सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता दहावीच्या निकाल जाहीर करण्याची बोर्डाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यार्थ्यांना ग्रेस पासिंगसाठी दिलेल्या चित्रकला, क्रीडा, लोककलेच्या गुणांची पडताळणी बोर्डाकडून सुरू आहे. येत्या सोमवारी (ता. २७) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा २७ मे रोजी निकाल जाहीर होईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बोर्डाचे अधिकारी आता दिवसरात्र बसून निकाल जाहीर करण्याच्या तयारीत गुंतले आहेत. इयत्ता दहावीच्या जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली होती. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. १२ ते १५ जून दरम्यान राज्यातील बहुतेक अकृषिक विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत काही दिवस अगोदरच जाहीर केला आहे. आता दहावीच्या विद्यार्थ्यांचाही निकाल लवकर जाहीर होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याची संधी लगेचच दीड महिन्यात मिळणार आहे.
सरमिसळ पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली
बोर्डाने यावर्षी पहिल्यांदाच इयत्ता दहावी आणि बारावीच्या कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला होता. भरारी पथकांची संख्या देखील वाढविली होती. पोलिसांच्या माध्यमातून बाहेरील व्यक्तींना परीक्षा केंद्रांवर येण्यास कडक निर्बंध घातले होते. या पार्श्वभूमीवर शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांच्या निकालाची टक्केवारी वाढली, पण विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक टक्केवारीत घट झाल्याचे दिसून आले. एकाच शाळेतील विद्यार्थी एकापाठोपाठ आल्याने एकमेकांचे पाहून उत्तरे लिहिण्याच्या प्रकाराला सरमिसळ पद्धतीमुळे आळा बसल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्यांनाही अकरावी प्रवेश
इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या कला शाखेत प्रवेश घेता येतो. पण, जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत किंवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण विषयात पास व्हावेच लागते. त्याशिवाय त्याला पुढे इयत्ता बारावीला प्रवेश घेता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.