सोलापूर : महाविद्यालयीन तरुणांनी आपल्याला काही येत नाही असे न समजता, प्रत्येक स्पर्धेत, कला प्रकारात सहभागी व्हायला हवे. टॅलेंट जन्मजात नसते, ते सहभागातून निर्माण होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना आयुष्याच्या यशाची त्रिसूत्री सांगितली.
वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल कॉलेजवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २०व्या युवा महोत्सवाची आजपासून (मंगळवार) सुरवात झाली. उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, लोकमंगल महाविद्यालयाचे अध्यक्ष रोहन देशमुख, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, डॉ. ब्रबुवान रोंगे, राजाभाऊ सरवदे, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे, कुलसचिव योगिनी घारे, अनिता ढोबळे, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. सतिशकुमार देवकर, डॉ. अमोल शिंदे, डॉ. सचिन फुगे, डॉ. सचिन गायकवाड, डॉ. देवानंद चिलवंत, डॉ. प्रभाकर कोळेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, देशभरात तरुणांमध्ये सध्या आयएएस, आयपीएस होण्याची स्पर्धा लागली असून त्याकडे कलही वाढला आहे. पण, तरुणांनी एकत्रित येऊन स्टार्टअपची देखील कास धरायला हवी. त्यातून करिअरची मोठी संधी मिळेल. महाविद्यालयात मला फार काही जमत नसतानाही मी प्रत्येक स्पर्धेत भाग घेत होतो. दरम्यान, आता काही दिवसांत विधानसभा निवडणूक होणार असून त्यावेळी प्रत्येक तरुणांनी मतदानाचा हक्क बजावावा. कोणाचे नाव मतदार यादीत नोंदविले नसल्यास त्यांनी नोंदवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. सतीशकुमार देवकर यांनी मानले.
कुलगुरूंचा स्पर्धक विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, संलग्नित प्रत्येक महाविद्यालयांनी देखील दरवर्षी किमान १०० झाडे लावून त्यातील ९० जगतील असा प्रयत्न करावा. ऑक्सिजन देण्याऱ्या वृक्षांची लागवड केल्यास निश्चितपणे आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल आणि जिल्हा दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला. युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना पराभव झाला म्हणजे खचण्याची गरज नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी समजून नव्या जोमाने कामाला लागावे. जॉब मागणारे होण्यापेक्षा सर्वांनी जॉब देणारे व्हायला पाहिजे आणि सध्या ती काळाची गरज असल्याचेही कुलगुरू म्हणाले.
युवा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांना मोठी संधी : देशमुख
युवा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांना स्वत:ची क्षमता ओळखण्याची मोठी संधी असते. यातून पुढे जाणारे विद्यार्थी निश्चितपणे स्वत:बरोबरच महाविद्यालय, विद्यापीठ व जिल्ह्याचा नावलौकिक करतील. प्रत्येकांनी स्वत:चे आत्मपरीक्षण करून पुढे जायला हवे. स्टार्टअपचा मार्ग निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ आणि त्यांना एक ते १५ लाखांपर्यंत अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी, अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनीही स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.