता मारला. आपण भाजपचे खासदार आहात, असे पत्रकारांनी विचारले असता मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार असल्याचे सांगून प्रश्न टोलवला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.