अकोला ः इस कद्र वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से !, अगर में इश्क लिखना भी चाहूँ तो इन्कलाब लिखा जाता है !!
अकोल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीविरूद्ध एक मोठी फळी उभी राहिली. सांगली, सातारा परिसरातील क्रांतिकारकांनी त्यांची यंत्रणा वेगवेगळी नावे घेऊन त्या ठिकाणी राबवली. वऱ्हाड प्रांतातील अकोला हे शहर चर्चेत आले ते त्या क्रांतिवीरांमुळेच.
क्रांतीचा ज्वालामुखी पेटवण्यासाठी राजगुरू यांचे अकोल्यातील वास्तव्य महत्त्वाचे ठरले. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे क्रांतिकारक. त्यांपैकी राजगुरू यांच्या सहवासाचे अनेक क्षण अकोलानगराच्या आठवणीत घट्ट बसले आहेत. राजगुरू यांनी सँडर्स या इंग्रज अधिकाऱ्याला यमसदनी धाडले. त्यानंतर राजगुरू यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले.
पोलिस राजगुरू यांच्या मागावर लाहोरपासून होते. मात्र, त्यांना राजगुरू यांचा थांगपत्ता बराच काळ लागला नाही. राजगुरू यांनी त्यांच्या काही काळाच्या वास्तव्यासाठी निवडले होते, अकोला हे सुरक्षित शहर!
अकोल्यात बापू सहस्रबुद्धे यांनी राजगुरू यांना आश्रय दिला. राजगुरू हा तरुण साधा पायजमा, लांब बाह्यांचा सदरा, तपकिरी लालसर रंगाचा कोट, काळी टोपी असा वेश घातलेला सावळ्या रंगाचा राजबिंडा होता. त्यांच्या अंगात कोट असे व त्या कोटाच्या उजव्या बाहेरच्या खिशात कागदात गुंडाळलेले पिस्तूल असे.
राजगुरू यांनी अकोल्यात पोचल्यावर जेवण वगैरे करून विश्रांती घेतली. ते दुसऱ्या दिवशी भर उन्हात बाहेर पडले. शेतातून रेल्वे लाईनवर गेले व तेथून डाबकी नाल्यापर्यंत जाऊन तेथून रिधोऱ्याला नाल्या-नाल्यांनी गेले व बाळापूरच्या रस्त्याने नबाबपुऱ्यातून घरी आले. राजगुरू यांचा तसा कार्यक्रम पहिले दोन दिवस सुरू होता.
राजगुरू अकोल्याबाहेर फार गेले नाहीत. ते संशय येऊ नये म्हणून आलटून-पालटून वेगवेगळ्या घरी राहत होते. ते फडके यांच्या घरातून साठे यांच्या घरी गेले. साठे यांचे घर राजेश्वर मंदिराच्या बाहेर पडल्यावर उजव्या हाताला होते! राजगुरूंचा मुक्काम साठे यांच्या माडीवर होता.
बापूजी देशमुख वाचनालयात दिला वाचनासाठी वेळ
दोन दिवसांनी, ते समोरील घाटे यांच्या माडीवर राहण्यास गेले. घाटे हे तर चक्क अमरावतीला डी.एस.पी. होते, त्यांचे अकोल्यातील घर एकदमच सुरक्षित होते. गंमत म्हणजे त्या घरासमोरच पोलिस चौकी होती. राजगुरू स्वतःच्या हाताने माडीवर स्टोववर स्वयंपाक करत असत. कोणी प्रचारक आल्यास त्यालाही जेवू घालत. ते दुपारी बारा वाजता बाहेर पडत. ते सायकलवरून अथवा पायी फिरण्यास निघत; अकोल्यातील जुन्या शहराच्या सगळ्या गल्लीबोळांतून, ताजनापेठ-माळीपुरा या भागांतून फिरून दुपारी चारच्या सुमारास परत येत. राजगुरू रोज सकाळी बाबुजी देशमुख वाचनालयात जात व वर्तमानपत्रे वाचून काढत.
लाहोर आणि पंजाब पोलिस होते मागावर
राजगुरू यांचे वास्तव्य अकोल्यात बरेच दिवस होते. सारे पोलिस खाते त्यांना शोधत होते. पंजाबचे काही पोलिस महाराष्ट्रातील शहर न् शहर उलथेपालथे घालत असताना अकोल्यात आले. पण राजगुरू हे खुशाल रिव्हॉल्वर खिशात घालून फिरत होते. ते बोलत फार कमी असत. घुटे नावाचा एक प्रचारक राजगुरू यांच्या सोबत राहत असे. त्यावेळी अकोल्यात सात-आठ लोकांशिवाय कोणालाही राजगुरू यांची ओळख नव्हती.
राजगुरुंनी निवडला राजेश्वर मंदिर परिसर
कधी कधी, राजगुरू राजेश्वर मंदिरात बसून राहत. आबासाहेब कुळकर्णी, शिवनामे, आचार्य व बापू सहस्त्रबुद्धे यांनी राजगुरू यांना सेंड ऑफ पार्टी केली. तो दिवस 22 सप्टेंबर, रविवार. त्यांनी पेढे आणले होते. त्यांनी बापू सहस्रबुद्धे यांच्या नावाने सुखरूप पोचल्याचे पत्र टाकले व त्यांना दुसऱ्याच दिवशी अटक झाली! राजगुरू यांच्या अकोल्यातील वास्तव्याने अनेकांना राष्ट्रकार्याची प्रेरणा मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.