ठाणे : महापलिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (TMC officer Kalpita Pimple) यांच्यावर भ्याड हल्ला झाल्याने त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी फोनवरुन संवाद साधत, ताई तुमच्या धैर्याचे कोणत्या शब्दात कौतुक करू, तुम्ही चिंता करू नका, लवकर बरे व्हा. त्याबरोबर आरोपींवर देखील कडक शासन करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कल्पिता पिंपळे यांना दिले.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांच्या अंगरक्षकावर फेरीवाल्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात पिंपळे यांची दोन बोटे तर, अंगरक्षक याचे एक बोट छाटले गेले होते. त्यात या दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून दोन्ही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ज्युपिटर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या कल्पिता पिंपळे या उपचार घेत असून अंगरक्षक सोमनाथ पालवे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
या अत्यंत दुर्देवी घटनेचा संपूर्ण राज्यात निषेध व्यक्त होत असून अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील या हल्ल्याची गांभीर्याने दाखल घेतली असून ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या मोबाईलवर संपर्क साधून कल्पिता पिंपळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे, ताई तुम्ही काळजी नका करू, तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन करण्यात येईल असा दिलासा दिला. तसेच तुम्ही लवकर बरे व्हा, शासन तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन देखील ठाकरे यांनी दिले तसेच त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत माहिती घेवून ही कारवाई अशीच सुरू ठेवा अशाही सूचनाही आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिल्या.
दरम्यान, काही समाजकंटकांकडून अशा प्रकारचे गैरकृत्य केले जाते. अशा घटनांमध्ये गुन्हेगारावर कारवाई होते परंतु हे गुन्हेगार जामीनावर सुटल्यानंतर मोकाट फिरत असतात. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होते. या घटनेसंदर्भात आम्ही महासभेमध्ये एकमताने ठराव करुन सदरचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा करावी असा ठराव मा. न्यायालयाकडे सादर करणार असल्याबाबतही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. फेरीवाल्यांकडून नागरिकांनी वस्तू खरेदी करु नये, जेणेकरुन भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाही असे नमूद करीत सर्व ठाणेकर नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी केले.
मला राजकारण करायचे नाही
मला सर्व घटनेची माहिती मिळत असते. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला सुद्धा आलो असतो परंतु मला यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणायचे नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रत्यक्ष ज्युपिटर रुग्णालयात जाऊन पिंपळे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शासन आणि पालिका प्रशासनावर टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही यावेळी अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.