छत्रपती संभाजीनगर: एकीकडे जवळपास पाचशेवर वऱ्हाडी मंडळींच्या पंगती बसल्या, तर दुसरीकडे वधूवराकडील मंडळींची एकच घाई सुरु होती. तितक्यात दामिनी पथक अवरतले अन् सुरु झाली वधूवरांची चौकशी. दरम्यान वधूचे वर अवघे १३ वर्षे असल्याचे उघड झाले.
इतकेच नव्हे तर चक्क वरही अल्पवयीनच निघाला. त्याचे केवळ २० वर्षे वय असल्याचे समोर आले. ही घटना सादातनगरात ३० एप्रिल रोजी दुपारी उघड झाली. वधूवरांकडील मंडळींनी चांगले स्थळ मिळाल्याने केवळ साखरपुड्याचा कार्यक्रम करत होते अशी भूमिका घेत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, दरम्यान दामिनी पथकाने दोघांनाही बालकल्याण समितीसमोर हजर केले.
याप्रकरणी दामिनी पथकाच्या तसेच भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांना सादातनगरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फासाटे यांना सूचना करताच त्या पथकासह लग्नठिकाणी तत्काळ पोचल्या. त्यावेळी पाचशेवर वऱ्हाडी मंडळी जेवण करत होती.
दरम्यान मुलीच्या वयाची माहिती घेतली असता, ती केवळ १३ वर्षांची तर नवरा मुलगा केवळ २० वर्षांचा असल्याचे समोर आले. दोघांच्या आईवडिलांना समज देऊन दामिनीने लेखी जबाब नोंदवून घेत बालकल्याण समितीसमोर हजर केले.
वरपित्याला दोन पत्नी, सात अपत्य
वरपित्याला बालविवाह का करताय अशी विचारणा केली असता, त्यांनी आपण मिस्त्री काम करून उदरनिर्वाह भागवत असल्याचे दामिनीला सांगितले. तसेच त्यांना दोन पत्नी असून पाच मुले तर दोन मुली अशी सात अपत्ये आहेत, सर्वांचा विवाह झालेला असून ही शेवटची मुलगी लग्नाची राहिली होती.
नात्यातले चांगले स्थळ चालून आले, म्हणून आपण विवाह लावून देत असल्याचे वधूपित्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान बालकल्याण समितीने विवाह प्रतिबंध अधिकारी यांना सदर प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई आम्रपाली तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता फासाटे, सहायक फौजदार लता जाधव, सुभाष मानकर, कल्पना खरात, सुजाता खरात, संगीता परळकर, मनिषा बनसोडे, प्रियंका भिवसने अंबिका दारुंटे, सुजाता बनकर, समुपदेशक सोनू राहीन्ज यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.