पोलिस आयुक्तांचे स्पष्ट आदेश! लोकसभेच्या मतमोजणीवेळी रामवाडी गोदाम परिसरात कलम 144 लागू; निकाल ऐकण्यासाठी स्पिकरची सोय; विजयी रॅली, मिरवणुकीवरही निर्बंध

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी रामवाडी गोदाम परिसरात कलम १४४ लागू असणार आहे. जमावबंदीमुळे गोदाम परिसरात कोणालाही गर्दी करता येणार नाही. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना निकाल ऐकता यावा म्हणून जांबवीर चौकात स्पिकर लावण्यात येणार आहेत.
solapur
M. raj kumaresakal
Updated on

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी रामवाडी गोदाम परिसरात कलम १४४ लागू असणार आहे. जमावबंदीच्या आदेशामुळे गोदाम परिसरात कोणालाही गर्दी करता येणार नाही. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना निकाल ऐकता यावा म्हणून जांबवीर चौकात स्पिकर लावण्यात येणार आहेत. निकाल ऐकण्यासाठी लोकांनी जांबवीर चौक ते मोदी चौकी या रस्त्यांवरच थांबवावे, असे आदेश पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढले आहेत.

सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जूनला सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मोजणीवेळी रामवाडी गोदामाकडे येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत. त्यादिवशी उमेदवार (व्हीआयपी), मतमोजणीचे कर्मचारी, माध्यम प्रतिनिधींच्या वाहनांसाठी केंद्रीय विद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची सोय असेल.

पुणे रोड- मंगळवेढा- तुळजापूर व अक्कलकोट रोडवरून येणाऱ्या वाहनांसाठी होमगार्ड मैदानावर आणि हिंदू स्मशानभूमी परिसरातील रेल्वे रुळाजवळील मैदान (हुडको) याठिकाणी पार्किंगची सोय आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कोणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही, असेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शहरात ५६ ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येणार असून त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मतमोजणीवेळी रामवाडी गोदाम परिसरात राज्य राखीव पोलिसांसह शहरातील स्थानिक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग

  • सात रस्ता ते रामवाडीकडे जाण्यासाठी : सात रस्ता- जुना एम्प्लॉयमेंट चौक- कुमार चौक- रेल्वे स्टेशन- भैय्या चौक- मरिआई चौक- नागोबा मंदिरमार्गे पुढे.

  • विजयपूर रोडकडून रामवाडीकडे जाण्यासाठी : विजयपूर रोड- अशोक नगर- नवीन आरटीओ ऑफिस- नागुनारायणवाडी- सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय ते रामवाडी पुढे.

  • रेल्वे स्टेशनकडून रामवाडी गोदामाकडे जाण्यासाठी : रेल्वे स्टेशन- भैय्या चौक- मरिआई चौक- नागोबा मंदिरमार्गे पुढे.

सामान्य नागरिकांना कोणताही त्रास नको

लोकसभेच्या मतमोजणीवेळी निकाल ऐकायला येणाऱ्या नागरिकांनी पार्किंगमध्येच वाहने लावावीत. वाहतुकीस वाहनांचा अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतमोजणीच्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या व्यक्तींकडे किंवा वाहनांना पास देण्यात आले आहेत, त्यांनाच परवानगी असेल. सर्वांनी कायद्याचे पालन करावे, सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची सर्वांनीच दक्षता घ्यावी.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

निकालानंतर रॅली, मिरवणूक नाहीच

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणीही सार्वजनिक ठिकाणी जल्लोष करू नये. विनापरवाना विजयी रॅली किंवा मिरवणूक काढल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. रामवाडी गोदाम परिसरात जमावबंदी लागू (कलम १४४) असल्याने त्याठिकाणी पाच तथा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी थांबता येणार नाही. दुसरीकडे संपूर्ण शहरात कलम ३७ (१) (३)चे आदेश लागू असल्याने अंत्ययात्रा, विवाह वगळता अन्य कोणालाही (पाचपेक्षा जास्त व्यक्ती) एका ठिकाणी थांबता येणार नाही. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पक्ष कार्यालयात किंवा घरी थांबूनच निकाल पाहावा, परवानगीशिवाय रॅली, जल्लोष, मिरवणूक, सभा घेतल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही देखील पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com